हंगेरी, बुडापेस्ट येथे रविवारी संपन्न झालेल्या ४५व्या ऑलिंम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय संघाने दुहेरी सोनेरी यश संपादन करताना नवा इतिहास रचला. या स्पर्धेच्या आजवरच्या ९७ वर्षांच्या मोठ्या इतिहासात भारताने प्रथमच पुरुष खुल्या आणि महिला गटाचे जेतेपद पटकावण्याचा अनोखा पराक्रम केला. या अगोदर भारताची या स्पर्धेतील मजल कांस्य पदकापर्यंतच गेली होती. परंतु हंगेरीत युवा भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करुन बलाढ्य चीन, अमेरिका, सर्बिया, अर्मेनिया, अझरबैझान, युक्रेन या देशांना मागे टाकून चक्क अव्वल क्रमांकावर झेप घेतली. हे जेतेपद मिळवत असताना भारताच्या डी. गुकेश, अर्जुन एरिगेसी, दिव्या देशमुख, वंतिका अगरवाल या चौघांनी वैयक्तिक सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
या अगोदर भारतीय पुरुष संघांनी दोन वेळा कांस्य तर महिला संघाने एक वेळा कांस्य पदकाची कमाई या स्पर्धेत केली होती. दोन वर्षांपूर्वीच चेन्नईत झालेल्या या स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांनी कांस्य पदक जिंकण्याचा पराक्रम केला होता. आता हंगेरीत त्यावर कडी करत भारतीय बुद्धिबळ संघाने आपणच ६४ घरांच्या पटाचा अनभिषिक्त सम्राट असल्याचे बुद्धिबळ विश्वाला दाखवून दिले. ११ फेऱ्यांच्या या स्पर्धेत भारतीय पुरुष संघ अपराजित राहिला. त्यामुळे भारतीय संघच विजयाचा प्रमुख दावेदार होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. महिला संघाला मात्र पोलंडकडून हार खावी लागली होती. अमेरिकेबरोबरचीदेखील त्यांची लढत बरोबरीत सुटली होती.
पुरुषांनी सहज सुवर्ण पदक मिळविताना महिलांना मात्र काहीशी कडी मेहनत करावी लागली. पुरुष विभागात एक फेरी बाकी असतानाच भारताचे अव्वल स्थान निश्चित झाले होते. तर महिला संघाला मात्र शेवटच्या लढतीत प्रथम क्रमांकासाठी अझरबैझानला नमवणे क्रमप्राप्त होते. पुरुष संघाने शेवटच्या निर्णायक ११व्या फेरीत स्लोव्हेनियाचा ३.५-०.५ गुणांनी सहज पराभव केला. डी. गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुन एरिगेसी यांनी शानदार विजय मिळवून भारतीय विजयावर शिक्कामोर्तब केले. विदित गुजरातीची चौथी लढत मात्र बरोबरीत सुटली. पहिल्या लढतीत गुकेश ब्लादीमीरला आणि दुसऱ्या सामन्यात अर्जुनने सुबेजिवर मात करून सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने फिरवले.
महिला विभागात शेवटच्या फेरीत भारताने अझरबैझानवरदेखील ३.५-०५ गुणांनी आरामात विजय मिळवून आपलेदेखील विजेतेपद निश्चित केले. द्रोणावली हरिका, दिव्या देशमुख, वंतिका अगरवाल या तिघींनी आपल्या लढती जिंकून सुवर्णपदकावर मोहोर उमटविली. आर वैशालीची चौथी लढत मात्र बरोबरीत सुटली. भारतीय पुरुष संघाने २२पैकी २१ गुणांची कमाई केली. उझबेकिस्तानविरुद्धचा सामना वगळता भारताने इतर सर्व प्रतिस्पर्ध्याना नमविले. त्यामध्ये बलाढ्य चीन, अमेरिका, सर्बिया, स्लोवेनिया या संघांचा समावेश होता. उझबेकिस्तानविरुद्ध भारताची लढत २-२ अशी बरोबरीत सुटली. भारतीय महिला संघाने १९ गुणांची कमाई करून प्रथम क्रमांकावर झेप घेतली. महिला संघाला काहीश्या दुबळ्या पोलंडकडून हार खावी लागली.
