महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरेंचे चालले तरी काय, हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घुटमळतोय. त्याचं कारणही तसंच आहे. जो विषय प्रत्यक्षात उतरलाच नाही, त्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रणकंदन करत आहेत, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एका अल्पसंख्याक समाजाच्या मतांचा आधार घेत आपले अस्तित्त्व टिकवणारे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचा हात पकडण्यासाठी उतावळे झाले आहेत. त्याचप्रमाणे शिवसेना (उबाठा) गटाचे दुसरे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या माध्यमातून हातवारे करण्यापासून पानचट विनोद करण्यात आपला बालिशपणा दाखवत आहेत. अशावेळी मराठी माणूस यांच्याबद्दल नेमका काय विचार करत असेल याची कल्पनाच केलेली बरी!
केंद्र सरकारने सुचवल्याप्रमाणे त्रिभाषा सूत्र स्वीकारण्याचा निर्णय घेतला गेला तो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. महाविकास आघाडी सरकारच्या सरकारने.. याची अंमलबजावणी कशी करायची यादृष्टीने अभ्यास करण्यासाठी या सरकारनेच डॉ. माशेलकर यांची 18 सदस्यीय समिती गठित केली. या समितीने दिलेला अहवाल याच सरकारने स्वीकारला. तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीनंतर तयार करण्यात आलेल्या इतिवृत्तावरही उद्धवजींच्या सह्या आहेत. या समितीने शालेय स्तरापासून म्हणजेच पहिलीपासून बारावीपर्यंत हिंदी, हा तिसरा सक्तीचा विषय करण्याची शिफारस केली. या शिफारसींवर ठाकरे सरकारच्या काळात शासननिर्णय झाला नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली महायुतीचे सरकार महाराष्ट्रात अडीच वर्षं होते. तेव्हाही या शिफारशींवर निर्णय केला गेला नाही. या साऱ्या शिफारसी थंड्या बस्त्यातच ठेवण्यात आल्या. मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर दिसू लागताच चाणाक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी व अमराठी असा वाद निर्माण होऊ शकेल, अशी खेळी केली. यासाठी त्यांनी अलीकडेच प्रखर हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागलेल्या मनसे प्रमुखांना म्हणजेच राज ठाकरेंना हाताशी धरले असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. थंड्या बस्त्यात पडलेला हिंदीचा मुद्दा बाहेर काढला गेला आणि पहिलीपासून महाराष्ट्रात हिंदी हा तिसरा विषय सक्तीचा करण्याचा शासननिर्णय जारी झाला. यावर मराठीप्रेमी संघटनांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली तेव्हा लगेचच यात सुधारणा करून राज्य सरकारने तिसरी भाषा ऐच्छिक ठरवली. ज्या वर्गातील 20 विद्यार्थी एखाद्या भाषेच्या बाजूने कौल देतील ती भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल, मग ही भाषा हिंदी का असेना, असा शासननिर्णय जारी करण्यात आला. त्यावर, हा अप्रत्यक्ष हिंदीसक्तीचा प्रकार आहे, असा आरोप या मराठी संघटनांनी सुरू केला. पुढे राज ठाकरे यांनी हिंदीची ही सक्ती आहे, अशी हाळी दिली आणि नंतर हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात खपवून घेणार नाही असे सांगत आंदोलन उभे करण्याचे जाहीर केलं.

हिंदुत्वापासून बऱ्यापैकी दूर गेलेले उद्धव ठाकरे यांनाही मुंबई महापालिका जिंकण्यासाठी आता मराठी माणसाची आठवण झाली नसती तरच नवल होते. त्यांनी लगेचच राज ठाकरे यांच्या हिंदीविरोधातील आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदी भाषेच्या प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष सक्तीच्या संदर्भातील दोन्ही शासननिर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्रित मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे बंधूंना जेमतेम 8000 लोकांची आसनक्षमता असलेल्या वरळीच्या एनएससीआय डोममध्ये विजयी मेळावा घ्यावा लागला. यात तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. तसे पाहिले तर एका डिजिटल मीडियाला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी आमच्यातली भांडणं गौण आहेत, असे काय म्हटले आणि उद्धव ठाकरे त्यांच्या पिछाडीलाच पडले. लगेचच त्यांनी जाहीर प्रतिसाद देत काही अटी टाकल्या. मात्र, राज ठाकरेंनी त्यांना दाद दिली नाही. इतकेच नव्हे तर मनसेचे दुसऱ्या फळीतले नेते उद्धवजींच्या प्रतिसादाबद्दल संशय घेऊ लागले. त्यामुळेच मराठीचा मुद्दा जेव्हा त्यांना सापडला तेव्हा तर त्यांना घबाडच सापडल्याचा आनंद झाला. मराठी भाषेसाठी लढणाऱ्या एका संघटनेचे नेते दीपक पवार यांच्या सहकार्याने मोर्चा काढण्याचे निश्चित झाले असतानाही उद्धवजींनी ती तारीख बदलून राज ठाकरेंबरोबर संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला आणि पुढे मेळाव्यात त्यांच्याबरोबर एका व्यासपीठावर हजेरीही लावली. यावेळी बोलतानाही त्यांनी, आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी.. असे घोषित करून टाकले.
