दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांचा मालिकेत यजमान भारतीय संघाला मालिका गमवावी लागल्यामुळे सध्या भारतीय कसोटी संघाचा सारा मामला गंभीर बनलाय. गतवर्षी केन विल्यमसनच्या न्युझीलंड संघाने कधी नव्हे ते भारतभूमीत कसोटी मालिकेत भारतला “व्हाईटवॉश” देण्याचा आगळा पराक्रम केला होता. आता तब्बल २५ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाने पुन्हा एकदा कसोटी मालिकेत भारतावर बाजी उलटवण्यात यश मिळवले. भारताला भारतभूमीत दोन वेळा “व्हाईटवॉश” देणारा दक्षिण आफ्रिका हा पहिला संघ ठरला आहे. दोन कसोटीत खेळपट्टीचा नूर पाहता भारताची अवस्था “शिकारी खुद शिकार हो गया” अशीच काहीशी झाली. दोन्ही कसोटीतील पराभव भारतीय संघासाठी लाजीरवाणी होते. पहिली कसोटी अडीच दिवसात संपली. पहिली कसोटी जिंकण्यासाठी भारताला अडीच दिवसात अवघ्या १२४ धावा करायच्या होत्या. पण दक्षिण आफ्रिका गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या ९३ धावांतच कोसळली. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत भारताला आपल्या सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरी कसोटी दक्षिण आफ्रिका संघाने शेवटच्या दिवशी तब्बल ४०८ धावांनी जिंकली. २०००मध्ये भारतात झालेल्या उभय संघातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत हन्सी क्रोनिएच्या संघाने भारताला पहिल्यांदा २-० असा “व्हाईटवॉश” दिला होता. आता त्याची पुनरावृत्ती बावुमाच्या दक्षिण आफ्रिका संघाने पुन्हा करुन दाखवली.

बावुमाच्या दक्षिण आफ्रिका संघाला हलक्यात घेण्याची चूक भारतीय संघाच्या अंगाशी आली. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन त्यांनी कसोटी चॅम्पियनशिप जिंकली होती हे भारतीय संघ बहुधा विसरला. भारतात येण्यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. हा दौरा भारतीय दौऱ्याच्या तयारीच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिकेसाठी खूप फलदायी ठरला. तेथे आशिया खंडातील उष्ण वातावरणात खेळण्याचा सराव त्यांना करता आला. तसेच पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजाशी दोन हात करुन दक्षिण आफ्रिका फलंदाजांनी भारत दौऱ्यासाठी आपली चांगली तयारी करुन घेतली. तिथे २ कसोटी सामन्यांची मालिका दक्षिण आफ्रिका संघाने १-१ अशी बरोबरीत सोडवली होती. त्यानंतर भारतात येण्याअगोदर दक्षिण आफ्रिका संघाचा १० दिवसांचा सराववर्ग जोहान्सबर्ग येथे झाला. एकूणच दक्षिण आफ्रिका संघाने भारत दौऱ्यासाठी जोरदार तयारी केली होती. त्याचा त्यांना चांगलाच लाभ झाला यात शंका नाही. दोन्ही कसोटी सामन्यांत भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या तेज आणि फिरकी माऱ्यासमोर गुडघे टेकले. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेच्या मालिका विजयाचे काम सोपे झाले. कसोटीत सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीचा अभाव सध्या भारतीय कसोटी संघात जाणवतोय. सामन्यातील परिस्थितीनुसार चिवट फलंदाजी करणारे, खेळपट्टीवर घट्ट पाय रोवून एक बाजू भक्कमपणे लावून धरणाऱ्या आणि जबाबदारीने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाची भारतीय कसोटी संघात वानवा आहे. सामन्यातील परिस्थितीचा विचार न करताच खराब फटके मारुन भारतीय फलंदाज प्रतिस्पर्धी संघाला आपल्या विकेट बोनस म्हणून देण्यात स्वतःला धन्य मानतात, असेच काहीसे सुमार चित्र भारतीय फलंदाजांबाबत दिसत आहे.
एका जमान्यात कसोटी सामन्यात भक्कम फलंदाजी ही भारताची ताकद असायची. पण आता मात्र त्याला कुठेतरी छेद बसतोय. एका जमान्यात घरच्या मैदानावर दादा असणाऱ्या भारतीय संघासाठी ही आता धोक्याची घंटा आहे. कसोटी सामन्यात मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीर यांचे डावपेच, रणनीती साफ चुकत आहे. चुकीची संघनिवड, खेळाडूंच्या क्रमवारीत होणारे सततचे बदल, फिरकीसाठी पोषक खेळपट्यांचा गंभीर यांचा आग्रह भारतीय संघाला पराभवाचा खाईत लोटत आहे. कसोटीत फलंदाजीत तिसरा क्रमांकाचा फलंदाज खूप महत्त्वाचा असतो. पण त्या क्रमांकाकडे गंभीर यांचे लक्ष नाही. या क्रमांकासाठी किती फलंदाजांवर प्रयोग करण्यात आले त्याची गणती नाही. पहिल्या कसोटीत अष्टपैलू वाॅशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी दिली, तर तोच सुंदर दुसऱ्या कसोटीत आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. इंग्लंड कसोटी मालिकेत अनुभवी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला केवळ पॅसेंजर म्हणून नेले होते. त्याबाबत गंभीर यांच्यावर जोरदार टीका झाल्यावर नंतरच्या मालिकात प्रशिक्षकांनी आपली चूक सुधारली. आतापर्यंत गंभीर याच्या प्रशिक्षकपदाखाली १९ कसोटीत भारताला १० सामने गमवावे लागले तर ७ सामने जिंकले. पण त्यात दुबळ्या बांगलादेश, वेस्टइंडीज सघांचा समावेश आहे. गंभीर भारतीय संघाला ताकदवान करण्यापेक्षा कमकुवत करतोय असेच चित्र सध्या दिसतेय. बीसीसीआयने आता कसोटी सामन्यासाठी नव्या प्रशिक्षकाची निवड करणे उचित ठरेल.

