झाले जलमय… लेखिका डॉ. सुचिता पाटील सर्वद फाऊंडेशन आणि नरेश राऊत फाऊंडेशनच्या संचालिका आहेत. या संस्थेमार्फत लेखिका आदिवासी बंधूभगिनींच्या कल्याणासाठी काम करीत आहेत. त्यामुळे या पुस्तकाचे सर्व पैसे आदिवासी, गरीब मुलांसाठी दिले जाणार आहेत.
डॉ. सुरुची डबीर यांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिले आहे की, समाजातील रूढ कल्पना, समस्या आणि मानवी नातेसंबंधांवर आधारित अतिशय भावस्पर्शी विषयांवर डॉ. सुचिता पाटील यांनी कथा लिहिल्या आहेत. या कथांमधून सामाजिक विषयांवर भाष्य केले आहे, जसे की गरिबी, शिक्षण, आरोग्य, प्रेम, संशय वाचकांना विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या कथा आहेत.
‘रोहित पारकर’ या कथेत जीवनात येणारी संकटे, दुरावे, ब्रेकअप यांनी माणसे भयभीत होतात. त्यांचा जीवनावरचा विश्वास उडतो. लेखिकेने रोहितला दिलेला आधार फारच महत्त्वाचा आहे, कारण त्यांनी जर रोहितला आधार दिला नसता तर रोहित आज या जगात नसता. लेखिकेसारखी परिपक्व व्यक्ती, त्यांच्या मदतीची आस असणाऱ्या व्यक्ती मुख्य म्हणजे जगण्याची जिद्द, निर्मितीची प्रेरणा देतात. ही लढाई विध्वंसाशी नाही संभवासाठी आहे, या लढ्यामध्ये विद्वेषाची नाही तर प्रेरणा ही वात्सल्याची आहे जी रोहितला बाहेर काढण्यात मदत करते. लेखिकेने जे परिश्रम घेतले ते वाखाणण्यासारखे आहेत.
या कथासंग्रहातील कथा भावनेची पकड घेणाऱ्या आहेत. कथांमधून स्त्रीत्वाच्या खऱ्या अर्थाचा शोध घेतलेला आहे. त्यांच्या कथा विचारमंथनाच्या आहेत. शरीराला श्वासाची आणि नात्याला विश्वासाची गरज असते, कारण श्वास संपल्यावर जीवन संपते आणि विश्वास उडाल्यावर नातं संपतं. संसारात संशयाला जागा नसावी हे दाखविणाऱ्या बऱ्याच कथा लेखिकेने लिहिल्या आहेत जसे ‘सर्वस्व’ या कथेत नम्रता आणि विनयचा संसार सुखाचा असतो पण मित्रावर तो संशय घेतो. कथेचा शेवटही अत्यंत आश्चर्यकारक असा आहे. ‘योगायोग’ या कथेतील रीमा आणि विशाल यांच्या संसारात संदीपवर संशय घेतला जातो. त्यामुळे रीमाचा होणारा मानसिक त्रास, स्वास्थ्यावरचा परिणाम लेखिकेने चित्रित केला आहे. ‘तडा’ ही कथा पण संशयावर आधारित आहे. स्वार्थी आणि मतलबी माणसावर प्रेम केल्याने निलयाला दुःख पदरी पडते. सर्व हळूवार भावना गुंडाळून ठेवून निर्लज्जपणे फक्त स्वार्थच बघायचा ठरवले तर मग विश्वास, प्रेम, स्नेह हे विचार बाद ठरतात. एकाकीपणाला केवळ विवाह हाच उपाय आहे असे नाही, हे दाखविणारी ही कथा आहे.
