Monday, December 23, 2024
Homeमाय व्हॉईसजे हिंदुत्व बाळासाहेबांचे...

जे हिंदुत्व बाळासाहेबांचे तेच खणखणीत हिंदुत्व उद्धव ठाकरेंचे!

महाराष्ट्र विधानसभेच्या एका निवडणुकीत मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील शिवसेना-भाजप युतीच्या जाहीर सभेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, बंगालमध्ये राहतो तो बंगाली आणि याच न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू. आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व. आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नाही. हीच हिंदुत्वाची व्याख्या पुढे तेव्हाच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरिओम करीत संपूर्ण महाराष्ट्रात दुमदुमविली. पण २०१९च्या २८ नोव्हेंबरला जसे उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासमवेत महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्त्व स्वीकारले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा आपल्या समर्थ खांद्यावर घेतली. तेव्हापासून भारतीय जनता पक्षाचे नेते अस्वस्थ झाले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला तीलांजली दिल्याची कोल्हेकुई सुरू केली. ही कोल्हेकुई शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फोडून सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली तरीही सुरुच आहे. मोघलांना जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी जसे संताजी धनाजी दिसत होते तद्वतच या लोकांना सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्रीसुद्धा उद्धव आणि आदित्य ठाकरे दिसत आहेत. मग जनाब, मौलाना अशी बिरुदावली लावायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत.

खरं पाहायला गेले तर १९८७च्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे डॉ. रमेश प्रभू यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने सर्वप्रथम हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आणि या निवडणुकीत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने डॉ. प्रभू यांना समर्थन दिले होते आणि भारतीय जनता पार्टीने जनता दलाच्या प्राणलाल व्होरा यांना पाठिंबा दिला होता. शिवसेना या निवडणुकीत जिंकली. काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रभाकर कुंटे यांनी डॉ. प्रभू यांच्याविरोधात निवडणूक याचिका दाखल करताना हिंदुत्वाचा, धर्माच्या आधारे प्रचार केल्यामुळे शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. परिणामी बाळासाहेब ठाकरे आणि डॉ. रमेश प्रभू या दोघांना सहा वर्षांसाठी मतदानासाठी बंदी घालण्यात आली. डॉ. प्रभू यांची आमदारकी रद्द ठरविण्यात आली. हिंदुत्वासाठी ही किंमत शिवसेना, शिवसेनाप्रमुख आणि डॉ. रमेश प्रभू यांना मोजावी लागली.

भाजपचे चाणक्य प्रमोद महाजन यांना या निवडणुकीमुळे हिंदुत्वाचे कार्ड चालू शकते अशी उपरती झाली आणि मग त्यांनी शिवसेनेबरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती केली. १९९०च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती करण्यात आली. यावेळीही राजकारणाचे छक्केपंजे न समजणाऱ्या, साधे सरळ वागणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांना प्रमोद महाजन यांनी विधानसभेच्या २८८ जागांपैकी १७१ जागा देण्याचे औदार्य दाखवून आणि स्वतः ११७ जागा लढवल्या. या जागा देताना जिथे शिवसेना जास्त जागा जिंकू शकते अशा विदर्भात कमी आणि जिथे काहीच उपयोग नाही अशा पश्चिम महाराष्ट्रात जास्त जागा दिल्या. परिणामी जास्त जागा लढविणाऱ्या शिवसेनेला ५२ जागा जिंकता आल्या तर कमी जागा लढविणाऱ्या भाजपने ४२ जागा पदरात पाडून घेतल्या. थोडक्यात सत्ता हुकली.

हिंदुत्व

त्यानंतर ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद धाराशाही झाल्यावर पत्रकारांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदर सिंह भंडारी यांना, “बाबरी किसने गिराई ?” असा प्रश्न विचारला तेंव्हा त्यांनी सरळसरळ काखा वर केल्या आणि “नहीं, वह बीजेपी के नहीं थे, आरएसएस के नहीं थे, बजरंग दल के नहीं थे, व्हीएचपी के नहीं थे” असे उत्तर दिले. तेव्हा पुन्हा विचारणा केली की फिर वह कौन थे ? त्यावर “वे शायद शिवसेना के होंगे!” असे सांगितले. याचवेळी वांद्र्याच्या कलानगरच्या मातोश्रीमधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, या अस्सल वाघाने डरकाळी फोडली आणि सुस्पष्ट शब्दांत सुनावले की, बाबरी उद्ध्वस्त करणारे जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे, गर्व आहे. याचवेळी ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी “गर्व से कहो हम हिंदू है” असे लिहिलेली शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे छायाचित्र असलेली बाबरी उद्ध्वस्त होतानाची छायाचित्र असलेली दिनदर्शिका प्रकाशित केली. त्यावर बंदी घालण्यात आली.

