महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष डॉ. हेमराज शाह यांनी मुंबईतल्या दादरच्या स्वामीनारायण मंदिराच्या योगी सभागृहात गुजराती भाषेचा प्रचार आणि प्रसार या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात मराठी वक्ता म्हणून मला आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात मी सांगितले की, मी भगवान श्रीकृष्ण नाही, परंतु मी योगेश आहे. गुजराती आणि मराठी माझ्या दृष्टीने देवकी आणि यशोदा आहेत. एकीने जन्म दिला तर दुसरीने पालनपोषण केले.
गुजरात समाचारमध्ये काम करीत असतानाच एक बुद्धिमान व्यक्ती मला परिचित झाली. ती म्हणजे धर्मेश भट्ट. शिवसेना, भारतीय जनता पार्टी युतीचे सरकार २०१४ साली अस्तित्त्वात आले. विनोद तावडे सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री झाले. त्या काळात धर्मेश भट्ट यांची वर्णी महाराष्ट्र गुजराती साहित्य अकादमी सदस्य म्हणून लागली. दोघांचा गुजराती साहित्यावर गाढा अभ्यास असल्याने त्यांच्या बुद्धिकौशल्याचा महाराष्ट्र गुजराती साहित्य अकादमीला योग्य उपयोग व्हावा ही माझी अपेक्षा बव्हंशी सफलसुद्धा झाली. मराठी साहित्य गुजराती भाषेत अनुवादित करावे तद्वतच गुजराती साहित्य मराठी भाषेत यावे यासाठी ही अकादमी प्रयत्नशील असते. भालचंद्र जानी यांनी अकादमीचा राजीनामा दिल्यानंतर धर्मेश भट्ट यांनीही राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली. परंतु पुढे त्यांनी तो विचार सोडून दिला.
धर्मेश भट्ट गुजरात समाचारमधून मिड डे, नंतर मुंबई समाचारमध्ये कार्यरत झाले. त्यांचा साहित्यसृष्टीमध्ये चांगल्या प्रकारे संचार सुरू झाला. अगदी गुजरात सरकारनेसुद्धा त्यांच्या बुद्धिचातुर्याची दखल घेत तिथेही नियुक्ती केली. या दरम्यान धर्मेश भट्ट यांनी ‘सेक्युलरिझम अँड मीडिया १९४७ ते २०१५’ या विषयावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळविली. अनेक महाविद्यालयांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोरोनाच्या काळात घरुनच कामे करण्यात येत असत. याच काळात प्रा. प्रीति जैन यांच्या माध्यमातून मालाड येथील एम डी शाह महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. धर्मेश भट्ट व मी, आम्ही दोघांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे विद्यार्थिनींसमवेत संवाद साधला. प्राध्यापकवर्गसुद्धा यात सहभागी झाला होता.
धर्मेश भट्ट यांचा जनसंपर्क दांडगा होता. बौद्धिक मेजवानी मिळत असे. प्रख्यात कथाकार पूज्य भूपेंद्रभाई पंड्या यांचे आणि धर्मेशभाई यांचे निकटचे संबंध होते. अशा अनेक दिग्गजांचा त्यांना सहवास लाभला होता. महाराष्ट्र गुजराती साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. मराठी, गुजराती आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याने त्यांनी अनेक पुस्तके अनुवादित केली आहेत. कवी मनाच्या धर्मेशभाईंनी एका परदेशात राहणाऱ्या कट्टर शिवसैनिकाच्या पुस्तकाचा स्वैर अनुवाद केला. अचानक गुरुवारी, अनंत चतुर्दशीच्या कळले आणि धक्का बसला. धर्मेशभाई इहलोकीची यात्रा आकस्मिकपणे संपवून निघून गेले. मराठी आणि गुजराती साहित्याचा एक सेतू निखळला! धर्मेशभाईंनी अवघ्या साठाव्या वर्षी जगाचा निरोप घ्यावा ही बाब मनाला निश्चितच पटणारी नाही. अर्थात जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला! ईश्वरेच्छा बलियसी!