बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी चार तलाव ओसंडून वाहू लागल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता बऱ्याच प्रमाणात मिटली आहे. मुंबईतील १० टक्के पाणीकपात सोमवार, २९ जुलैपासून मागे घेण्यात येत असल्याचे पालिकेने जाहीर केले असून ठाणे शहर, भिवंडी व नगरबाह्य विभागातील ग्रामपंचायतीना होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील १० टक्के कपातदेखील मागे घेण्यात येणार आहे.
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयात जुलैमध्ये दमदार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने पाणीसाठ्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. १ जुलै ते २५ जुलै या कालावधीत पाणीसाठ्यात सुमारे ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हीच परिस्थिती जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कायम राहिल, असा अंदाज आहे. हे लक्षात घेता पालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सध्या लागू असलेली १० टक्के पाणीकपात मागे घेण्यात येत आहे.
यंदाच्या पावसाळ्याच्या प्रारंभापर्यंत मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पाणीसाठा घटला होता. ती स्थिती लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत पालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ३० मेपासून ५ टक्के तर ५ जूनपासून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतीना होणाऱ्या पाणीपुरवठ्यातदेखील कपात लागू करण्यात आली होती.
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला वार्षिक पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर इतका असावा लागतो.
सद्यस्थितीत तलाव क्षेत्रात दमदार पर्जन्यवृष्टी होत असून पाणीसाठा ६६.७७ टक्क्यांहून अधिक झाला आहे. तुळशी, तानसा, विहार आणि मोडकसागर हे जलाशय पूर्ण भरून वाहू लागले आहेत. या ७ तलावांपैकी विहार व मोडक सागर हे दोन्ही तलाव आज भरुन ओसंडून वाहू लागले आहेत. यापैकी विहार तलाव हा आज पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी तर मोडक सागर तलाव आज सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. गेल्याच आठवड्यात २० जुलैला तुळशी तर काल तानसा तलावदेखील ओसंडून वाहू लागला होता. त्यापाठोपाठ आज एकाच दिवशी आणखी दोन तलाव पूर्ण भरून, ओसंडून वाहू लागले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) आहे. हा तलाव गेल्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये २६ जुलै रोजी मध्यरात्री १२.४८ वाजता, सन २०२२मध्ये ११ ऑगस्टला आणि सन २०२१मध्ये १८ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. मोडक सागर तलाव गेल्या वर्षी २०२३मध्ये २७ जुलै रोजी, सन २०२२मध्ये १३ जुलै रोजी आणि २०२१मध्ये २२ जुलैला वाहू लागला होता. मोडक सागर तलावाची एकूण जलधारण क्षमता १२८९२.५ कोटी लीटर (१२८,९२५ दशलक्ष लीटर) आहे.
तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता १४,५०८ कोटी लीटर (१४५,०८० दशलक्ष लीटर) एवढी आहे. हा तलाव गतवर्षी २६ जुलै २०२३ रोजी पहाटे ४.३५ वाजता, तर वर्ष २०२२मध्ये १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता आणि सन २०२१मध्ये दिनांक २२ जुलैला पहाटे ०५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला होता. त्याआधीच्या वर्षी म्हणजेच २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला होता.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवणक्षमता सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे ६ वाजताच्या मोजणीनुसार सर्व ७ तलावांमध्ये मिळून ९६६३९.५ कोटी लीटर (९६६,३९५ दशलक्ष लीटर) इतका जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा एकूण जलसाठ्याच्या अर्थात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत ६६.७७ टक्के इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटल्यात जमा आहे.