एकाच स्पर्धेत एकाच देशाच्या दोन्ही संघांनी सुवर्ण पदक जिंकण्याची ही स्पर्धेच्या इतिहासातील केवळ ७वी वेळ होती. अगोदर ६ देशांनी असे दुहेरी यश एकाच स्पर्धेत संपादन केले होते. अर्जुन, गुकेशने अनुक्रमे १०, ९ गुणांची कमाई केली. या स्पर्धेत गुकेश पहिल्या पटावर खेळत होता. त्याने ८ सामने जिंकले, २ बरोबरीत सोडविले. अर्जुन तिसऱ्या पटावर खेळत होता. त्याने १० गुण मिळवले. त्यामध्ये ९ विजय होते तर त्याच्या २ लढती बरोबरीत सुटल्या. विदितने ७.५, प्रज्ञानंदने ६, हरिकृष्णने २.५ गुण मिळविले. महिला विभागात दिव्या देशमुख सर्व ११ फेऱ्यांमध्ये खेळली. तिने ९.५ गुणांची कमाई केली. ८ सामने जिंकताना तिने ३ लढती बरोबरीत सोडविल्या. वंतिकाने ९ लढतीत ७.५ गुण मिळविले. त्यामध्ये ६ विजय होते, तर ३ लढती अनिर्णित राहिल्या होत्या. वैशालीने ६, द्रोणावलीने ४.५, तानियाने ३.५ गुण मिळविले. २००२नंतर या स्पर्धेत प्रथम मानांकन देण्यात आलेल्या कुठल्याच संघाला जेतेपद पटकाविता आलेले नाही. २००२मध्ये रशियन संघाने प्रथम मानांकन मिळाले असताना ही स्पर्धा जिंकली होती. पुरुष विभागात भारतीय संघ एकूण ४४ सामने खेळला. त्यामध्ये अवघा १ पराभव भारताच्या नावे लागला. तर महिलांमध्ये मात्र ५ खेळाडूंना हार खावी लागली. पुरुष गटात भारतापाठोपाठ अमेरिकेचा दुसरा, तर उझबेकिस्तानचा तिसरा क्रमांक लागला. महिला विभागात कझाकिस्तानचा दुसरा आणि अमेरिकेचा तिसरा क्रमांक लागला. प्रज्ञानंद आणि वैशाली हे दोघे भाऊ-बहिण आहेत. प्रथमच २ सुवर्ण पदके आता एका घरात आली आहेत. अनुभवी हरिकाचे हे सलग १०वे ऑलिंपियाड होते. १०व्या ऑलिंपियाडमध्ये सुवर्ण पदक हरिकाच्या नावावर लागले. विशेष म्हणजे ती लवकरच बाळाला जन्म देणार आहे. या परिस्थितीत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे.
यंदाच्या स्पर्धेत पुरुष गटात १९४ देशांचे ९७७ खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये २४५ ग्रँडमास्टर होते. तर महिलांमध्ये १८० देशांचे ९०७ खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये १७ ग्रँडमास्टर खेळाडूंचा समावेश होता. २०२२मध्ये चेन्नईत झालेल्या स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांनी कांस्य पदके मिळविली होती. त्यावेळी पुरुष संघाचे प्रशिक्षक श्रीनाथ नारायण आणि महिला संघाचे प्रशिक्षक अभिजित कुंटे हे होते. त्यांनाच हंगेरी येथे झालेल्या स्पर्धेत अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने प्रशिक्षक म्हणून कायम ठेवले होते. त्याचा मोठा फायदा भारताला नक्कीच झाला. या दोघांनी लढविलेल्या व्यूहरचनेला खेळाडूंनी उत्तम साद दिल्यामुळे भारतीय संघ हे दैदिप्यमान यश मिळवू शकला. दोघांनी या स्पर्धेसाठी संघाची चांगली तयारी करुन घेतली. खेळाडूंवर कुठलेही दडपण टाकले नाही. त्यांचा आहे तो खेळ कायम ठेवला. पुरुष गटात अर्जुन सर्वोत्तम मानांकन असलेला खेळाडू होता. त्याला तिसऱ्या पटावर खेळविण्याची प्रशिक्षकांची चाल यशस्वी ठरली. पहिल्या दोन पटावर गुकेश, प्रज्ञानंद यांनादेखील खेळविण्याची केलेली व्यूहरचना भारतासाठी चांगलीच फलदायी ठरली. या स्पर्धेअगोदर खेळाडूंशी सल्लामसलत केली होती. तिघांनीदेखील कुठले आढेवेढे न घेता श्रीनाथ यांची व्यूहरचना मान्य केली.
