चीनमध्ये झालेल्या आशिया खंडातील प्रतिष्ठेच्या आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने आपले विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावून आशियात भारतीय हॉकीचाच दरारा असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. या स्पर्धेत भारतीय संघाने गतवेळचे अजिंक्यपद कायम राखताना जेतेपदाला साजेशी कामगिरी करुन आपणच या स्पर्धेचे विजेतेपदाचे दावेदार असल्याचे दाखवून दिले. संपूर्ण स्पर्धेत सर्व सामने जिंकणारा भारत हा एकमेव संघ होता. त्यामुळेच भारतीय संघाचे हे यश अधिक उल्लेखनीय म्हणावे लागेल. ऑलिम्पिकनंतर झालेल्या या स्पर्धेत भारतीय हॉकी महासंघाने काही प्रमुख खेळाडूंना विश्राती दिली तर काही युवा खेळाडूंना आशियाई स्पर्धेत संधी दिली. अशा परिस्थितीतदेखील शानदार खेळ करुन भारताने आपली विजयाची मोहोर उमटविली. विशेष म्हणजे २०११ साली चीनने या स्पर्धेचे प्रथमच आयोजन केले होते. तेव्हादेखील भारतीय संघच विजयी ठरला होता. आता तब्बल १३ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर झालेल्या या दुसऱ्या स्पर्धेत त्याच विजयाची भारतीय संघाने पुनरावृत्ती केली.
यंदाच्या स्पर्धेत यजमान चीनला ३-० असे सहज नमवन भारताने आपल्या विजयी अभियानाला प्रारंभ केला. मग त्यानंतर एकापाठोपाठ एक सरस विजय मिळवून भारताने रुबाबात अंतिम फेरीत प्रवेश केला. निर्णायक लढतीत पुन्हा एकदा यजमान चीनवर मात करुन भारताने विजयाला गवसणी घातली. प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या चीनी संघाने भारताला विजयासाठी चांगलेच झुंजवले. पहिल्या तीन सत्रात गोलफलक कोराच राहिला. अखेर चौथ्या सत्रात जुगराज सिंग भारताच्या मदतीला धावून आला. त्यानेच एक शानदार गोल करुन भारतीय विजयास मोठा हातभार लावला. मग हीच आघाडी भारतीय संघाने भक्कम बचाव करुन सामन्यातील शेवटच्या सेकंदापर्यंत कायम राखली. चीनविरुद्ध झालेल्या आतापर्यंतच्या १० लढतीत भारताचा हा ९वा विजय होता. २०१३च्या या स्पर्धेत चीनने भारताला नमविण्याचा पराक्रम केला होता. आशियाई स्पर्धेत झालेल्या आतापर्यंतच्या ६ लढतीत भारताचा चीनवर पाचवा विजय होता.
आता आशिया खंडात चीनचा हॉकी संघ नवी ताकद म्हणून उदयाला येत आहे. कारण या स्पर्धेत त्यांनी बलाढ्य पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पेनेल्टिशूटआऊटमध्ये पराभव करुन धक्कादायक विजयाची नोंद केली होती. साखळी लढतीत पाकिस्तानने त्यांचा ५-१ असा दणदणीत पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला चीनने उपांत्य फेरीत लगेचच घेतला. दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताने मात्र द. कोरियाचा ४-१ गोलाने आरामात पराभव केला. भारतीय कर्णधार हरमनप्रित सिंगने पैनेल्टीकॉर्नरवर दोन शानदार गोल केले. तर नवोदित उत्तम सिंह, जरमनप्रित सिंगने प्रत्येकी एक गोल करुन भारतीय विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. याअगोदर साखळी लढतीत भारताने द. कोरियाला ३-१ असे नमविले होते. पारंपारिक भारत-पाकिस्तान या दोन संघातील लढतीकडे दोन्ही देशांच्या हॉकीप्रेमींचे लक्ष होते. या सामन्यात अटीतटीच्या लढतीत भारताने २-१ अशी बाजी मारली. भारतीय विजयात कर्णधार हरमनप्रित सिंग याचाच मोलाचा वाटा होता. त्यानेच दोन्ही गोल केले.
