ईव्हीएमसह विविध मुद्द्यांवरील तेच तेच आरोप पुन्हा करत शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. पण, पत्रकार परिषदेत बोलता त्या गोष्टी तुम्ही विधानपरिषदेत सदस्य म्हणून कधी मांडणार, या प्रश्नावर ठाकरे यांनी तऱ्हेवाईक उत्तर देत अजब तर्कट मांडले.
मी पक्षप्रमुख आहे आणि माझे सहकारी सभागृहात हे मुद्दे मांडतील, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, नरेन्द्र मोदीही खासदार आहेत ना.. मग ते लोकसभेत खासदार म्हणून प्रश्न मांडतात का, असा प्रतिप्रश्न केला. याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांची तपासणी निवडणूकविषयक पथकाने केली तेव्हाही त्यांनी मिंधेंची तपासणी करता का, असे विचारत निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्तीपत्रे त्यांच्याकडे मागितली होती. मी तुम्हाला पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची तपासणी करायला पाठवेन, असेही त्यांनी या कर्मचाऱ्यांना धमकावले होते आणि स्वतःच साऱ्या घटनेचा व्हिडियो काढून प्रसारित केला होता.

विधिमंडळात शिवसेना उबाठाच्या पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मासलेवाईक सूचनांचा प्रत्यय पुन्हा एकदा दिला. ईव्हीएम सरकार असा फडणवीस सरकारचा उल्लेख करत ते म्हणाले की, निवडणूक आयुक्त सरकारच नेमते आणि ते आपल्या सोयीचेच लोक नेमतात. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तही निवडणुकीतून निवडून आलेले असावेत, अशी माझी मागणी आहे.
छगन भुजबळ नाराज आहेत आणि मला त्यांच्याबद्दल वाईट वाटत आहे, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, आता त्यांचा माझा संपर्क झालेला नाही. पण एरवी माझा आणि त्यांचा संपर्क होत असतो. ते माझ्या संपर्कात असतात.

शिवनेरी आणि रायगड किल्ल्यांवर कायमस्वरूपी भगवा ध्वज
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर तसेच शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडावर हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज दिमाखात फडकवण्यात येईल आणि तो कायमस्वरूपी फडकत राहील, याचीही दक्षता घेतली जाईल, असे मुख्यमंत्री देवेन्द्र पडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले.
महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तूशास्त्रविषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक मंगळवारी विधानसभेत मंजूर करण्यत आले. त्यावेळी जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी यासंदर्भातील सूचना मांडली होती. जुन्या स्मारकांची डागडुजी करताना मूळ वास्तूशी साधर्म्य असलेला कच्चा माल वापरला जावा आणि मूळ वास्तूचे सौंदर्य बिघडणार नाही, याची काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, प्राचीन वास्तूंच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचे काम करताना तज्ज्ञांची मते विचारात घेऊनच ते केले जाते आणि त्यासाठीची सामुग्रीही त्या काळात वापरली गेली त्याच पद्धतीची वापरली जाते.

सर्वच धर्मांच्या देवस्थानांच्या कारभारावर सरकारची देखरेख हवी – अध्यक्ष
धार्मिक संस्थांचा कारभार सरकारी देखरेखीखाली व्हावा, यासाठी केवळ विशिष्ट किंवा हिन्दू धर्माशी संबंधित देवस्थानेच नव्हे तर अन्यधर्मीय देवस्थानांनाही यासंबंधीचे कायदे लागू व्हावेत, अशी अपेक्षा विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यंनी व्यक्त केली.
मंत्री जयकुमार रावल यांनी अध्यक्षांनी केलेल्या सूचनेचा आदर केला जाईल, असे सांगितले. मुंबईतील सिद्धीविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी) सुधारणा विधेयक विधानसभेत मंगळवारी मंजूर करण्यात आले. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी सर्वपक्षीय व्यक्तींचा समावेश सिद्धीविनायकसह अन्य देवस्थानांवरील नियुक्त्यांमध्ये असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या सूचनेचाही सकारात्मक विचार केला जाईल, असे रावल यांनी सांगितले.