संशय किती घातक असू शकतो हे ‘परिणीती’ या कथेतून लेखिकेने दर्शवले आहे. संशयामुळे खून, आत्महत्त्या आणि मुलांचं अनाथ होणं मनाला वेदना देऊन जातं. कथेतील नायक-नायिका जीवनाच्या अनुभवांनी अत्यंत अस्वस्थ असल्याचे दिसतात. त्यांच्या वाटेला आलेल्या जीवनात, संघर्षातून अस्वस्थता निर्माण होते. अभावग्रस्त जीवनातून ती पुढे सरकत जाते. काहीशी आर्थिक सुरक्षितता, माणसांशी तुटणारे स्नेहसंबंध त्यातून वैफल्य निर्माण होते. पुन्हा नवीन सुंदर संबंधाची आशा पल्लवित करणारी व्यक्ती प्रेमळ हात समोर करते, हे कथांचे वैशिष्ट्य दिसते. मानसिक ताणतणाव सहन न झाल्यामुळे कुटुंबाची नाळ कशी तोडली जाते याचे उदाहरण या कथांमध्ये आहे. संशयामुळे जर ती नाळ तोडली गेली तर जगण्यातला अर्थच हरवला जातो. तोंडात घास घेताना त्याचं कधी कडू जहर होत असतं ते कळतसुद्धा नाही. ‘खरं प्रेम’ या कथेमध्ये सिडेल एका मुलाच्या प्रेमात पडते तोही तिच्यावर प्रेम करतो. आईवडिलांना भेटवलं जातं. मग तो कॅनडाला जातो आणि एकदा फोन करतो. मग कधीच फोन येत नाही त्याचा! त्यामुळे तिच्यावर होणारा परिणाम, नंतर तिच्या आयुष्यात नीरज येतो, ही कथा सुखांताकडे जाते.
शत्रू आपल्याच घरात असतात, आपल्याजवळ ते वावरतात, आपल्या समग्र अस्तित्त्वात नकळत दुःखाचा विषाणू सोडून खच्ची करतात. मनुष्य बाहेरच्या जगाशी संघर्ष करताना डगमगत नाही, कारण बाहेरच्या जगाशी संघर्ष करायचा असतो ही सावध मनाची धारणा पूर्वापार तयार झालेली आहे. परंतु ध्यानीमनी नसताना मात्र आपल्याच घरात आपल्याच अस्तित्त्वाचे हरण होते तेव्हा तो संपूर्ण कोसळतो.

फक्त स्त्रियांचे भावविश्वच नव्हे तर पुरुषांच्या वाट्याला येणारी दुःखेही लेखिकेने आपल्या कथेतून दर्शविली आहेत. जसे ‘प्रविष्ट’ ही कथा आहे. प्रविष्ट हा श्रीमंत म्हणून विजेता त्याच्याशी लग्न करते, पण विजेता ही उत्शृंखल स्त्री आहे. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये होणारा परिणाम म्हणजे कुटूंबव्यवस्था अगदी पूर्णपणे कोलमडीस पाडणारा आहे. समाजाच्या प्रवाहात आपल्या कुटुंबाला अर्थ देणे हे इतिकर्तव्य मानणारी स्त्री तिची कदर न करणारा पुरुष आणि पुन्हा अतिशय समजदार, तिची कदर करणारा दुसरा पुरुष प्रत्यक्ष घटनांपेक्षा त्यांचे अन्वयार्थ त्या माणसांनी घटनांचा स्वीकार ज्या पद्धतीने केला तिच्या आयुष्यात येणे अशा आशयाच्या कथा आहेत. त्यांच्या भावविश्वातील तात त्यावर उरते. ‘पराधीन’ ही कथा नेपाळमध्ये राहणाऱ्या गरीब घरच्या रोशनला दलालाने भारतात विकले आणि तिची होणारी वाताहत, तिला मिळणारे प्रेम आणि अत्यंत दु:खद असा अंत या कथेचा आहे. विविध पातळ्यांवरील स्त्री-पुरुष संबंधाचे चित्रण धीटपणे आपल्या कथांमधून लेखिकेने केलेले आहे. ‘दुसरा दरवाजा’ या कथेतही अचल जीवनाला कंटाळून आत्महत्त्येचा पर्याय निवडते. परंतु मैत्री तिला वाचवते. हा आशेचा किरण लेखिकेने खूप सुरेख रंगवला आहे. स्त्रीला जाणवणारा आशेचा किरण त्यांच्या कथेत स्पष्टपणे येतो. अशा अनेक कथांमधून स्त्रीत्वाचा खऱ्या अर्थाचा शोध घेतलेला आहे. ‘नवी पहाट’ ही प्रियाची कहाणी अत्यंत हृदयद्रावक आहे. मुलींची लग्नं जबरदस्ती वयस्क मुलाशी करताना होणारी बळजबरी आणि त्यातून सुटणारी प्रिया. लेखिकेच्या परिश्रमाने ती ाता ब्युटी पार्लर चालवते आहे.
