ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय हाॅकी संघाने सलग दोन कांस्यपदकं जिंकून भारतीय हॉकीसाठी पुन्हा अच्छे दिन आणले. त्यामुळे सहाजिकच भारतीय हाॅकीला एक नवी झळाळी मिळाली. भारतीय हाॅकीप्रेमींच्या भारतीय हाॅकी संघाकडून पुन्हा मोठ्या अपेक्षा बाळगल्या जाऊ लागल्या. पण नुकत्याच झालेल्या मानाच्या एफ.आय.ई.एच. प्रो हाॅकी लीगच्या युरोप टप्प्यात भारतीय हाॅकी संघाने सुमार कामगिरी करुन हाॅकीप्रेमींची नाराजी ओढवून घेतली, असेच खेदाने म्हणावे लागेल. विश्वातील नऊ अव्वल देशांच्या या स्पर्धेत युरोप टप्प्यात भारतीय संघाला आठ सामन्यांत अवघा एक विजय मिळवता आला. त्यावरुनच भारतीय हाॅकी संघाच्या सुमार खेळाची कल्पना येते. शेवटच्या बेल्जियमविरुद्धच्या परतीच्या लढतीत भारताने कसाबसा विजय मिळवून थोडीफार लाज राखली. विश्वातील अव्वल ऑस्ट्रेलिया, हॉलंड, अर्जेंटिना, बेल्जियम या संघांशी युरोपमधील टप्प्यात दोन हात करायचे होते. बेल्जियमविरुद्धच्या शेवटच्या लढतीचा अपवाद वगळता पहिल्या सलग सात सामन्यात भारताची विजयाची पाटी कोरीच राहिली. या पराभवात भारतीय संघाच्या त्याच जुन्या उणिवा, चुका, सदोष नेमबाजी, पेनल्टी काॅर्नरवर हमखास गोल करण्यात आलेले अपयश, सामन्यातील शेवटच्या काही मिनिटांत प्रतिस्पर्धी संघाकडून गोल स्वीकारण्याची जुनी खासियत हीच सारी जंत्री बघायला मिळाली. सामन्यात आघाडी घेऊनदेखील दबावाखाली मग प्रतिस्पर्धी संघांना भारताने आपणहून विजयाची दारं उघडी करुन दिली. बचाव आणि आक्रमण या खेळाच्या दोन्ही प्रमुख अंगात भारतीय संघ कमी पडला. याचा प्रत्यय स्पर्धेत बघायला मिळाला. त्यामुळे जिंकणारे सामने भारताने नाहक गमावले.

सलामीच्या हॉलंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या लढतीत भारताने सामना संपायला अनुक्रमे दोन, तीन मिनिटे बाकी असताना त्यांना विजयी गोल करू दिले. पुढच्या अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात त्याचाच प्रत्यय आला. सामना संपायला अनुक्रमे तेरा, अकरा मिनिटे बाकी असताना त्यांना विजयी गोल करण्याची संधी भारताने दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात सामना संपायला अवघे ४३ सेकंद असताना त्यांनी विजय मिळवला, तर परतीच्या दुसऱ्या सामन्यात १८ मिनिटे बाकी असताना ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. भक्कम बचाव करुन ऑस्ट्रेलियाने तीच आघाडी शेवटपर्यंत राखण्यात यश मिळवले. बेल्जियमविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला ६-३ गोलांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पण परतीच्या दुसऱ्या सामन्यात त्या पराभवाचा बदला घेताना भारताने ४-३ गोलांनी बाजी मारली. कप्तान हरमनप्रीत सिंगने शेवटच्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी स्ट्रोक सत्कारणी लावत अखेर भारतीय विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याअगोदर सुखजीत सिंगने दोन गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली होती. अमित रोहिदासने तिसरा गोल करून भारताची आघाडी वाढवली होती. काही सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंग खेळू शकला नाही. त्याची उणिव भारताला चांगलीच जाणवली. तसेच ऑलिम्पिकनंतर निवृत्त झालेला बुजtर्ग गोलरक्षक आणि भारताचा माजी कर्णधार पी. श्रीजेशची उणिवदेखील भारतीय संघाला भासत आहे. त्यातच भारतीय हाॅकी संघाचे मुख्य प्रशिक्षक फुल्टन यांनी या स्पर्धेत काही नवी रणनीती आखली. पण ती अपयशी ठरली. प्रत्येक खेळाडूला “मार्क” करण्याच्या नादात भारतीय संघाच्या मधल्या क्षेत्रात भरपूर मोकळी जागा राहत होती.त्याचाच फायदा प्रतिस्पर्धी संघांनी घेतला. त्यामुळे हॉलंड, अर्जेंटिनाविरुद्धच्या लढती आपण गमावल्या.

भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंनी या टप्प्यात चांगलीच निराशा केली. शारीरिक क्षमतेत भारतीय खेळाडू कमी पडले. त्यामुळे शेवटच्या सत्रात भारताने अर्धे सामने गमावले. बचाव फळीत रोहिदास, अमितने बऱ्याच चुका केल्या. त्यामुळे गोलरक्षक किशन बहादूर, सूरज करकेरा यांच्यावर चांगलाच दबाव आला. त्यामुळे काही बोनस गोल यांनी प्रतिस्पर्धी संघांना दिले. या भारताच्या खराब कामगिरीमुळे आगामी विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्याचे भारताचे स्वप्न भंग पावले. त्यामुळे आता विश्वचषक स्पर्धेत मुख्य फेरीत प्रवेश मिळवायचा असेल तर पात्रता फेरीच्या लढतीत खेळावे लागणार आहे. याअगोदर भारतात झालेल्या पहिल्या टप्प्यात भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली होती. तेव्हा भारताने पाच लढती जिंकून गुणतालिकेत तिसरा क्रमांक मिळवला होता. पण युरोप टप्प्यात भारतीय संघाची चांगलीच घसरण झाली. भारतीय संघ गुणतालिकेत नऊ संघात आठव्या स्थानावर फेकला गेला. या स्पर्धेला २०१९मध्ये सुरूवात झाली. हॉलंडने आतापर्यत सर्वात जास्त तीन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. एकदा उपविजेतेपद आणि एकदा तिसरा क्रमांक मिळवला. विश्वातील अव्वल नऊ संघात ही स्पर्धा होते. “राॅऊंड राबीन” आधारावर स्पर्धेतील सामने होतात. एक टप्पा घरच्या मैदानावर तर दुसरा टप्पा प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतो. एकूण सोळा सामने होतात. २०२१-२२च्या या स्पर्धेत भारतीय संघाने तिसरा क्रमांक मिळवला होता. हिच भारताची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. आता भविष्यात भारतीय हाॅकी संघाची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्याचे मोठे आव्हान मुख्य प्रशिक्षक फुल्टन आणि त्यांच्या टिमसमोर असेल. भारतीय संघाची पुढील होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांत कामगिरी सुधारेल अशी आशा करुया. मात्र, त्यासाठी युरोप टप्प्यातील चुकांपासून भारतीय संघाने बोध घेणे आवश्यक असेल.