भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत आणि अखंड प्रवासाचा उत्तम अनुभव देतो. प्रवासाची उत्तम सोय आणि आराम देणारा, FASTag (फास्टॅग)चा वार्षिक पास या सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी एक परिपूर्ण भेट असू शकतो. देशभरातील राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रूतगती महामार्गांवर वर्षभर त्रासमुक्त प्रवास करण्यास तो उपयोगी आहे. हा वार्षिक पास राजमार्गयात्रा ॲपद्वारे आपल्या प्रियजनांना भेट म्हणून दिला जाऊ शकतो.

ॲपवरील ‘पास द्या (ॲड पास)’ या पर्यायावर क्लिक करून, वापरकर्ता ज्या व्यक्तीला FASTag वार्षिक पास भेट देऊ इच्छितो; त्याचा वाहनक्रमांक आणि संपर्काचा तपशील जोडू शकतो. सोप्या OTP पडताळणीनंतर वार्षिक पास त्या वाहनाशी जोडलेल्या FASTagवर सक्रिय होईल. त्यामुळे तुमच्या प्रियजनांना त्याचा उपयोग होईल आणि प्रत्येक वापराच्या वेळी हेच प्रियजन तुमची नक्की आठवण काढतील. FASTag वार्षिक पास राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना एक अखंड आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय देतो. तो संपूर्ण भारतात सुमारे 1,150 टोल प्लाझांवर स्वीकारला जातो. वार्षिक पासच्या एका वर्षाच्या वैधतेसाठी किंवा 200 टोल प्लाझा क्रॉसिंगसाठी 3000 रुपये शुल्क एकदाच भरल्यानंतर वारंवार FASTag पुनर्भरण (रिचार्ज) करण्याची आवश्यकता नाहीशी होते. हा पास वैध FASTag असलेल्या सर्व गैरव्यावसायिक वाहनांसाठी लागू आहे. राजमार्गयात्रा अॅपद्वारे एकदाच शुल्क भरल्यानंतर वाहनाशी जोडलेल्या विद्यमान FASTag वर वार्षिक पास दोन तासांच्या आत सक्रिय होतो.