त्यानंतर त्यांच्या पक्षाचे नेते व प्रवक्ते खासदार संजय राऊत वरचेवर ‘ठाकरे’ ब्रँडचा उल्लेख करत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या आणाभाका घेऊ लागले. पक्षाचे अघोषित मुखपत्र, सामन्यात पहिल्या पानावर राज ठाकरे झळकू लागले. मात्र, राज ठाकरेंनी उद्धवजींच्या शिवसेनेबरोबर राजकीय युतीचा निर्णय निवडणुकांच्या वेळीच घेतला जाईल, असे स्पष्ट केले. आम्ही दोघं मराठी भाषेपुरताच एकत्र आलो होतो, पुढचा निर्णय नंतर घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केलं. राज यांनी उद्धवजींबरोबरच्या युतीचा निर्णय पुढे ढकलल्यानंतर लगेचच उद्धवजी तसेच संजय राऊत यांच्याकडून, दोन भाऊ एकत्र येतात हे पाहून यांना पोटशूळ उठला. हे दोघे भाऊ एकत्र येऊ नये याकरीता प्रयत्न केले जातील, असे सांगून विरोधकांवर आगपाखड करायला सुरूवात केली. तिकडे राज ठाकरेंनाही मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मराठी माणसाकडे सरकण्याची संधी मिळाली. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मीरा रोडला मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी एका उत्तर भारतीयाला चोप दिला. त्यावरून तिथे अमराठी भाषिक व्यापाऱ्यांनी मनसेविरोधात मोर्चा काढला. दरम्यान, केडिया नावाच्या एका गुजराती व्यापाऱ्याने आपल्याला मराठी शिकायचं नाही, असे ट्विट केल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ऑफिसची तोडफोड केली. मीरा रोडमधल्या व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्त्युत्तर देण्यासाठी मनसेकडून मीरा रोडमध्ये मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी सुरुवातीला याला परवानगी नाकारली. त्याचे भांडवल करत मनसेने या मुद्द्यावर अधिक आक्रमक भूमिका घेतली. राजच्या कडेवर बसण्यासाठी आतूर असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही या मोर्चात सहभागी झाले. त्यापाठोपाठ 18 तारखेला राज ठाकरे यांनी मीरा रोडमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेतही त्यांनी महाराष्ट्रात हिंदीची सक्ती नसतानाही तसेच करण्याचा प्रयत्न असल्याचा आभास निर्माण करत मुख्यमंत्री फडणवीस यांना आव्हान दिले. त्याचप्रमाणे राज ठाकरेंवर टीका करणारे भाजपाचे खासदार दुबे यांचाही समाचार घेतला. मराठीला विरोध करणाऱ्याच्या कानाखाली मारण्याचा इशारा देत त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर कार्यकर्त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला.

हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेत उभी फूट पडण्यास कारणीभूत ठरले ते पूर्वीच्या एकसंघ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची लालसा. आपले चिरंजीव आदित्य ठाकरे यांना कधी एकदा मुख्यमंत्रीपदावर बसवतो, यासाठी अगतिक झालेल्या उद्धवजींनी भाजपाबरोबर युतीत निवडणूक लढवून सत्तेचे समीकरण जुळेल असे संख्याबळ मिळूनही पूर्वीच्या एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसबरोबर जात महाविकास आघाडीची मोट बांधली. यानिमित्ताने उद्धवजींच्या पुत्रप्रेमाला हवा घालत चतुर शरद पवार यांनी शिवसेनेला भाजपापासून दूर करण्यात यश मिळवले. मात्र आदित्यना मुख्यमंत्रीपदावर बसविण्यास असमर्थता व्यक्त करून सत्तेचे जोखड आणि मुख्यमंत्रीपदाची माळ उद्धवजींच्या गळ्यात मारली. आता आपण खुर्चीत बसलो, पुढे आदित्यना आपले मुख्यमंत्रीपदाचे दावेदार बनवू, या कल्पनेत दंग झालेल्या उद्धवजींसाठी आकाशच ठेंगणे होते. आदित्यना त्यांनी कॅबिनेट मंत्री करून आपल्या जोडीला घेतले. त्यामुळे आदित्यनाही चांगलेच बळ मिळाले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्याच्या खात्यात हस्तक्षेप करत ते कोणाला ठेके द्यायचे, कोणाला कंत्राट पुरवायचे, कितीचे टेंडर काढायचे, याचे आदेश देऊ लागले. त्यामुळेच शिवसेनेचे मंत्री प्रचंड अस्वस्थ झाले. मंत्रीपद उपभोगून हाती काहीच लागत नाही हे लक्षात येतात हे सर्व मंत्री हळूहळू एक होऊ लागले. यातच कोविडची साथ होती. उद्धवजींना तसेच बरेचसे आजार आहेत. त्यामुळे त्यांनी सर्वसामान्यांपासून लांब राहणे पसंत केले. आदित्यनाही घराबाहेर पडू दिले नाही. परिणाम असा झाला की, शिवसेनेचे आमदारही मातोश्रीच्या दारावरूनच माघारी परतू लागले. याचा एकत्रित परिणाम पुढे एकनाथ शिंदे यांच्या उठावात झाला आणि पुढे काय झाले हे सर्वांनी पाहिले..
