महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत ५५व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये निवडक मराठी चित्रपटांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करण्यात येणार आहे. महामंडळाने १ ऑगस्ट २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या चित्रपटांच्या प्रवेशिका मागविल्या असून निर्मात्यांनी विहित नमुन्यातील प्रवेशअर्ज १६ ऑगस्ट २०२४पर्यंत महामंडळाच्या जनसंपर्क विभागात अथवा gfffm2024@gmail.com या ई-मेलवर सादर करायच्या आहेत. जास्तीतजास्त चित्रपट निर्मात्यांनी प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील यांनी केले आहे.
मराठी चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे त्यांना आंतराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी मागील आठ वर्षांपासून गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये शासनाच्या वतीने महामंडळ सहभागी होत आहे. यंदाही महामंडळ सहभागी होणार असून चित्रपटांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. याबाबतची अधिक माहिती महामंडळाच्या www.filmcitymumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.