महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे विधानसभेत बोलताना संसदीय भाषण न करता बहुतांशवेळा राजकीय स्वरूपाचे भाषणच करतात, हे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सव्वादोन वर्षांच्या कारकिर्दीतही दिसून आले होते. त्याची आठवण त्यांनी सोमवारी पुन्हा एकदा विधानसभेत करून दिली आणि कॉँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेन्द्र आव्हाड यांना टोमणे मारत आपल्या अभिनंदनाला उत्तर दिले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाने असलेला पुरस्कार एकनाथ शिन्दे यांना मिळाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधानसभेत पारित करण्यात आला. तो मांडताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिन्दे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. या सत्काराला उत्तर देताना शिन्दे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील अनेक निर्णयांना उजाळा दिला. अलीकडेच नाना पटोले यांनी एकनाथ शिन्दे आणि अजित पवार यांना ऑफर देत सरकारमधून बाहेर पडल्यास मुख्यमंत्रीपद देऊ, असे विधान केले होते. त्याचा संदर्भ न देता शिन्दे म्हणाले की, मी स्वतःला कॉमन मॅन समजतो आणि नानाभाऊ आपल्याला कॉमन मॅनला सुपरमॅन करायचे आहे.
सत्ताधारी असलो आणि लोकांनी प्रचंड बहुमत दिले असले तरी सत्ताधारी आणि विरोधक हातात घालून काम करू, असे सांगत शिन्दे म्हणाले की, माझा स्वभाव सरळ आहे. संत तुकाराम महाराजांच्याच शब्दात सांगायचे तर
भले तरी देऊ कासेची लंगोटी…
असे सांगून आपल्या वाकड्यात कोणी गेला तर…
नाठाळाचे माथी, हाणू काठी…
असेही आपण करतो आव्हाडसाहेब…
असे शिन्दे यांनी सांगताच सभागृहाने त्यांना दाद दिली.