लेखिकेच्या कथेत व्यक्तिगत अनुभूतीचा जिवंतपणा आहे, भावनेचा उमाळा आहे आणि निरीक्षणाची सूक्ष्मता आहे. संघर्ष म्हणजे भांडण नव्हे, संघर्ष म्हणजे ताण, दबाव, दडपण हे समजण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी लेखकाचे मन जागृत असावे लागते. ही जागृती सर्चलाईटसारखी वर्तुळाकार फिरून आकाशाला पहारा देण्यासारखे आहे, तशी ही तीव्र जागृती असते. लेखकाच्या या जागृतीला संवेदनशीलतेची जोड असते. लेखिकेने अत्यंत डोळसपणे स्वानुभवावर आधारित कथालेखन केले आहे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या संदर्भातील संवेदनशीलताही अनुभवास येते. सुचिता यांच्या कथा थोडक्यात पण मोठा आशय सांगणाऱ्या आहेत. एकदा कथा हाती घेतली की ती पूर्णत्वाकडे जाईपर्यंत वाचकाला खिळवून ठेवते. खूप अलंकारिक भाषा न वापरता सरळ थेट असे त्यांचे लेखन आहे. जगणे फक्त आरामदायकच नव्हे तर अर्थपूर्ण हवे. नात्यांची जीवनात सुंदर वीण असायला हवी. कुटूंब समाजाची घडण व्हायला हवी. त्यासाठी जगण्याचे समाधान, एकत्र अर्थपूर्ण जगण्याचे समाधान व्यक्त करण्यासाठी लेखिका समाजात कार्य करत आहे.
डॉ. सुचिता यांचे व्यक्तिचित्रणही अप्रतिम आहेत. जसे ‘माऊ’, ‘दोघी’, ‘कुरुपदादा’, लेखिका कधी वर्तमानाच्या दृष्टीबिंदूतून गतकाळ पाहताना दिसते तर कधी गतकाळाच्या दृष्टीबिंदूतून वर्तमान न्याहाळताना दिसते. ही दुहेरी मनोवस्था लेखिकेच्या अनुभवाला नवनवीन परिमाणे देताना दिसतात. कथा आणि व्यक्तिचित्रणे वाचताना वाचक त्या कथेशी एकरूप होतो. त्यांचे दुःख आपल्याही आयुष्यात काही प्रमाणात आले आहे असे कुणाला ना कुणाला अनुभव येतच असेल. कारण प्रत्येकाने बंदिवास, एकांतवास, अपयश, आरोपांचा रोष असे कधी ना कधी, काही ना काही सहन केलेलेच असते. शारीरिक छळ नसेल पण मानसिक, सामाजिक छळ हा काही ना काही प्रमाणात प्रत्येकाने सोसलेलाच असतो. आपल्यावरील प्रत्येक अन्यायाला आणि आरोपाला खंबीरपणे उत्तर द्यावे. आयुष्याला सकारात्मकतेने बघावे अशी शिकवण कथासंग्रहातून दिली आहे.
झाले जलमय…
लेखिका: डॉ. सुचिता पाटील
प्रकाशक: शारदा प्रकाशन
पृष्ठे: १११
मूल्य: ३२५/- रुपये सवलतमूल्य: ३००/- रुपये
टपालखर्च: ५०/- रुपये

पुस्तकाच्या खरेदीसाठी संपर्कः ग्रंथ संवाद (8383888148, 9702070955)