कोरोनावरील उपचारांत रेमडेसिविर इंजेक्शनचा अमर्याद वापर थांबवण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रात दिला जात असतानाच केंद्र सरकारने राज्य सरकारांना या इंजेक्शनचा होत असलेला पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करत ही घोषणा केली.
रेमडेसिविर या औषधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने या औषधाचा केंद्राकडून होणारा पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली या औषधाचे उत्पादन 10 पटीने वाढले असून देशाची उत्पादनक्षमता प्रतिदिन 33,000 कुप्यांवरून 11 एप्रिल 2021 रोजी प्रतिदिन 3,50,000 कुप्या झाली, असे त्यांनी सांगितले.
सरकारने केवळ एका महिन्यात रेमडेसिविरचे उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांची संख्या 20वरून 60वर नेली. आता देशात या औषधाचा पुरेसा साठा असून त्याचा पुरवठा मागणीच्या प्रमाणात खूपच जास्त आहे, अशी माहितीही मांडविया यांनी दिली. मांडविया यांनी रेमडेसिविरच्या देशातील उपलब्धतेवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश राष्ट्रीय औषध दरनिश्चिती संस्था आणि सीडीएससीओला दिले आहेत.
आकस्मिक गरजेसाठी राखीव साठा म्हणून भारत सरकारने रेमडेसिविरच्या 50 लाख कुप्या खरेदी करण्याचादेखील निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.