मुंबईच्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात म्हणजेच पूर्वीच्या राणीच्या बागेत कालपासून सलग तीन दिवसांचा ‘मुंबई पुष्पोत्सव’ सुरू झाला. मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते या पुष्पोत्सवाचे उद्घाटन झाले. भारताची राष्ट्रीय प्रतिके फुलांच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचविणे ही यंदाच्या पुष्पोत्सवाची संकल्पना आहे. यंदाच्या प्रदर्शनात फुलझाडांसह वेगवेगळ्या प्रजातींच्या वनस्पती, फळझाडे, औषधी-सुगंधी वनस्पती, वेली तसेच भाजीपाला आणि मसाल्यांची रोपे मांडण्यात आली आहेत. मुंबईकरांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन गगराणी यांनी यावेळी केले.

रविवारी रात्री ८ पर्यंत पुष्पोत्सव राहणार खुला
वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे यंदाचे हे २८ वे वर्षे आहे. आज, शनिवार, १ फेब्रुवारी आणि रविवार, २ फेब्रुवारीला सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत हा पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे. मुंबई पुष्पोत्सवाच्या यंदाच्या संकल्पनेत भारताच्या राष्ट्रीय प्रतिकांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले आहे. झेंडू आणि शेवंतीच्या फुलांनी साकारलेला तिरंगा नागरिकांचे विशेष आकर्षण ठरतोय. भारतरत्न पुरस्काराची प्रतिकृती लाकडी कलाकृतीच्या माध्यमातून साकारली आहे. राष्ट्रीय फळ असलेल्या आंब्याची रचना झेंडूच्या फुलांनी तयार केली आहे. राष्ट्रीय जलचर असलेले गंगा डॉल्फिन पांढऱ्या आणि गुलाबी रंगांच्या शेवंतीच्या फुलांनी साकारले आहे. यासह कमळ, राष्ट्रीय चलन रुपया, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय वृक्ष वड, अशोक स्तंभ, गंगा नदी, मोर आदी प्रतिकेही मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पर्यावरणपूरक मांडणी
बागेसाठी लागणाऱ्या वस्तूंचे, खतांचेही प्रदर्शन येथे मांडण्यात आले आहे. निवडुंग प्रजातींचे प्रदर्शनही आहे. वेगवेगळ्या बोन्साय प्रजातींची आकर्षक मांडणी, औषधी वनस्पती, क्रेप पेपरच्या फुलांचे प्रदर्शन आणि सेल्फी पॉइंटही साकारण्यात आला आहे. पुष्पोत्सवात देशी-विदेशी रोपांची विक्रीसाठी दालने खुली करण्यात आली आहेत. तसेच कृषी साहित्य, कीटकनाशके, फवारणी यंत्रे आणि शेतीसंबंधित साधनांचेही खरेदी-विक्रीची ५०हून अधिक दालने आहेत.

पहिल्या दिवशी उसळली गर्दी
मुंबई पुष्पोत्सवाची मुंबईकर दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. या उत्सवात मुंबई आणि उपनगरांतील शाळांच्या सहलीदेखील भेट देतात. पर्यावरणाचे अभ्यासक, छायाचित्रकारही या प्रदर्शनासाठी उत्सूक असतात. काल उद्घाटनाच्या दिवशीच हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली. अनेकांनी राष्ट्रीय प्रतिकांच्या संकल्पनेचे कौतुक केले, असे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
