‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सूरज चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या ज्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या चित्रपटाच्या प्रमोशनला नुकताच मुहूर्त लागलाय. मोरगावच्या गणपतीबाप्पाचा आणि जेजुरीच्या खंडोबाचा आशीर्वाद घेत सूरज चव्हाणने ‘झापुक झुपूक’ सिनेमाच्या प्रमोशनची सुरुवात केली आहे. खंडोबाच्या चरणी सूरजने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर ठेवून, बाप्पाचा आशीर्वाद घेतला आहे. इतकंच नव्हे तर जिओ स्टुडिओज प्रस्तूत आणि केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाची आज एक छोटीशी झलकही त्याने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करुन प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घातली आहे.

सूरज चव्हाणसोबत या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हलाखीच्या परिस्थितीतून वर येत सूरजने स्वतःचं वेगळं असं छान विश्व तयार केलं. त्यामुळे सूरजचे चाहते त्याच्या ह्या नवीन प्रवासासाठी उत्सुक आहेत. हा चित्रपट कौटुंबिक आणि मनोरंजनने भरपूर अशी एक धमाल लव्हस्टोरी आहे. सिनेमाची कथा नक्की काय आणि कशी असणार आहे याचा उलगडा २५ एप्रिलला सिनेमागृहातच जाऊन बघूया.