Thursday, December 12, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजन्युझीलंडची कमाल! भारताची...

न्युझीलंडची कमाल! भारताची वाट खडतर!!

दुबईत झालेल्या महिल्यांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्युझीलंडने प्रथमच विजेतेपद पटकावून महिलांच्या क्रिकेट विश्वात धमाका उडवून दिला. आता भारतभूमित आलेल्या त्यांच्या पुरुष संघाने तब्बल ६९ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर यजमान भारतीय संघाला पराभूत करुन मोठीच खळबळ माजवली. १९५५पासून न्युझीलंड संघ भारताचा दौरा करत आहे. याअगोदर भारतभूमित झालेल्या तब्बल १३ कसोटी मालिकांमध्ये पाहुण्या न्युझीलंड संघाला कधीच मालिका विजय मिळवता आला नव्हता. ११ मालिका त्यांनी गमावल्या होत्या, तर २ मालिका न्युझीलंडला अनिर्णित ठेवण्यात यश आले होते. परंतु सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या लॅथमच्या न्युझीलंड संघाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बेंगळूरू आणि पुणे कसोटी सामने जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्याचा पराक्रम केला.

ही मालिका सुरु होण्यापूर्वी भारतात पाहुण्यांनी अवघे २ कसोटी सामने जिंकले होते. १९६९मध्ये न्युझीलंडने पहिल्यांदाच नागपूर कसोटी जिंकली होती. त्यानंतर १९८८ साली त्यांनी मुंबईत दुसरी कसोटी जिंकली होती. यंदाच्या दौऱ्यात बेंगळुरू आणि पुणे कसोटीत बाजी मारून न्युझीलंडने पहिल्यांदाच सलग २ कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम भारतात केला. ही मालिका सुरु होण्यापूर्वी भारतात अगोदर झालेल्या कसोटी मालिकांमध्ये एकूण ३६ कसोटीत न्युझीलंडला १७ सामन्यात हार खावी लागली होती तर अवघे २ विजय त्यांना मिळवता आले होते. न्युझीलंडची ही आकडेवारी पाहता यावेळीदेखील भारतीय संघ ही मालिका सहज जिंकेल असाच जाणकारांचा अंदाज होता. परंतु लॅथमच्या न्युझीलंड संघाने भारतावर बाजी उलटवून जाणकारांचा अंदाज चुकीचा ठरवला.

भारत दौऱ्यावर येण्याअगोदर न्युझीलंड संघ श्रीलंकेत पराभूत झाला होता. या पराभवामुळे नाराज होऊन कर्णधार साउदीने हे पद सोडण्याचा निर्णय घेतला. मग सलामीवीर लॅथमकडे पुन्हा न्युझीलंड संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली. ही जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्याने ९ कसोटीत न्युझीलंडचे नेतृत्त्व केले होते. त्यामध्ये न्युझीलंडने ५ सामने गमावले होते तर ४ सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे कर्णधार म्हणून लॅथमची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. भारतात दाखल होण्यापूर्वी श्रीलंकेत झालेल्या मालिकेचा फायदा न्युझीलंडला झाला. न्युझीलंड संघ मालिकेत पराभूत झाला असला तरी आशिया खंडातील वातावरण आणि खेळपट्ट्या याचा मोलाचा अनुभव न्युझीलंडला मिळाला. भारत दौऱ्यात श्रीलंकेत झालेल्या चुका न्युझीलंड संघाने टाळल्या. फलंदाजी आणि गोलंदाजीत सरस कामगिरी केली तर क्षेत्ररक्षकांनी काही जबरदस्त झेल टिपून गोलंदाजांना चांगलीच साथ दिली. त्यांच्या फलंदाजीत जास्त आक्रमकता दिसुन आली. भारतीय फिरकी गोलंदाजांचा समाचार घेताना स्वीप आणि रिव्हर्स स्वीप फटक्यांचा मुक्त वापर केला.

