Homeबॅक पेज"अनलिमिटेड थाळी" आणि...

“अनलिमिटेड थाळी” आणि संपन्नतेची सूज!

विवाह समारंभाला जायचे असते तेव्हा माझ्या मनात बरंच काही सुरु असतं. मुख्यतः भोजनाची व्यवस्था हा माझा अभ्यासाचा विषय. एका जुन्या वाड्यात एका खोलीत राहण्याचा अनुभव घेतल्यानंतर आता अर्धा गुंठा आकाराच्या घरात फक्त दोन माणसे, अशा परिस्थितीचा अनुभव मी घेतो आहे. याच आठवड्यात एका विवाह समारंभाला गेलो होतो. तिथे भोजनाची व्यवस्था बुफे पद्धतीची. म्हणजे पदार्थ एका रांगेत मांडलेले. आपल्याला पाहिजे ते थाळीत वाढून घेणे आणि खुर्चीवर बसून आस्वाद घेणे. माणूस एकट्याने भोजन करतो तेव्हा तो मोजके खातो, पण समुहात भोजन करताना अंदाज येत नाही. शहरीकरणाचा उद्रेक झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ती बरोबर की चूक हा विषय नाही. कोणी काय खावे, काय प्यावे हा वैयक्तिक प्रश्न. पण एकूण सामाजिक परिस्थितीवर त्याचा होणारा परिणाम लक्षात घ्यायला हवा, असे बोललाबोलता लोक बोलून जातात.
विवाह किंवा अन्य समारंभात आपल्याला पाहिजे तेवढे ताटात घेऊन त्याचा आस्वाद घेता येतो. ही पद्धत बरी असते. यजमानांना बरे वाटते, कारण भरभरुन पदार्थ असतात. कंत्राटदार आनंदात असतो, कारण चारशे माणसांचा स्वयंपाक केला तरी पाचशे लोक आणि कंत्राटदारांचे कर्मचारीदेखील आरामात जेऊन जातात. नफा भरपूर. अर्थात जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.. हेही लक्षात घ्यायला हवे.

आमचा ज्येष्ठ लोकांचा एक ग्रूप आहे. कधीतरी सहभोजन करण्याचा योग येतो. आधी हॉटेलची निवड होते. तिथल्या थाळीचे वर्णन कोणीतरी करतो. मग तुलना वगैरे होते. नंतर तारीख ठरते. मंडळी दुपारच्या वेळी एकत्र जमतात. सकाळी थंडी असल्यामुळे स्वेटर असतो. ऊन वर येते तशी त्याची उपयुक्तता संपते. काही वेळा माणसांची अडगळ वाटते. कुणाला तशी स्वेटरची अडगळ वाटते. तो काढावा तरी पंचाईत, ठेवावा तर अडगळ अशा विचित्र परिस्थितीत आपण सापडतो. टेबल वगैरे मिळाले की, समोर येतात त्या थाळ्या. गोलमटोल. काही ठिकाणी चांदीच्यादेखील असतात. त्या रोज रात्री मोजून सगळ्या आहेत का याची पडताळणी करणे हा आणखी एक उद्योग. थाळी आली की आधी लोणचे वगैरेचा स्टॉक येतो. त्यातून नेमके काय घ्यावे या प्रश्नाचे उत्तर मिळण्याआधी भजी साईजचे बटाटेवडे येतात. ते गरम असले की पटकन खाण्याचा मोह होतो. कोथिंबीरवडी येते, दहीवडा आला की, थंडगार दही आणि खुसखुशीत वडा खाण्याचा मोह होतो. सगळे पदार्थ वाढून झाल्यानंतर भोजन सुरु करावे असा संकेत आता नाही.

इथे खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाला आहे. विशेषतः शहरी भागात माणसे अधिक स्वतंत्र झाली आहेत. देश महासत्ता किंवा पूर्ण विकसित होईल तेव्हा होईल. कदाचित आमची पिढी म्हणजे आज सत्तरीत आहेत, असे लोक त्यावेळी भिंतीवर किंवा फोटोच्या अल्बममध्ये असतील. पण आज विकास दिसतो आहे तो “अनलिमिटेड थाळ्या” समोर येतात किंवा त्यांची जाहिरात किंवा प्रचीती ऐकायला मिळते तेव्हा… दुपारच्या वेळी एक मोठी किंवा दोन छोट्या चपात्या एवढे खाणारा माणूस जेव्हा अनलिमिटेड थाळीच्या संपर्कात येतो, तेव्हा आपण बलदंड सजीव आहोत असे त्याला भासते. ऑफिसला जाताना डबा भरताना दोनतीन पोळ्या आणि दीड वाटी भाजी एवढेच असते. पण इथे ताटात भाजी आणि आमटी किंवा सार वगैरेसाठी सात वाट्या असतात. सोलकढी वेगळ्या ग्लासमध्ये येते. चटण्या वगैरे भरपूर असतातच. तीन अनलिमिटेड स्वीट. त्यात श्रीखंड, रसमलाई असे दुग्धजन्य आणि बहुधा शीतगृहात ठेवलेले पदार्थ असतात. हंगामात आमरस असतोच. हंगाम नसेल तर टीनच्या डब्यात बंद करण्यात आलेला आमरस चक्क्यात घुसळून तयार केलेले आम्रखंड असते. एकूण सगळा श्रीमंती कारभार.

