एखाद्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शहर अभियंता, हे पद महत्त्वाचे असते याचा कदाचित विसर नवी मुंबई महानगरपालिकेला पडलेला आहे. यामुळेच नवी मुंबईत दोन वर्षांपासून कार्यकारी अभियंताच्या माथी शहर अभियंतापदाची जबाबदारी दिली आहे.
ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना नवी मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीतून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते गलगली यांनी नवी मुंबई महापालिकेकडे शहर अभियंतांबाबत विविध माहिती मागितली होती. नवी मुंबई महापालिकेचे सामान्य प्रशासन विभागाचे प्रशासकीय अधिकारी उत्तम खरात यांनी अनिल गलगली यांना 2 एप्रिल 2021चे तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशाची प्रत दिली आहे. या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की, नवी मुंबई महापालिकेत शहर अभियंता या पदावर कार्यरत असलेले सुरेंद्र वासुदेव पाटील हे नियत वयोमानानुसार 31 मार्च 2021 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आणि सार्वजनिक सेवेच्या हितार्थ संजय गोपाळ देसाई, कार्यकारी अभियंता यांना मूळ विभागाचे कामकाज सांभाळून शहर अभियंता या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत पाहावयाचा आहे.
अतिरिक्त कार्यभार देताना शासनाच्या मंजुरीची प्रत, अतिरिक्त कार्यभाराची जास्तीतजास्त कालावधीची माहिती, जाहिरातीची प्रत, प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवण्यासाठी शासनाकडे केलेल्या पत्रव्यवहाराची प्रत अभिलेखावर उपलब्ध नसल्याचा दावा खरात यांनी केला आहे. गलगली यांनी 2 वर्षे शहर अभियंतासारखे पद अतिरिक्त कार्यभारावर देण्यामागचे गौडबंगाल काय आहे? अशी विचारणा करत चौकशीची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आयुक्तांकडे केली आहे. तत्काळ प्रभावाने राज्य शासनाने या पदावर योग्य व्यक्तींची निवड करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