बेंगळुरू कसोटीत पावसाळी ढगाळ वातावरण असताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय चांगलाच अंगाशी आला. अवघ्या ४६ धावांत भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यामुळे पहिल्याच डावात भारताचा पराभव निश्चित झाला. वेगवान गोलंदाज साउदी आणि विल्यमसनने अनुक्रमे ५ व ४ बळी घेऊन भारताची दाणादाण उडवली. भारतातली भारताची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. यष्टिरक्षक पंतच्या सर्वाधिक २० धावा होत्या. सलामीवीर जयस्वालच्या पंतपाठोपाठ सर्वाधिक १३ धावा होत्या. इतर कुठल्याही भारतीय फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या काढता आली नाही. कर्णधार रोहित अवघ्या २ धावा करु शकला. विराट, सर्फराज खान, राहुल, जडेजा, अश्विन भोपळा न फोडताच माघारी परतले. रविंद्रचे शतक, कॉनवे, साऊदी यांच्या अर्धशतकाच्या जोरावर न्युझीलंडने पहिल्या डावात ४०० धावांचा टप्पा ओलांडला. तिथेच त्यांचा विजय निश्चित झाला. भारताच्या दुसऱ्या डावात सर्फराज खानने शानदार शतक ठोकले. कर्णधार रोहित आणि विराटने अर्धशतके काढली. ४ बाद ४०८ धावा अशा सुस्थितीत असलेल्या भारताचा डाव नंतर ४६२ धावांत कोसळला. वेगवान गोलंदाज विल्यम्स आणि फिरकी गोलंदाज हेन्रीने प्रत्येकी ३ बळी घेऊन भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. मग ११० धावांचे विजयी लक्ष न्युझीलंडने सलामीवीर लॅथम, कॉनवे यांचे बळी गमवून सहज पार केले. यंग ४८, रविंद्र ४६ धावा या दोघांनी चिवट फलंदाजी करुन न्युझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शतकी खेळी करणारा रविंद्र सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

पहिल्या कसोटीत पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नव्हता. तरीदेखील अवघ्या साडेतीन दिवसांत कसोटीचा निकाल लागला. पुण्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ सरस खेळ करुन पहिल्या कसोटी पराभवाचा बदला घेईल अशी आशा पुणेकर क्रिकेटप्रेमी बाळगून होते. परंतु दुसऱ्या कसोटीतदेखील भारतीय फलंदाजांनी निराशा केल्यामुळे अवघ्या तीन दिवसांतच भारताचा खेळ संपला. या पराभवाबरोबरच भारतभूमित न्युझीलंड संघासमोर कसोटी मालिका गमावण्याची नामुष्कीची पाळी भारतावर आली. बेंगळुरू येथील पहिल्या सामन्याची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी होती. तिथे न्युझीलंडच्या तेज माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. पुण्यात दुसऱ्या सामन्यात फिरकी गोलंदाजीला सहाय्य करणारी खेळपट्टी तयार करण्यात आली. असे म्हणतात ना “शिकार करने गये और शिकारीही खूद जाल में फस गया” असेच भारतीय संघाबाबत पुण्यात घडले. न्युझीलंडचा अनुभवी फिरकी गोलंदाज सेंटनरच्या जाळ्यात तब्बल १३ भारतीय फलंदाज अडकले. आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना या डावखुऱ्या गोलंदाजाने १५७ धावांत १३ बळी टिपले.

सामन्यातील महत्त्वाची नाणेफेक न्युझीलंड कर्णधार लॅथमने जिंकली. त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुंदरच्या सुंदर फिरकी माऱ्यासमोर ४ बाद १९७ अशा सुस्थितीत असलेल्या न्युझीलंडचा डाव २५९ धावांत गडगडला. सुंदरने ७ बळी घेऊन न्युझीलंड फलंदाजीला सुरुंग लावला. कॉनवे, रविंद्र यांच्या अर्धशतकी खेळीमुळे न्युझीलंडला २५० धावांचा टप्पा गाठता आला. ५९ धावात ७ बळी ही सुंदरची कसोटीत सर्वोत्तम कामगिरी होती. भारताचा पहिला डाव अवघ्या १५६ धावात आटोपला. जयस्वाल, गिल या दोघांचा अपवाद वगळता (प्रत्येकी ३० धावा) इतर भारतीय फलंदाजांनी न्युझीलंड फिरकी माऱ्यासमोर गुडघे टेकले. पहिल्या डावातील १०३ धावांची मोठी आघाडी न्युझीलंडसाठी निर्णायक ठरली.

