शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वाचा आणि व्यंगचित्रकार म्हणून वारसा चालवणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भवितव्य काय असेल, याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. यंदाच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे आपल्या पक्षाची स्पष्ट भूमिका जाहीर करतील अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांची अपेक्षा होती. परंतु आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीला लागा, याउपर या मेळाव्यातून कोणताही आदेश मनसैनिकांना मिळाला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्यांच निवडणुकीत राज ठाकरे यांना भरघोस यश मिळाल्याने त्यांचे विमान हवेत तरंगत होते. परंतु मिळालेल्या संधीचा फायदा पक्षसंघटना वाढवण्यासाठी करण्याऐवजी फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कसे पराभूत करता येईल हाच विषय अजेंड्यावर ठेवल्याने राज ठाकरे यांना संघटनावाढीत यश मिळाले नाही.
राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका निश्चित न करता वारंवार भूमिका बदलल्यामुळे त्यांच्या संघटनावाढीवर अलीकडे मर्यादा आल्या आहेत. सुरुवातीला परप्रांतीय विरोधी भूमिका घेणारे राज ठाकरे पुढे हिंदू जननायक होण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु त्यातही त्यांना यश आले नाही. शिवसेनेने परप्रांतीयांचा मुद्दा सोडल्यानंतर आणि हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारल्यानंतर मुंबईतील मराठी माणसांना खऱ्या अर्थाने आपला माणूस पुन्हा मिळाल्याचा आनंद झाला होता. त्यामुळे सुरुवातीला मुंबईतील मराठी माणसाने राज ठाकरे यांच्या पक्षाला घवघवीत यश दिले. परंतु हे यश मिळाल्यानंतर मराठीचा मुद्दा पुढे रेटून परप्रांतीयांना धमकावण्यापलीकडे राज ठाकरे यांचा पक्ष गेला नाही. मराठी माणसांचे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. त्यामुळे याच मराठी माणसांनी पुन्हा शिवसेनेकडे येण्याचा मार्ग निवडला. मनसेच्या स्थापनेनंतर राज्यभरातील युवकांमध्ये आणि महिलांमध्ये एक वेगळी क्रेझ होती. राज ठाकरे यांच्या स्टाईलवर आणि वक्तृत्वावर हा वर्ग फिदा होता. परंतु या सर्व गोष्टींचा फायदा घेण्यासाठी खाली संघटना असावी लागते. संपर्क नेतेमंडळी जिल्ह्यातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना फारसा वेळ देत नसत. त्याचबरोबर मुंबईतील नेतेमंडळींनी आपली गाऱ्हाणी ऐकून घ्यावीत अशी या मंडळींची अपेक्षा असे. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले. राज ठाकरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपली संघटना वाढवताना दर गुरुवारी शिवसेना भवन येथे बसण्याचा निर्णय घेतला. तेथे ते सामान्य शिवसैनिकांनाही भेटत असत. राज्यभरातून येणारा शिवसैनिक केवळ बाळासाहेब यांचे दर्शन घेण्यासाठी गुरुवारी शिवसेना भवनमध्ये येत असे. त्याचबरोबर त्यांनी नेमलेली नेत्यांची आणि संपर्कनेत्यांची फळी राज्यभर संघटनेचा आढावा घेत असे. निवडणुकीच्या तोंडावर स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून राज्यातील संघटनेचा आढावा घेतला जात असे. त्यातूनच शिवसेना संघटना राज्यभर पसरली.
नवी पिढी आणि राज्यभरातील महिला राज ठाकरे यांच्याकडे त्याच अपेक्षेने पाहत होती. परंतु तेरा आमदार निवडून आल्यानंतर राज ठाकरे घरी बसून राहिले. पहिल्या लोकसभा निवडणुकीत चांगले यश संपादन करून शिवसेनेचे उमेदवार आपण कसे पाडले यातच राज ठाकरे यांना आनंद होता. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईत शिवसेनेला रोखण्यासाठी मनसेला कशी रसद पुरवली याच्या कथा अनेक अधिकारीमंडळी रंगवून सांगतात.
मराठी मतदार सूज्ञ आहे. त्यांनी राज ठाकरे यांना एकदा संधी देऊन पाहिली. परंतु या संधीचे सोने त्यांना करता आले नाही. नाशिकमध्ये राज ठाकरे विकासाचा चमत्कार करतील अशी नाशिककरांना अपेक्षा होती. त्यामुळे नाशिक महानगरपालिका नाशिकच्या शहरी जनतेने राज ठाकरे यांच्या ताब्यात दिली. परंतु त्यांच्याही अपेक्षांवर विरजण पडले. कुणी काहीही म्हटले तरी राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची गुणवत्ता आहे असे लोकांना वाटते. त्यात तथ्यही आहे. परंतु केवळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विरोध आणि पाडापाडी हा एकमेव कार्यक्रम राज ठाकरे यांनी घेतला. आपली संघटना वाढवण्यासाठी त्यांनी राज्यभर फिरण्याची मेहनत घेतली असती तर… अजूनही युवा पिढीला आणि महिला मतदारांना त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
या गुढीपाडव्याला राज्यभरातील शेतकऱ्यांचे, कामगारांचे आणि श्रमिकांचे प्रश्न घेऊन लढायला तयार व्हा अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली असती तर त्यांना यश मिळण्याची शक्यता वर्तवता आली असती. सध्या विरोधी पक्ष कमकुवत आहे. राज ठाकरे यांना भाजपने फक्त ठाकरेंच्या शिवसेनाविरोध म्हणून जवळ केले होते. आतातरी त्यांची गरज संपली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी सक्षम विरोधी पक्षाचा नेता म्हणून भूमिका घेतल्यास त्यांच्या पक्षाला वाढण्याची संधी आहे.
संपर्कः 9820355612