२०१६पासून भारताचे पाकिस्तानवर नेहमीच वर्चस्व राहिले आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. गतवर्षी आशियाई स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा १०-२ गोलांनी धुव्वा उडवला होता. तर २०२२च्या चेन्नईत झालेल्या या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला ४-० असे नमविले होते. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये भारतीय संघ पाकिस्तानला सहज नमवू लागला आहे, त्याचाच प्रत्यय आता हॉकीदेखील येऊ लागला आहे असे म्हणावे लागेल. अलिकडच्या काळात चांगल्या खेळाडूंची वानवा पाकिस्तानी संघात जाणवते. तसेच तेथील संघटनेमधील गलिच्छ राजकारणामुळे या दोन्ही खेळात पाकिस्तानची गच्छंती सुरु झाली. भविष्यात हे चित्र बदलले नाही तर या दोन्ही खेळात पाकिस्तानचे काही खरे नाही. कांस्यपदकाच्या लढतीत पाकिस्तानने द. कोरियाचा ५-३ असा पराभव करुन शेवटी थोडीफार आपली अब्रू वाचवली. भारताने या अगोदर २०११, २०१६, २०१८, २०२३मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. यजमान असताना ही स्पर्धा जिंकणारा भारत हा एकमेव देश आहे.
भारताने या स्पर्धेत साखळी लढतीत चीनचा ३-०, जपानचा ५-०, मलेशियाचा ८-१, द. कोरियाचा ३- १ आणि पाकिस्तानचा २-१ असा पराभव केला होता. धारदार आक्रमण आणि भक्कम बचाव हेच भारतीय संघाच्या यशाचे गमक होते. पेनेल्टीकॉर्नर आणि मैदानी गोल करण्यावर जास्तीतजास्त भर भारतीय संघाने दिला. त्यामुळेच भारताने या स्पर्धेत सफाईदार विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच वेगवान आक्रमण करायचे आणि गोल करुन आघाडी घ्यायची ही नवी रणनीती भारताने या स्पर्धेत आखली होती. ती यशस्वी झाली असेच म्हणावे लागेल. स्पर्धेतील एकूण झालेल्या ७पैकी ५ सामन्यात सुरुवातीच्या पहिल्या सत्रात गोल करण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला होता. नवोदित गोलरक्षक पाठक, करकेरा यांनी शानदार गोलरक्षण करुन श्रीजेशची उणीव जाणवू दिली नाही. या स्पर्धेत भारतीय संघावर अवघे ५ गोल लागले तर भारताने या स्पर्धेत तब्बल २६ गोलांची नोंद केली. भविष्यात श्रीजेशसारख्या कामगिरीची या दोघांकडून अपेक्षा बाळगायला हरकत नाही.
ऑलिम्पिकप्रमाणेच भारतीय कर्णधार हरमनप्रित सिंगने पुन्हा एकदा या स्पर्धेवर आपल्या जादुई खेळाची छाप पाडली. भारतीय विजयात त्याने आपली भूमिका चोख पार पाडली. त्यांनीच या स्पर्धेत सर्वाधिक ७ गोल केले. तसेच पेनल्टीकॉर्नरवर हमखास गोल करण्याचा धडाका हरमनप्रितने येथेदेखील कायम राखला. हरमनप्रित सिंगला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराचा तोच खराखुरा मानकरी होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हरमनप्रितला संघातील युवा खेळाडूची चांगली साथ मिळाली. अभिषेक, संजय, उत्तम सिंग, सुखजित सिंग, राजकुमार, जुगराज या युवा खेळाडूंनीदेखील स्पर्धेत चांगली कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारताने या स्पर्धेची ६व्यांदा अंतिम फेरी गाठली होती. ६पैकी ५ वेळा भारताने अंतिम लढत जिंकली. २०१२च्या दोहा येथील स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. तो अपवाद वगळला तर इतर वेळा भारताचीच सरशी झाली आहे.
ऑलिंपिकमधील कांस्यपदक आणि त्यापाठोपाठ लगेचच आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेचे विजेतेपद ही भारतीय हॉकीला नवी संजीवनी देणारी ठरेल अशी आशा करायला हरकत नाही. येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारतीय संघ अशीच सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करेल. हेच चित्र सध्यातरी दिसत आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या वर्षातील सर्वोत्तम हॉकी खेळाडूसाठी भारतीय कर्णधार हरमनप्रित सिंग आणि सर्वोत्तम गोलरक्षकासाठी श्रीजेश या दोघांना या दोन पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे. हे दोन्ही पुरस्कार भारताच्या या स्टार खेळाडूंना मिळतील अशी खात्री भारतीय हॉकीप्रेमी बाळगून असतील.