दुसऱ्या डावातदेखील न्युझीलंडला २५६ धावात रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. सुंदरने ४, जडेजाने ३, अश्विनने २ बळी घेऊन न्युझीलंडला मोठी धावसंख्या ऊभारू दिली नाही. कर्णधार लॅथम ८६, ब्लंडेल ४१, फिलिप्स नाबाद ४८ धावा ह्यांच्या झुंजार फलंदाजीमुळे दुसऱ्या डावात न्युझीलंडने २५० धावांचा टप्पा ओलांडला. विजयासाठी दुसऱ्या डावात भारतासमोर अडीच दिवसांत ३५९ धावा करण्याचे लक्ष होते. सलामीवीर जयस्वालने ७७ धावांची दमदार खेळी करुन भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. त्याने गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी करुन भारतीय डावाला चांगला आकार दिला होता. परंतु गिल आणि जयस्वाल माघारी परतताच भारताची घसरगुंडी उडाली. ३ बाद १२७ धावा अशा चांगल्या स्थितीत असलेला भारतीय संघ नंतर २४५ धावांतच गारद झाला. जयस्वाल, गिल, जडेजा यांचा अपवाद वगळता इतर भारतीय फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. माजी कर्णधार विराट आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा या दोन अनुभवी फलंदाजांवर भारताची मोठी मदार या मालिकेत होती. परंतु या दोघांना ४ डावांत अवघे एकच अर्धशतक काढता आले.

२०२० ते २०२४ या कालावधीत विराटच्या नावावर अवघी २ शतके लागली आहेत. यादरम्यान तो ३३ कसोटी सामने खेळला. यंदाच्या नव्या मोसमात ४ कसोटीत विराटला अवघे एकच अर्धशतक काढता आले. फिरकी गोलंदाजीवरील वर्चस्वासाठी देशांतर्गत स्पर्धेत जास्तीतजास्त खेळणे हा माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचा सल्ला संघातील ज्येष्ठ फलंदाजांनी अंमलात आणणे गरजेचे आहे. तसेच या खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांतदेखील खेळणे बीसीसीआयने बंधनकारक करायला हवे. संघातील‌ काही ज्येष्ठ खेळाडूंची सध्याची खराब कामगिरी पाहता त्यांनादेखील विश्राती देण्याचे धाडस‌ निवड समितीने दाखवायला हवे. या मालिकेअगोदर भारताने दुबळ्या बांगलादेशला सहज लोळवले होते. तेव्हा न्युझीलंडलादेखील आपण सहज नमवू या तोऱ्यात भारतीय संघ होता. त्यातच त्यांचा अनुभवी फलंदाज आणि कर्णधार केन विल्यमसन दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मालिकेला मुकला. त्यामुळे त्यांंची फलंदाजी काहिशी कमकुवत झाली. पण त्यांच्या गोलंदाजांनी केनची कसर भरुन काढली. दोन्ही कसोटीत खेळपट्टीचा अंदाज घेण्यात कर्णधार रोहित आणि संघ व्यवस्थापन साफ चुकले. आता मुंबईत होणाऱ्या शेवटच्या कसोटीत भारतीय संघ पराभवाची मालिका खंडित करुन नामुष्कीची पाळी ओढवून घेणार नाही अशी आशा करुया. या पराभवामुळे विश्व कसोटी मालिकेतील अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा भारताचा मार्ग अधिक खडतर झाला आहे हे मात्र निश्चित!

Continue reading

सर्वात तरुण आयपीएल करोडपती, वैभव सूर्यवंशी!

आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात सर्वात लहान वयात करोडपती होण्याचा मान बिहारचा सलामीचा युवा फलंदाज, अवघ्या १३ वर्षे १८८ दिवसांच्या असलेल्या वैभव सूर्यवंशीने मिळवला आहे. आयपीएल स्पर्धेच्या क्रिकेटपटूंच्या बोलीकडे जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेले असते. कुठला संघ, कुठला...

बिलियर्ड-स्नूकरमधला भारतीय जादूगार पंकज अडवाणी!

भारताच्या ३९ वर्षीय पंकज अडवाणीने नुकत्याच झालेल्या दोहा, कतार येथील जागतिक बिलियर्ड स्पर्धेत २०वे जेतेपद पटकावून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा ४-२ असा आरामात पराभव करुन आणखी एक जागतिक विजेतेपद मिळवण्याचा...

पर्थ कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय!

ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघासाठी हा दौरा खडतरच असणार आहे. १९९१-९२नंतर पुन्हा एकदा भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. नुकत्याच मायदेशी झालेल्या न्युझिलंडविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला ३-० असे "व्हाइट वॉश"ला प्रथमच सामोरे जावे...
Skip to content