केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज एक दिवसाच्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. काल रात्री मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने आगमन झाले. मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रवीण दरेकर आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, राजशिष्टाचार विभाग व पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आज सकाळी अमित शाह यांच्या हस्ते गोरेगावच्या नेस्कोमध्ये मेरीटाईम सप्ताहाचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी उपस्थित होते. २७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान गोरेगाव येथील नेस्को येथे होणाऱ्या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे एक स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. यामध्ये होणाऱ्या गोष्टी पाहुया.
प्रमुख सामंजस्य करार आणि गुंतवणूक: जलमार्ग पायाभूत सुविधांना गती देणारे, बंदर कार्यक्षमता वाढवणारे आणि संपूर्ण महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण करणारे अनेक सामंजस्य करार केले जात आहेत.
जलवाहतुकीतील नवोपक्रम: एक अत्याधुनिक इलेक्ट्रिक बोट उत्पादक, कॅन्डेला, मुंबईच्या जलवाहतुकीसाठी त्याचे परिवर्तनकारी उपाय प्रदर्शित करत आहे, जे शाश्वत गतिशीलतेकडे होणारे बदल अधोरेखित करते.
जागतिक सहकार्य: अबू धाबी बंदरांसारख्या भागीदारीमुळे महाराष्ट्रात व्यापार, रसद आणि रोजगार वाढण्याची अपेक्षा आहे.
उच्चस्तरीय भेटी: महाराष्ट्रातील स्टॉलला गृहमंत्री, पंतप्रधान, परदेशी राजदूत आणि प्रमुख कंपन्यांचे सीईओ यांच्यासह मान्यवर भेट देतील.

भाजपाच्या प्रस्तावित मुख्यालयाचे भूमिपूजन
त्यानंतर अमित शाह मुंबईत चर्चगेट परिसरात होऊ घातलेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रस्तावित मुख्यालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनाला उपस्थित राहतील. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चव्हाण तसेच इतर नेते याप्रसंगी उपस्थित असतील. दिल्लीत भाजपा मुख्यालयाच्या धर्तीवर भाजपाचे हे प्रदेश मुख्यालय उभे राहणार आहे.
माझगाव डॉक येथेही हजेरी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे खोल समुद्रातील दोन मासेमारी नौकांचे उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या समुद्री मत्स्य व्यवसायाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. खोल समुद्रातील मासेमारी नौका प्रकल्प प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाअंतर्गत राबविण्यात आला असून, यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य प्राप्त झाले आहे. या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील मच्छीमार सहकारी संस्थांची खोल समुद्रातील मासेमारी क्षमता वाढविणे, भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील ट्यूना व इतर सागरी संसाधनांना प्रोत्साहित करणे तसेच मच्छीमारांचे उत्पन्न वाढविणे हा आहे.
राज्यातल्या सात सागरी जिल्ह्यांतील १४ मच्छीमार सहकारी संस्थांची निवड या योजनेअंतर्गत करण्यात आली होती. यातील जय मल्हार मत्स्यव्यवसाय विविध कार्यकारी संस्था, मुंबई शहर या संस्थेचा प्रस्ताव मंजूर झाला. प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत राबविण्याच्या निर्देशानुसार या नौकांचे बांधकाम उडुपी कोची शिपयार्ड लिमिटेड, मालपे (कर्नाटक) येथे करण्यात आले आहे. प्रत्येक नौका १८ ते २२ मीटर लांबी, ४०० ते ६०० एचपी इंजिन क्षमता, स्टील हल बांधणी, रेफ्रिजरेटेड फिश होल्ड, तसेच जीपीएस, इको साऊंडर, व्हीएचएफ रेडिओ, एआयएस आणि रडार यांसारख्या अत्याधुनिक नेव्हिगेशन व संप्रेषण प्रणालींनी सुसज्ज आहे. या नौका १० ते १५ दिवसांच्या बहुदिवसीय मासेमारी मोहिमांसाठी योग्य असून, ट्यूना लाँगलाईन व गिलनेट ऑपरेशन्ससाठी सक्षम आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च ₹ २०.३० कोटी आहे.