गंभीरचे लाड करणे आता पुरे झाले. भारतीय संघातील खेळाडूंचेदेखील कान टोचणे गरजेचे आहे. त्यांना साऱ्या सुविधा आणि बक्कळ पैसा देऊनही त्यांची कामगिरी सुधारत नसेल तर त्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवून इतर युवा खेळाडूंना संधी द्यावी. मग भारत हरला तरी त्याचे फारसे वाईट वाटणार नाही. या शानदार विजयाबाबत दक्षिण आफ्रिका संघाचे कौतुक करु तेवढे कमी आहे. त्यांनी सामन्यात मिळालेल्या संधीचे सोने केले. कर्णधार बावुमाने १२पैकी ११ कसोटीत विजय मिळवत विश्वविक्रम केला. त्याने कल्पक नेतृत्त्व करुन या मालिकेवर आपल्या नेतृत्त्वाची छाप पाडली. पहिल्या कसोटीत त्याने आपला लढाऊ बाणा दाखवला. गोलंदाजातील त्याचे बदल निर्णायक ठरले. संघातील खेळाडूंचे मनौधैर्य त्याने नेहमीच उंचावले. दक्षिण आफ्रिका संघाला विजयाची नवी उमेद बावुमाने दाखवली. त्याचा अनुभवी तेज गोलंदाज रबाडा दुखापतीमुळे या मालिकेला मुकला. पण त्याची उणीव संघातील इतर गोलंदाजांनी जाणवू दिली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या मार्करमने दुसऱ्या कसोटीत ९ झेल टिपून नवा विश्वविक्रम केला. त्याने अजिंक्य रहाणेचा ८ झेलांचा विक्रम मोडीत काढला. भारत, न्युझीलंड मालिकेत न्युझीलंड फिरकी गोलंदाज सँटेनर भारतासाठी कर्दनकाळ ठरला होता. आता दक्षिण आफ्रिकेचा हार्मर भारतासाठी डोकेदुखी होता. त्याने १७ बळी घेऊन भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. त्याने शिस्तबद्ध, योजनाबद्ध, सतत फलंदाजावर दबाव टाकणारी गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना डोईजड होऊ दिले नाही. आता या पराभवामुळे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक टेस्ट चॅम्पियनशिप फायनल प्रवेशाच्या भारताच्या आशा धूसर झाल्या आहेत. या दारुण पराभवातून निवड समिती आणि संघव्यवस्थापन काही बोध घेणार का ते बघायचे. आता उभय संघात लवकरच वन डे मालिका सुरु होणार आहे. त्यातदेखील दक्षिण आफ्रिका संघ आपली विजयी दौड कायम राखतो का याची क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता असेल…


ह्या सर्व प्रकाराला श्रीमान गौतम गंभीर हे सर्वस्वी जबाबदार आहेत.कोचिंग स्टाफ………, मग भारतीय बॅटर्स ना त्यांच्या होणाऱ्या चुका समजवून सांगणे याचा पैसा घेतात ना?
इतरही गोष्टी आहेत पण एकच वानगी दाखल लिहिली.
बाकी भारतात बरेच प्रभावी कोच आहेत. जे भारतीय संघास दैदीप्यमान यश मिळवून देऊ शकतात.,त्यांच्या हातात संघ देणे संयुक्तिक ठरेल.
श्री. सुहास जोशी, जेष्ठ पत्रकार यांनी उत्कृष्ठ विवेचन केले आहे. १००% सहमत आहे.