हिंदुत्वासाठी नेहमीच बाळासाहेबांनी स्वतः नमते घेत भारतीय जनता पक्षाला मोठेपणा दिला. इतकेच काय तर अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना २००२ साली गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर गोध्राप्रकरणी वक्रदृष्टी करताच ठाकरे यांनी, “मोदी को हात मत लगाओ, मोदी गया तो समझो गुजरातसे भाजप गया”, असा सुस्पष्ट निरोप लालकृष्ण अडवाणी यांच्यामार्फत वाजपेयी यांना दिला. ही चित्रफीत/ध्वनीफीत अजूनही गुजरातमध्ये कोणत्याही निवडणुकीमध्ये वाजविण्यात येते. त्याच सुमारास शंकरसिंह वाघेला भाजप सोडून शिवसेनेत यायला आणि शिवसेनेचे गुजरातचे मुख्यमंत्री व्हायला तयार झाले होते. मातोश्री येथे येऊन वाघेला यांनी ही आर्जवे केली. परंतु आम्ही वाघ आहोत, वाघेला नव्हेत, असे सांगत त्यांनी मोदी यांची पाठराखण केली. सातत्याने भाजपला साथ दिली आणि दिल्ली तुम्ही सांभाळा, आम्ही महाराष्ट्र सांभाळतो. आपण दोघे मिळून राष्ट्र आणि राज्य चालवू, अशी सामंजस्याची भूमिका घेतली.

२०१२पर्यंत व्यवस्थित सुरू होते. ‌प्रमोद महाजन यांची दुर्दैवी हत्त्या झाली. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे महानिर्वाण झाले. २०१३ साली नरेंद्र मोदी यांचे नाव भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मुक्रर झाले. २०१४ साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. भाजपचे २८२ खासदार निवडून आले. भाजपकडे बहुमत असतानाही केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले. दुर्दैवाने ३ जून २०१४ रोजी गोपीनाथ मुंडे यांचे देहावसान झाले. इथेच माशी शिंकली. मुंडे यांनी ज्या देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष केले त्यांच्या हाती महाराष्ट्र भाजपाची सर्व सूत्रे आली. २४ सप्टेंबर २०१४ रोजी पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याप्रमाणे एकनाथ खडसे यांनी शिवसेनेबरोबरची पंचवीस वर्षे जुनी युती तोडण्याची घोषणा केली. श्रेष्ठींच्या सांगण्यावरुन आपल्याला ही घोषणा करावी लागल्याची कबुली एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

हिंदुत्व

ऑक्टोबर २०१४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे लढविल्या आणि उद्धव ठाकरे अभिमन्यूप्रमाणे एकटेच लढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, आनंदीबेन पटेल, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, राहुल गांधी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस आदी सर्वच नेत्यांना अंगावर घेऊन एकहाती ६३ जागा जिंकल्या. नरेंद्र मोदी यांची लाट होती. तरीही भाजपच्या वाट्याला १२३ जागा आल्या. उठताबसता शरद पवार यांच्या नावे बोटे मोडणाऱ्या भाजपचे अल्पमतातले सरकार पवार यांनी वाचविले.  १२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४पर्यंत शिवसेनेचे एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते. २२ वर्षं बदनामी सहन करावी लागली नाही तितकी २२ दिवस सहन करावी लागली असे सांगत ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चंद्रकांतदादा पाटील आणि धर्मेंद्र प्रधान यांना मातोश्रीच्या दारात पाठवून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठिंबा मागितला. ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून पाठिंबा दिला. शिवसेना भाजपच्या सरकारात सहभागी झाली.

२०१४ आणि २०१९ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत शिवसेना एकटी लढणार अशी स्पष्ट भूमिका घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना भाजपने सोबत येण्यासाठी गळ घातली म्हणून उद्धव ठाकरे तयार झाले. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी अमित शाह मुंबईत आले. सॉफिटेल, मातोश्री येथे बंद दाराआड उद्धव ठाकरे यांच्यासमवेत चर्चा केली. या चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस दाराबाहेर बसून होते. वरळीच्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये भरगच्च पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या सर्वच मागण्या मान्य केल्याचे सांगताना जबाबदाऱ्या ५०-५०% मान्य असल्याची तसेच नाणार जाणार अशी घोषणा केली.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे ३०३ खासदार निवडून आले. शिवसेनेचेही १८ खासदार निवडून आले. महायुती जबरदस्त पुढे आली. संपूर्ण महाराष्ट्र जसा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी ढवळून काढला. तद्वतच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या घणाघाती सभासुद्धा सर्वत्र झाल्या. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५६ आणि भाजपचे १०५ आमदार निवडून आले. परंतु १८ फेब्रुवारी २०१९ रोजी अमित शाह यांनी दिलेला शब्द मोडण्यात आला. सत्तासंपादनाचे गुऱ्हाळ सुरुच होते. शिवसेना समर्थन देत नाही तोवर सरकार बनविणार नाही असे म्हणणाऱ्या भाजपने राष्ट्रवादीचे अजित पवार यांना सोबत घेऊन २३ नोव्हेंबर २०१९च्या सकाळी सकाळीच राजभवनावर जाऊन शपथविधी उरकून घेतला. बऱ्याच घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्यावर पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावे ८० तासाचे मुख्यमंत्री होण्याचीही नोंद झाली.