लग्न

भाजीमध्ये पनीर असते बहुधा. तेही दुधापासून तयार केलेले. तेही शीतगृहात ठेवणे भाग असते. पनीरचे दोन सणसणीत तुकडे खाल्ले, अर्थात भाजीतले की अर्धे पोट भरण्याची हमी.. अनेकदा गरमागरम पुरणपोळी येते. चांगली बाब म्हणजे ती अगोदरच व्यवस्थित कापून आणलेली असते. ती अखंड बघितली तर बरीच मोठी असते. त्यावर तुपाचा मारा हवाच. ती आणखी पौष्टिक होते. तशीच खाताना पुरण अंगावर सांडू नये याची काळजी घेतलेली बरी. तूप असेल तर सांडण्याची क्रिया थोडी मंदावते, पण तुपासह सांडली तर डाग निघत नाहीत.

काही ठिकाणी आधीच थाळी भरुन येते. ही लिमिटेड थाळी असते. पण त्यातही नंतर हवे ते घेण्याचा पर्याय असतो. पण ही आधीच भरभरुन आलेली थाळी खाणे हे मोठे जिकिरीचे काम असते. इथे आग्रहाने वाढण्याचा फारसा विषय येत नाही. पण हॉटेलची मालकीण किंवा मालक ग्राहकांना काय आवडते, याचा अंदाज घेण्यासाठी विचारणा करतात. मालक कोकणातील असतील तर फणसाची साकटा भाजी आवर्जून असते आणि ते त्या भाजीची शिफारसदेखील करतात. कोकण सोडून शहरात आलेल्या माझ्यासारख्या लोकांना या भाजीची आत्मीयता असते. पण मी शक्यतो शिफारस करत नाही, कारण कोणाला काय आवडेल यापेक्षा कोणाला काय आवडणार नाही, याची मी काळजी करतो. अर्थात आपल्याकडे फणसाच्या भाजीला फारसा भाव नसला तरी काही देशांमध्ये प्रोटीनची कमतरता भरुन काढण्यासाठी फणसाची भाजी आवर्जून खायला देतात. पण ताजाताजा फणस काढून आठलांसकट केलेल्या भाजीची चव पॅकबंद पिशवीतून आणलेल्या, साठवलेल्या फणसाला कोठून येणार?

तर असे सगळे असते. पाचशे ते सातशे रुपयांची अनलिमिटेड थाळी सध्या मोठ्या शहरांमध्ये धुमाकूळ घालते आहे. त्यांच्या जाहिराती असतात. लोक अगोदर बुकिंग करुन रांगेत उभे राहतात. यानिमित्ताने कुटुंबे एकत्र होऊन भोजनाचा आस्वाद घेत आहेत. कोणाचातरी वाढदिवस कधीतरी असतोच. ते निमित्त असते. मोठ्या रस्त्यावर एका रांगेत बरीच हॉटेल अशा थाळ्या उपलब्ध करुन देत आहेत. येणारे बहुधा मोटारीने येत असल्यामुळे त्यांच्या मोटारी योग्य ठिकाणी पार्क करुन त्यांना आश्वस्त केले की, त्यांना दोन घास अधिक खाता येतात. भरभरुन थाळीचा आस्वाद घेऊन बाहेर पडताना मोफत विडा मिळाला तर कोणाला नको? तीही सुविधा अनेक ठिकाणी आहे. बाहेर मोटारी पार्क करण्यासाठी माणसे ठेवण्यात आली आहेत, तसे विडा पुरविण्याचे कंत्राटदेखील घेणारे लोक आहेत. अशा एकंदर सुखासमाधानात माणसे आहेत. अर्थव्यवस्था वेगाने धावत आहे. एकूणच ‘फील गुड’चा आभास आहे.

आम्ही उगाचच वजन वाढेल, भलता त्रास सुरु होईल वगैरे कारणे सांगून लोकांना घाबरवत असतो. पण चिंता करण्याची गरज नाही. खाओ पिओ मजा करो…

(लेखक मनोहर सप्रे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

निशांत कुमार यांनी जदयु टिकवला तरी भाजप समाधानी!

बिहारचे राजकारण आता कोणत्या दिशेला जाईल या संदर्भात वेगवेगळ्या पातळीवर चर्चा होणार आहे. तशी ती सुरुदेखील झाली आहे. बिहार हे सध्यातरी द्विपक्षीय राजकीय मैदान नाही. तीन प्रमुख आणि इतर बारीकसारीक घटक आहेत. एका बाजूला जेवढी ताकद जमा होईल त्यात...

ममतांचे हल्लागुल्ला तर ठाकरे बावचळलेले.. मग ‘इंडी’चा नेता कोण?

देशात सर्वात प्रथम १९६७मध्ये काँग्रेस पक्षाला लोकसभेत मिळालेल्या जागांची संख्या ३००पेक्षा कमी झाली होती. त्यावेळी काँग्रेस कमकुवत झाली होती. मुख्य कारण म्हणजे उत्तरेकडील राज्यांमध्ये संयुक्त विधायक दल स्थापन झाले होते. जनसंघासह सगळे विरोधी पक्ष काँग्रेसच्या विरोधात एकत्र झाले होते....

राहुल गांधी आणि भारत-चीन संबंध!

मी आंतरराष्ट्रीय विषयांचा अभ्यासक नाही. परंतु उपलब्ध साहित्य आणि संदर्भ बघितले तर काही भूमिका घेता येते. भारत आणि चीन या जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांचे आपसातील संबंध हा बराचसा नाजूक आणि संवेदनशील विषय आहे. या विषयावर लिहिताना सावधपणे लिहिणे...
Skip to content