राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीकरीता आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सुनेत्रा पवार यांनी उमेदवारीअर्ज दाखल केल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांना दिली.
राष्ट्रवादीच्या संसदीय मंडळाची बैठक बुधवारी रात्री पार पडली. या बैठकीत एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज त्यांचा उमेदवारीअर्ज दाखल करत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनीवरून दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे त्याठिकाणी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल खासदार होते. ते पुन्हा एकदा निवडणूक लढवून खासदार झाले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेली जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी एकमताने सुनेत्रा अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे नाराजी असण्याचे कारणच नाही. आम्ही राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीमध्ये बसून निर्णय घेत असतो. पक्षाच्या हिताच्यादृष्टीने आणि भविष्यात काय याचा सारासार विचार करून निर्णय घेतला गेला आहे. पक्षात कुठलीच नाराजी नाही आणि महायुतीतही अजिबातच नाराजी नाही असेही तटकरे म्हणाले.
सुनेत्रा पवार आपला उमेदवारीअर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.