Homeटॉप स्टोरीपंतप्रधान मोदींची अशी...

पंतप्रधान मोदींची अशी माफी मान्य नाही!

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशभरातील शिवप्रेमींच्या भावना संतप्त असल्याने पंतप्रधान नरेंद्न मोदींनी माफी मागितली. पण ही माफी मागतानाही त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. आम्हाला अशी माफी मान्य नाही, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीने मुंबईत हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधानांनी पुतळा पडला म्हणून माफी मागितली, की भ्रष्टाचार झाला म्हणून, की भ्रष्टाचाराला पांघरूण घालण्यासाठी माफी मागितली? महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. देशाचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने या शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, मालवणच्या राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. गेट वे ऑफ इंडियासमोरचा पुतळा अनेक वर्षांपासून आहे. राज्यातही अनेक भागात असे पुतळे आजही भक्कमपणे उभे आहेत. ते कोसळले नाहीत. भ्रष्टाचारामुळे राजकोटच्या किल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना घडली.

भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला गेला. विधानसभा निवडणुकांचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, छत्रपती शाहू महाराज, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, संजय राऊत, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, आदित्य ठाकरे, अतुल लोंढे आदी सहभागी झाले होते. हुतात्म्यांना अभिवादन करून हा मार्चा गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला.

1 COMMENT

  1. खरेच ओढून ताणून मागितल्यासारखी माफी वाटते. नाहीतर पहिल्याच दिवशी मागितली असती. निवडणूक असल्यामुळे माफी मागण्या शिवाय पर्यायच नाही.

Comments are closed.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content