या उठावामागे भाजपा होती आणि आजही ती शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे हे लपून राहिलेले नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला जनतेने पसंती दिल्याचे दिसून आले. यानंतर उद्धव ठाकरे यांचे बरेचसे समर्थक शिंदेंच्या वळचणीला गेले. त्यामुळे बिथरलेले आदित्य ठाकरे यांनी अधिवेशनाच्या काळात सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंना निर्लज्ज, एहसानफरामोश, गद्दार, बेशरम असे शब्द वापरत त्यांच्यावर टीका केली. त्यांच्यावर सतत टीका करणारे मंत्री नितेश राणे माध्यमांशी बोलत असल्याचे पाहून माध्यमांच्या प्रतिनिधींना भेटण्यास जात असलेले आदित्य ठाकरे यांनी, शी.. शी.. कचरा साफ होतोय, असे वक्तव्य करून आपल्या बालबुद्धीचे प्रदर्शन केले. सभागृहातही त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांकडून दिल्या जात असलेल्या उत्तराच्या वेळी हातवारे करून आपण अजूनही मॅच्युअर्ड झालेलो नाही हे दाखवून दिले.

उद्धव ठाकरेंना आता मुंबई महापालिका जिंकण्याची इतकी घाई लागली आहे की त्यासाठी ते महाविकास आघाडी सोडायलाही तयार आहेत. राज ठाकरेंशी जवळीक करताना मराठी माणूस आणि ‘ठाकरे’ ब्रँड असे समीकरण जुळवण्याच्या ते प्रयत्नात आहेत. इतकेच नव्हे तर सामन्यात प्रसिद्ध झालेल्या नेहमीच्या घीसापिटा मुलाखतीत त्यांनी संजय राऊत यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ‘ठाकरे’ ब्रँडचा उल्लेख केला. मराठी माणसाने हा ब्रँड मानला आहे. ठाकरे घराण्याची पाळंमुळं फार खोलवर रुजली आहेत. जास्त मागे जायला नको, तर माझे आजोबा प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब, मी, आदित्य आणि आता राजही सोबत आलाय.. असे सांगत उद्धवजींनी ‘ठाकरे’ ब्रँडचं महत्त्व विषद केलं. याच मुलाखतीत, विधानसभा निवडणुकीप्रमाणे जर आघाडीच्या नेत्यांमध्ये तू.. तू.. मै.. मै.. होणार असेल तर आघाडी ठेवण्यात काय अर्थ आहे, असे म्हणत त्यांनी आपला एक पाय बाहेर असल्याचे दाखवून दिले आहे. पण त्यांना अजून हे समजले नाही की, ‘ठाकरे’ हा ब्रँड महाराष्ट्राचा वा मुंबईचा केव्हाच नव्हता. तसे असते तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हटाव लुंगी, बजाव पुंगीसारखे आंदोलन पुकारल्यानंतर काही काळातच दोन्ही ठिकाणी त्यांना एकहाती सत्ता मिळाली असती. कित्येक वर्षांचे संघटन निर्माण केल्यानंतरही बाळासाहेबांना त्यांच्या हयातीत युतीतच राज्याची सत्ता मिळाली. मुंबई महापालिकाही युतीतच जिंकता आली. अगदी मागच्या एकहाती सत्तेतही उद्धवजींना भाजपाने राज्यातल्या सत्तेच्या स्थैर्यापोटी मुंबई महापालिका आंदण दिली. बाळासाहेबांच्या काळातही उद्धवजी म्हणत असलेला ‘ठाकरे’ ब्रँड कधी मराठी माणसांचा झाला नाही, तो राज किंवा उद्धव किंवा हे दोघेही एकत्रित आले तरी काय होणार? हा ब्रँड फक्त शिवसैनिकांचाच आहे. तोही बाळासाहेबांना मानणाऱ्या कडव्या शिवसैनिकांचा. आजच्या पिढीतल्या मराठी तरूणांना बाळासाहेब कोण इथपासून सांगावे लागते. उद्धवजी, आदित्यजी, राज ठाकरे यांच्या ‘मराठी’वरच्या राजकारणाला ही पिढी विटली आहे. मराठी मतदारांची ही मानसिकता यांना कदाचित निवडणुकीनंतरच कळेल.
लेख चांगला झालाय पण भाजप कde zukalela wattoy. Hindichi apratyaksha sakticgh hoti aani karayach aahe