Saturday, July 6, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजअनेक संकेत पायदळी...

अनेक संकेत पायदळी तुडवत मुख्यमंत्र्यांनी केले राजकीय भाषण

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तरादाखल केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी पूर्णपणे राजकीय स्वरूपाचे भाषण करत अनेक संकेत पायदळी तुडवले आणि राजापेक्षा राजनिष्ठ, या उक्तीची प्रचिती देत पंतप्रधान नरेन्द्र मोदींवर स्तुतिसुमने उधळत औचित्त्यभंगही केला. दुसरीकडे त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा नकारात्मक उल्लेख करत त्याचे समर्थनही केले.

वास्तविक, मुख्यमंत्रीपद म्हणजे विधानसभेतील सभागृह नेत्याचे. नेत्याचे वागणे अनुकरणीय असायला हवे. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी त्यांच्या पाऊण तासाच्या भाषणात आत्ममग्नतेचा प्रत्यय दिला. राजकीय शेरेबाजी आणि विरोधकांचा फक्त उपहास म्हणजे विधानसभेतील भाषण, इतकाच अर्थ लावून भाषण केले. त्यांचे आजचे भाषण मुख्यमंत्रीपदालाही शोभणारे वाटले नाही.

संकेत

पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळत मोदींनी रशिया-युक्रेनचे युद्ध भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी दोन तास थांबवले, हे व्हॉट्सअप विद्यापीठ संदेशातील अगाध ज्ञान सभागृहात मांडले. राहुल गांधी यांनी बेरोजगार तरुणांच्या खात्यात पैसे जमा करू, हे सांगताना निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी खटाखट खटाखट… पैसे जमा होतील, असा उल्लेख केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याची घोषणा आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेच्या वेळी या घोषणेवर टीका करताना विरोधकांनी महिलांना देण्यासाठी पैसे कुठून आणणार, असा प्रश्न विचारला होता. त्याचा संदर्भ देत राहुल गांधी तरुणांना खटाखट खटाखट पैसे देणार म्हणाले, तेव्हा ते पैसे कुठून आणणार, असे विरोधकांनी का विचारले नाही, असा प्रतिप्रश्न शिन्दे यांनी सभागृहात केला.

वास्तविक, राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांचा असा उल्लेख करणे संकेतांना धरून नाही. पण, कॉँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावरील टीकेला आक्षेप घेताच मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन केले. पंतप्रधान मोदींवर स्तुतिसुमने उधळताना देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या  क्रमांकावर आली, असा उल्लेख शिन्दे यांनी केला. पाकिस्तानने आगळीक केली तर पूर्वीचे पंतप्रधान संयुक्त राष्ट्रसंघाकडे जायचे. पण मोदी घरात घुसून प्रत्त्युत्तर देतात, अशी स्तुतीही शिन्दे यांनी केली.

संकेत

राज्यपालांच्या भाषणावर विरोधकांनी केलेल्या टीकेला मुद्देसूद उत्तर शिन्दे देऊ शकले नाहीत. त्याऐवजी राजकीय शेरेबाजी, उपहास आणि संकेत पायदळी तुडवले जातील, असे उल्लेख करताना शालेय विद्यार्थ्यांचे नवे गणवेषही मुख्यमंत्री शिन्दे यांनी सभागृहाला दाखवले. त्यामुळे, सभागृहातील नव्या सदस्याने प्लेइंग टू द गॅलरी, यासाठी पत्रकारांचे लक्ष वेधण्यासाठी किंवा बातम्यांमध्ये हेडलाईनमध्ये राहण्यासाठी करावे, त्या पद्धतीचे भाषण मुख्यमंत्री शिन्दे यांनी केले. त्यामुळे गंभीर प्रकृतीच्या अजित पवार आणि अभ्यासू भाषणे करणाऱ्या देवेन्द्र फडणवीस यांनाही अनेकदा चेहरा कोरा ठेवणे अवघड जात होते.

Continue reading

यातले किती सदस्य पुढच्या जन्मी होणार फ्लेमिंगो?

पुढच्या जन्मी विधानसभेतील किती सदस्य फ्लेमिंगो पक्ष्याचा जन्म घेणार आहेत, हे मंत्रिमहोदयांनी सांगावे, अशी अजब मागणी आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. याचे उत्तर देण्यासाठी मला चित्रगुप्ताच्या संगणकाला एक्सेस लागेल, असे सांगून ही माहिती पटलावर ठेवता येणार नाही,...

एकदा सांगून तुमच्या डोसक्यातच शिरत नाही…

आम्ही काहीही केले किंवा महाराष्ट्र विदेशी गुंतवणुकीत आघाडीवर आहे असं म्हटलं की तुम्ही नाही.. नाही.. नाही.. असं म्हणता. तुमच्या डिक्शनरीतून नाही.. नाही.. नाही.. हा शब्द काढून टाका आणि तिथं होय.. होय.. होय.. असा शब्द घाला, असा सल्ला अजित पवारांनी...

राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे व्हा रे सारे खूष…

अजित पवार यांनी मुंबईत सध्या चालू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडला, त्यावर विधानसभेत चर्चाही झाली. अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला त्या दिवशीच म्हणजे शुक्रवारी संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघाली. त्याचा संदर्भ देत अजित पवार यांनी संत तुकाराम महाराजांच्या...
error: Content is protected !!