भारतामध्ये गुगल पे, फोन पे, भिम आदी एपच्या माध्यमातून सर्रास वापरण्यात येणाऱ्या युपीआयला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जगातील सर्वात मोठी रिअल-टाइम पेमेंट सिस्टम म्हणून मानण्यात आले आहे. जागतिक व्यवहारांमध्ये युपीआयचे योगदान तब्बल 49% आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)च्या जून 2025च्या ‘ग्रोइंग रिटेल डिजिटल पेमेंट्स (द व्हॅल्यू ऑफ इंटरऑपरेबिलिटी)’ या अहवालात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय)ला व्यवहाराच्या प्रमाणाच्या दृष्टीने जगातली सर्वात मोठी रिटेल फास्ट-पेमेंट सिस्टम (एफपीएस) म्हणून मानण्यात आले आहे. याखेरीज, ‘प्राइम टाइम फॉर रिअल-टाइम’ 2024बाबतच्या एसीआय वर्ल्डवाइड अहवालानुसार, जागतिक रिअल-टाइम पेमेंट सिस्टममध्ये व्यवहाराच्या प्रमाणात युपीआयचा वाटा जवळजवळ 49% आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. लहान व्यापाऱ्यांना युपीआयसारख्या डिजिटल पेमेंट पद्धतीचा अवलंब करण्यास मदत करण्यासाठी सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. यात कमी किमतीच्या BHIM-UPI व्यवहारांसाठी प्रोत्साहनपर योजना आणि पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (पीआयडीएफ) यांचा समावेश आहे. यात टियर-3 ते 6 केंद्रांमध्ये डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर (जसे की पीओएस टर्मिनल्स आणि क्यूआर कोड) तैनात करण्यासाठी बँका आणि फिनटेकना अनुदानसहाय्य दिले जाते. 31 ऑक्टोबर 2025पर्यंत, टियर-3 ते 6 केंद्रांमध्ये पीआयडीएफद्वारे अंदाजे 5.45 कोटी डिजिटल टच पॉइंट्स लावण्यात आले होते. याखेरीज, आर्थिक वर्ष 2024-25पर्यंंत, अंदाजे 6.5 कोटी व्यापाऱ्यांना एकूण 56.86 कोटी क्यूआर कोड दिले गेले, असल्याचेही त्यांनी सांगितले.
इतर आघाडीच्या आंतरराष्ट्रीय रिअल-टाइम पेमेंट प्लॅटफॉर्मच्या तुलनेत यूपीआयची स्थिती
| देश | व्यवहारांचे प्रमाण (अब्जामध्ये) | जागतिक रिअल-टाइम पेमेंट प्लॅटफॉर्मचा % वाटा |
| भारत | 129.3 | 49% |
| ब्राझील | 37.4 | 14% |
| थायलंड | 20.4 | 8% |
| चीन | 17.2 | 6% |
| दक्षिण कोरिया | 9.1 | 3% |
| इतर | 52.8 | 20% |
| एकूण | 266.2 | 100% |
स्रोत: ‘प्राइम टाइम फॉर रिअल-टाइम’ 2024 वरील एसीआय वर्ल्डवाइड रिपोर्ट

