राज्यातील महापालिका निवडणुका अटीतटीच्या झाल्या. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा देवाभाऊ व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बाजी मारल्याबद्दल त्या दोघांचे मनापासून अभिनंदन! विशेषतः मुंबई महापालिकाही त्यांनी पहिल्याच फटक्यात ताब्यात घेतल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. राज्यातील अन्य महापालिका जिंकणे आणि मुंबई महापालिका जिंकणे यात मोठा फरक आहे. कारण, मुंबई महापालिका ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे तर इतर महापालिकांना छोट्या-छोट्या गोष्टींसाठीही राज्य सरकारवर अवलंबून राहवे लागते. त्यातच मुंबई महापालिकेत सलग २५/३० वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. अनेक वर्षे भाजपचीही त्यांना साथ होती. परंतु गेली पाच वर्षे मैत्रीपासून फारकत घेतल्यापासून ते दोघे जणू हाडवैरीच झाले आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर या वैरात अधिक भरच पडलेली आहे. राज्यात वा केंद्रात कुठल्याही राजकीय पक्षाचे राज्य असो, मुंबईत मात्र शिवसेनेचीच सत्ता, असे समीकरण होते. ते पहिल्यांदाच बदलले आहे. या समीकरणाचा मातोश्रीला हादरा बसलाच असेल. परंतु भाजप-शिवसेनेची स्थिती पाहिजे इतकी भक्कम नाही हेही ध्यानात ठेवायला हवे. निकालांच्या पहिल्या टप्प्यात भाजपला शंभरपेक्षा जास्त जागा दिसत होत्या. त्या आता फक्त ८९ इतक्या खाली आलेल्या आहेत! उलट महाविकास आघाडीने हुशारीने चाल खेळली तर शिवसेना (उबाठा) – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांचाही महापौर बसू शकतो. पण या जरतरच्या गोष्टी आहेत. त्या घडतील तेव्हा पाहता येईल. तोवर आपण भाजप-शिवसेनेचा विजयी आनंद कशाला हिरावून घ्या? राजकारणात असेही होऊ शकते याची भाजप-शिवसेनेला कल्पना असणारच.
आता महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे तर सर्वांनीच म्हणजे राजकीय नेत्यांनी, ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी तसेच शहर अभियंत्यांनी या शहराचे जीवनमान सुधारण्यासाठी तातडीने हालचाली करण्याची गरज आहे. या शहरातील नागरिकांचा जास्तीतजास्त वेळ नोकरीसाठीच्या प्रवासात जातो. इतकेच नव्हे तर नोकरी करून पुन्हा स्थानकात आल्यानंतरही आणखी सुमारे एक तास घरी पोहोचण्यासाठी जातो. ही वेळेची मर्यादा कमी करण्याचे जटील काम नियोजनकारांपुढे आहे. हे काम तितकेसे सोपे नाही. या शहरात (या मुंबई विभागात) रोज येणारे लोंढे, घरदार नसलेले लोक, नोकरीही नाही मग राहणार कुठे आणि कसे? मग बांध झोपडी, चोरी करा विजेची व राहा राजकीय नेत्याच्या मर्जीवर असा एकूण खाक्या आहे. बरे ही मंडळी महाराष्ट्रातलीच आहेत काय? त्तर ते मुळीच नाही. त्यांच्या राज्यात गेल्यावर हजार चौकश्या करणारी ही मंडळी येथे येऊन खुशाल तंगड्या पसरतात. वाटेल तसे राहतात. त्यांना तसेच राहण्याची सवय आहे. या सर्वांचा भार आमच्यावर कशाला असा प्रश्न करदात्यांचा आहे व रास्त वाटतो.

सुधारणा काही एका रात्रीत होत नाहीत. हल्ली शहरात वा मुंबई विभागात झालेल्या काही सुधारणा आमच्या कारकिर्दीत झाल्या असा दावा भाजप-शिवसेना युतीचे काही नेते करताना दिसत आहेत. त्यांच्या कारकिर्दीत ते दृश्य स्वरूपात आलेही असतील. परंतु सुधारणेचे नियोजन असे एका रात्रीत पूर्ण होत नसते, असे मुख्यमंत्री देवाभाऊंनी आपल्या सहकाऱ्यांना सांगण्याची गरज आहे. एका मोठ्या नेत्याने आम्ही लोकल ट्रेनच्या डब्याची रचना बदलल्याचा दावा केला आहे. अहो साहेब, त्यावर वर्कशॉपमध्ये अनेक वर्षे कामगार काम करत असतात हो, त्याचे श्रेय तुम्ही कशाला घेताय? शिवाय बदल झालेले डबे सर्वत्र कुठे आहेत? मुंबईतच पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे व हार्बरचे डबे एकदा फुरसतीत पाहा (लहानपणापासून आम्ही रेल्वे प्रवास करतो. तेव्हा अशी टेप लावू नका). हार्बरचे डबे किती डफराट असतात हे मी सांगायला नको. जरा हार्बरची चेंबूर, मानखुर्द, गोवंडी तसेच कल्याणपुढची स्थानके पाहायला नक्की जा! फार कशाला टिटवाळ्याला जाऊन या आणि मग पत्रकारांशी बोला. इतक्या लांब कशाला तुमच्याजवळचे मालाड रेल्वेस्थानक पाहा. गेली दहा वर्षे हे काम सुरु आहे. तसेच कधी वेळ मिळाला तर बोरिवलीच्या फलाट क्रमांक एकवर प्रवाशांची जी फरफट होत असते तीही अनुभवा!
भाजपचे नेते आमचे काही शत्रू नाहीत. परंतु ही मंडळी जेव्हा सर्व आलबेल आम्हीच केले असं सांगतात तेव्हा आरसा दाखवायची वेळ येते. आज इतकेच. अभिनंनदनाचा दिवस आहे. आज इथेच थांबतो. आता पुढील पाच वर्षे भेटायचेच आहे. सर्व कैफियत आजच सांगितली तर पुढे काय सांगणार? पण सर्व निवडून असलेल्या नगरसेवकांना एक आवाहन जरूर करणार आहे की, नगरसेवकहो, आपल्या विभागात फिरा, गाडीने नको, पायी फिरा, बेस्ट बसेसने फिरा (हल्ली अनेक ठिकाणी वातानुकूलीत सेवा आहेत नी त्या तुम्हाला फुकट आहेत) आणि जमलं तर आठवड्यातून दोन दिवस रात्रीचा फेरफटका मारा. कारण “Cities, likes cats, will reveal themselves at night” आणि जो अनुभव येईल तो मला सांगायला मात्र विसरू नका!
(छायाः प्रवीण वराडकर)
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