२०२१मध्ये कुंटे यांची भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. तेव्हापासून भारतीय महिला संघाची कामगिरी चांगली सुधारत आहे. चार स्पर्धांमध्ये भारतीय महिला संघाने यश मिळविले. ऑलिंपियाड, जागतिक सांघिक स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समावेश होता. प्रशिक्षक होण्याअगोदर भारतीय संघाला फारसे यश मिळाले नव्हते. त्यामुळे भारतीय यशात कुंटे यांचादेखील महत्त्वाचा वाटा आहे असे म्हणावे लागेल. १९२७ साली लंडनमध्ये बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेला प्रथम सुरुवात झाली. १९५० महायुद्ध सुरु होईपर्यंत ही स्पर्धा दरवर्षी होत होती. २ महायुद्धांमुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. महायुद्धापूर्वी दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जात होते. महायुद्धानंतर दर २ वर्षांनी ही स्पर्धा घेण्यात येते.
भारताने १९५६ साली या स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतला. त्यावेळी भारतीय संघात रामदास, बी. पी. मासेलकरसिंग, एस. व्यंकटरामन, आर. बी. सप्रे यांचा समावेश होता. ‘क’ गटात असलेल्या भारतीय संघाने तिसरा क्रमाक मिळविला होता. रशियाने ही स्पर्धा जिंकली होती. २०१४च्या या स्पर्धेत भारताने पुरुष गटात पहिले कांस्य पदक जिंकले होते. टी. नेगी, पी. सेतूरामन, के. शशिकिरण, ए. भास्करन, ललितबाबू यांचा भारतीय कांस्य पदक विजेत्या संघात समावेश होता. विजेत्या चीननंतर भारत-हंगेरी दोघांचे समान १७ गुण झाले होते. परंतु सरस टायब्रेकच्या आधारे हंगेरीला रौप्य आणि भारताला कांस्य पदक मिळाले. तामिळनाडूचे बुजूर्ग खेळाडू मॅन्युअल अॅरोन १९६१ साली पहिले ग्रँडमास्टर बनले. तर तब्बल १७ वर्षांनंतर व्ही. रविकुमार भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय मास्टर झाला.
१९८८मध्ये विश्वनाथन आनंद भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बनला. २०००मध्ये आनंदने विश्वविजेतेपद पटकावले. त्यानंतर त्यानी आणखी जागतिक स्पर्धा जिंकून बुद्धिबळ खेळाच्या विकासासाठी नवी मुहूर्तमेढ रोवली. आनंदने आपल्या चेस अकादमीमधून अनेक युवा खेळाडू घडविले. गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुन, वैशाली, वंतिका या आनंदच्याच अकादमीमधील खेळाडू आहेत. त्यामुळे भारत आज आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ विश्वात स्वतःचा दबदबा निर्माण करू शकला. एस. विजयालक्ष्मी भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर झाली. भारतीय संघातील बहुतेक खेळाडू तरुण आहेत. त्यामुळे आणखी काही वर्षे तरी हे खेळाडू भारतीय बुद्धिबळाची धुरा समर्थपणे सांभाळतील यात शंका नाही. गेल्या दशकात ज्याप्रमाणे रशियाने बुद्धिबळ विश्वावर साम्राज्य निर्माण केले होते. तसेच साम्राज्य येणाऱ्या काळात भारत निर्माण करेल असे म्हटले तर वावगे ठरु नये. कारण, युवा खेळाडूंची सध्या खूप मोठी फळी भारतामध्ये तयार होत आहे. सध्या भारतात ८५ ग्रँडमास्टर आहेत. त्यामध्ये युवा खेळाडूंचा मोठा समावेश आहे. जागतिक क्रमावारीत अव्वल १०० खेळाडूंमध्ये पुरुष विभागात भारताचे ११ तर महिला विभागात भारताचे ९ खेळाडू आहेत, ऑलिंपियाडमधील यशामुळे या खेळाला भारतात आणखी चांगले दिवस येतील यात शंका नाही. आता आगामी नोव्हेंबर महिन्यात सिंगापूर येथे जागतिक विजेतेपदासाठी गुकेश आणि चीनचा डींग लिरेन यांच्यात मुकाबला होणार आहे. ही लढत जिंकून गुकेश भारतीय बुद्धिबळप्रेमींना विजयाची आगळी भेट देईल अशी आशा करुया.