मूळ महाराष्ट्रातील भंडाराचे आणि सध्या युरोपातील स्पेनमध्ये स्थायिक असलेले लेखक रोशन भोंडेकर यांनी लिहिलेल्या “द फायर ऑफ सिंदूर – इंडियाज स्ट्राईक अगेन्स्ट टेरर” या पुस्तकाचे स्पेनमधील भारताचे राजदूत दिनेश पटनाईक यांनी स्पेनची राजधानी माद्रिद येथील भारतीय दूतावासात अनावरण केले. यावेळी भोंडेकर यांच्या पत्नी डॉ. सहरा अर्दाह उपस्थित होत्या. हे पुस्तक राईट इंडिया (अहमदाबाद) यांनी प्रकाशित केले असून, ऑपरेशन सिंदूर या केंद्रस्थानी असलेल्या कथानकाद्वारे भारताच्या दहशतवादविरोधी धोरणांचा सखोल अभ्यास यात मांडण्यात आला आहे. हे केवळ धोरणात्मक विश्लेषण नसून, दस्तावेजीकरण आणि मानवी दृष्टिकोन यांचा समन्वय साधणारे लेखन असल्याचे इंटरनेटवर नमूद केले गेले आहे.
राजदूत पटनाईक यांनी पुस्तकातील संशोधनकार्याची प्रशंसा केली आणि वाचक व अभ्यासकांसाठी हे कार्य उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी या पुस्तकाचे स्वामित्वधन (रॉयल्टी) भारतातील अनाथ मुलांच्या सहाय्यासाठी काम करणाऱ्या एनजीओंना देण्याच्या लेखकाच्या निर्णयाचे स्वागत केले. हे पुस्तक रोशन भोंडेकर आणि सहलेखक निलॉय चट्टाराज यांनी लिहिले असून, पत्रकार, गुप्तचर अधिकारी, लष्करी जवान तसेच संघर्षग्रस्त सामान्य नागरिकांच्या मुलाखती, सार्वजनिक नोंदी आणि प्रत्यक्ष अनुभव यात समाविष्ट करण्यात आले आहेत. हे पुस्तक धोरणात्मक दृष्टिकोनासह मानवी बाजूही दर्शवते. यात भारताच्या सामरिक प्रयत्नांसोबतच भारतीयांची जिद्द आणि भारताच्या तंत्रज्ञानसामर्थ्याचेही प्रतिबिंब आहे.
राजदूत पटनाईक यांनी घेतलेला पुढाकार त्यांच्या सांस्कृतिक राजनय आणि भारतीय प्रवासी समुदायाशी संवाद वाढवण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. भारतीय परराष्ट्र सेवे (IFS)मधील वरिष्ठ अधिकारी असलेल्या पटनाईक यांनी कंबोडिया आणि मोरोक्को येथील राजदूत आणि युनायटेड किंगडममध्ये उप-उच्चायुक्त म्हणून काम केले आहे. ते डिसेंबर 2021पासून माद्रिदमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. भोंडेकरांनी गेल्या दहा वर्षांत विविध सामाजिक विषयांवर आधारित प्रबंधात्मक पुस्तकांचे लेखन केले असून, “द फायर ऑफ सिंदूर’ – इंडियाज स्ट्राईक अगेन्स्ट टेरर” हे त्यांचे पहिले राजकीय आणि धोरणात्मक विषयावरील विस्तृत लेखन आहे.
विश्लेषकांचे म्हणणे आहे की, प्रवासी भारतीय लेखकांद्वारे होणाऱ्या अशा साहित्यमूल्य घटनांमुळे सांस्कृतिक आणि बौद्धिक देवाणघेवाणीस चालना मिळते. दूतावास केवळ राजनितिक चर्चा केंद्र नसून, राष्ट्रीय दृष्टिकोन, इतिहास आणि समकालीन प्रश्नांवर जागतिक संवाद घडवून आणण्याच्या दृष्टीने कार्यरत आहे. या पुस्तकाचा कटाक्ष राष्ट्रीय सुरक्षेवर असल्यामुळे भारताची धोरणे आंतरराष्ट्रीय व प्रवासी वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे शक्य होईल. शिवाय पुस्तकाचे स्वामीत्वधन भारतातील अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देण्याचा भोंडेकर यांचा निर्णय प्रवासी लेखकांमधील सामाजिक बांधिलकीची जाणीव दर्शवतो. चर्चासत्रे व संवाद यांच्या माध्यमातून युरोपमध्ये वाचकांशी थेट संवाद साधण्याचा भोंडेकर यांचा मानस आहे. अशा संवादातून जागतिक पातळीवर भारताची भूमिका स्पष्ट करण्यास मदत मिळेल, अशी आशा आहे.