भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे यांच्या प्रयत्नांनंतरही महाराष्ट्रात मराठा चेहरा डावलून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्त्वाने मान्यता दिली. उद्याच्या शपथविधी कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री म्हणून सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मावळते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शपथ दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात तीनही पक्षाच्या काही सदस्यांनाही मंत्रीपदाची शपथ दिली जाऊ शकते. मात्र, या मंत्र्यांमध्ये तावडे यांच्या समर्थक तसेच भाजपातल्या बहुजन समाजाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकजा मुंडे यांचा समावेश नसेल, असे समजते.
महाराष्ट्रातल्या भाजपाच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक मुंबईतल्या विधान भवनाच्या सेंट्रल हॉल येथे झाली. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण तसेच पक्षाचे पंजाबचे प्रभारी व गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांवेळी निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या बैठकीत फडणवीस यांची विधिमंडळ नेते म्हणून एकमताने निवड झाली. आज दुपारी महायुतीचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस राजभवनावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सरकार बनवण्याचा दावा करतील. मावळते काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मावळते उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित असतील. राज्यपालांच्या आदेशानंतर उद्या फडणवीस यांचा महाराष्ट्राचे ३१वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपाचे अखिल भारतीय सरचिटणिस विनोद तावडे अचानक सक्रिय झाल्याचे चित्र दिसत होते. विविध प्रसिद्धीमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ज्याच्या नावाची चर्चा असतेच त्याला मुख्यमंत्रीपद मिळत नाही, असे सांगत तावडेंनी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील की नाही, अशी शंका अप्रत्यक्षपणे व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी राजस्थान तसेच मध्य प्रदेशचे उदाहरणही दिले होते. राहुल गांधी यांनी महायुतीवर अदाणींच्या निमित्ताने केलेल्या टिकेला सडेतोड उत्तर देताना तावडे यांनी एक भव्य अशी पत्रकार परिषदही घेतली होती. मात्र, वसईत निवडणुकीत पैसे वाटल्याच्या आरोपानंतर तावडे जरा शांत झाले होते. मात्र त्यानंतरही त्यांनी भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्रीपदाच्या मराठा चेहऱ्यासंबंधी चर्चा केल्याचे बोलले जात होते. याच निवडणूक प्रचारात तावडे यांच्या समर्थक पंकजा मुंडे यांनीही डोके वर काढले होते. महाराष्ट्रात बहुजन समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे अशा आशयाचे भाष्य करत त्यांनी वेळोवेळी आपली मुख्यमंत्रीपदाची लालसा व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका जाहीर सभेत ‘बटेंगे तो कटेंगे..’, अशी घोषणा देऊन महाराष्ट्रातल्या राजकारणाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यावर मात करत याच प्रचार दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना आकृष्ट करण्यासाठी ‘एक है तो सेफ है..’ अशी घोषणा केली. मात्र पंकजा मुंडे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे, या घोषणेला पूर्णपणे विरोध दर्शवला. महाराष्ट्रात याची गरज नाही, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी आपले मत व्यक्त केले.
इतकेच नव्हे तर महाराष्ट्रावर होत असलेल्या तथाकथित गुजराती आक्रमणाला विरोध करताना पंकजा मुंडे यांनी अहिल्यानगरमधल्या पाथर्डी येथील जाहीर सभेत महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमी आहे म्हणून गुजरातमधून 90000 लोकांना बोलवण्यात आले आहे असे सांगत महाराष्ट्रातले निवडणुकीतले 90 हजार बूथ गुजराती कार्यकर्त्यांकडून हाताळले जात असल्याचे सूचित केले. पंकजा मुंडेंच्या या वक्तव्याचा लाभ उठवण्याच्या प्रयत्नात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने पंकजांची वाहवाही केली आणि त्यांचे मुंबईतल्या एका जाहीर सभेत आभारही मानले. पंकजा मुंडे यांना त्यावेळी मिळालेला हा प्रतिसाद भावला असला तरी त्याची नोंद भाजपाच्या हायकमांडने घेतलेली आहे हे त्यांना मंत्रिमंडळाच्या उद्याच्या शपथविधीच्या वेळेला नक्की लक्षात येईल, असे जाणकारांनी सांगितले.

पंकजा मुंडे या भाजपाच्या राष्ट्रीय सचिव असल्या तरी सुरुवातीपासूनच त्यांनी राष्ट्रीय स्तरावर लक्ष देण्याचे टाळले आहे. मध्य प्रदेशच्या सहप्रभारी असतानासुद्धा त्यांनी ऐन निवडणुकीत मध्य प्रदेशऐवजी महाराष्ट्रातच ठाण मांडले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी महाराष्ट्रातच एक राज्यव्यापी रॅली काढली होती. या सर्व घटनांची नोद घेत भाजपाच्या दिल्लीतल्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्याचा प्रयत्नही केला. लोकसभा निवडणुकीत खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून तेथून पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली. मात्र, त्यात पंकजा पराभूत झाल्या. त्यानंतर त्यांनी राज्यसभा मिळविण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. अखेर बऱ्याच खटपटीनंतर त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता असल्याचे लक्षात येताच भाजपाच्या अनेक आमदारांनी, नेत्यांनी फडणवीस यांच्या सागर, या निवासस्थानी हजेरी लावली. त्यात पंकजा मुंडे यांचाही समावेश होता. पंकजा मुंडे या दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असल्यामुळे त्यांच्याकडे बहुजन समाजाचा चेहरा म्हणून पाहिले जाते. परंतु त्यांचा प्रभाव मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यापुरताच मर्यादित राहिलेला दिसतो. या विधानसभा निवडणुकीत परळीतून पंकजा मुंडेंचे चुलतबंधू, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे निवडून आले आहेत. राष्ट्रवादीच्या कोट्यातून ते पूर्वीही कॅबिनेट मंत्री होते. आताही त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपाच्या आमदारांची संख्याच इतकी आहे की भाजपा श्रेष्ठींकडून एकट्या बीड जिल्ह्यातून एकाच कुटूंबातल्या दोघांना मंत्रीपद देण्याची शक्यता धूसर आहे. परिणामी मंत्रिमंडळाच्या पहिल्या फेरीत तरी पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार नाही, असे जाणकारांनी सांगितले.