भाजपने विश्वासघात केल्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. संकटे एकापाठोपाठ एक येऊ लागली. कोरोना महामारीने उच्छाद मांडला. स्वतः ठाकरे यांच्यावर मानेच्या दुखण्याने इस्पितळात दाखल होण्याची वेळ आली. अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. तरीही कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांसोबत सर्वोत्तम कामगिरी केली. आपल्या वाहनचालकाला कोरोना होऊ नये म्हणून स्वतः मोटार चालवत पंढरीच्या पांडुरंगाच्या शासकीय महापूजेचे महत्कार्य केले, १ मे रोजी हुतात्मा चौकात अभिवादन केले. देश पातळीवर एकदा-दोनदा नव्हे तर चक्क चार वेळा पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांची गणना झाली, ज्यात भाजपचे एकही मुख्यमंत्री नव्हते. अनाथांची माय म्हणून ओळखण्यात येणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी तोंडभरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांचे संस्कार तुझ्यात आहेत. बाळासाहेबांचे रक्त आणि मीनाताईंचे दूध तुझ्या धमन्यात आहे. बाळा उद्धव, तू यशस्वी निश्चितच होशील, असा आशीर्वाद दिला.

भाजपने या काळात सर्वच प्रथापरंपरा मोडीत काढून शिवसेनेला जबाबदार विरोधी पक्ष म्हणून साथ देण्याऐवजी त्रास देण्याचेच काम केले. आणखी पराकोटीला जात शिवसेना फोडण्याचे, लोकशाहीचा गळा घोटण्याचे अश्लाघ्य काम केले. मग माझा एक जरी सहकारी विरोधात उभा राहिल्यास मी पदावर राहणार नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि वर्षा निवासस्थान क्षणार्धात सोडून रात्रीच्या रात्री मातोश्री येथे येणे पसंत केले. अख्खा महाराष्ट्र हळहळला. महाविकास आघाडी सरकार चांगले चालत असताना चालत्या गाडीला खीळ घात‌ली गेली. दोन वर्षे तीच तीच ध्वनीफीत/चित्रफीत वाजविण्यात येत आहे. स्वतः गोल टोप्या घालून शीरकुरमा ओरपणाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या शिवसेनेला बदनाम करण्याचा विडा उचललाय. परंतु सुब्रह्मण्यम स्वामींपासून ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी उद्धव ठाकरे हेच खरे हिंदुत्ववादी असल्याचा निर्वाळा दिला आहे. उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात झाला असून ते पुन्हा मुख्यमंत्री होईस्तोवर हे दुःख दूर होणार नाही, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचे आणि त्यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचे हिंदुत्व कसे खणखणीत आहे, यावर धर्माचाऱ्यांकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना बाकी कुणाच्या प्रमाणपत्राची अजिबात गरज नाही. १९६६पासूनचा शिवसैनिक बेलभंडार उचलण्यास सिद्ध झालेला आहे. बाटग्यांच्या बांगेकडे लक्ष न देता आपले हिंदुत्वाचे नाणे कसे खणखणीत हे त्यांनी दाखवून द्यावे.

Continue reading

सुधा चुरीः लढवय्या महिलांचे स्फूर्तिस्थान!

शिवसेनेचे नायगावचे माजी शाखाप्रमुख, मित्रवर्य सुरेश काळे यांनी समाजमाध्यमावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतचे ॲड. सुधा चुरी यांचे छायाचित्र पाठविले आणि एकदम धस्स झाले. गेल्या काही दिवसांपासून सुधाताईंची सतत आठवण येत होती. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य आणि मी आम्ही...

मराठी आणि गुजराती साहित्याचा एक सेतू निखळला!

महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष डॉ. हेमराज शाह यांनी मुंबईतल्या दादरच्या स्वामीनारायण मंदिराच्या योगी सभागृहात गुजराती भाषेचा प्रचार आणि प्रसार या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात मराठी वक्ता म्हणून मला आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात...

मिनाक्षीताई, कनवाळू आणि करारीही!

कोकणातल्या माणसांना फणसाची उपमा देण्यात येते. फणस वरुन काटेरी असतो, पण आतून गरे गोड असतात. अशाच स्वभावाच्या व्यक्ती आपल्याला आपल्या आयुष्यात भेटतात. मिनाक्षीताई पाटील यांना ही फणसाची उपमा अगदी तंतोतंत लागू होते. माझे वडील, ज्येष्ठ पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक वसंतराव...
Skip to content