आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १५०० अंकांच्या घसरणीसह ८० हजारांच्या खाली गेला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक जवळपास ५०० अंकांनी घसरला. या मोठ्या घसरणीत काही मिनिटांतच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे जवळपास १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
जागतिक पातळीवर घडामोडींचा परिणाम म्हणून आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहयला मिळाली. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील मंदीच्या भीतीने जागतिक शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स आणि निफ्टी आज सलग दुसऱ्या सत्रात घसरले. सुरुवातीच्या व्यवसायात वाहन क्षेत्रावर खूप दबाव होता. मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्समध्ये प्रत्येकी चार टक्क्यांनी घसरण झाली.
बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की, या आठवड्यात जागतिक बाजारांवर लक्ष केंद्रित केले जाईल, कारण दीर्घ कालावधीनंतर जागतिक शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. इराण आणि इस्रायलमधील तणावाने जगभरातील बाजारपेठा हादरल्या आहेत. जपानमध्येही शेअर बाजारात घसरण झाली आहे. जपानमध्ये गेल्या ३५ वर्षांतील ही सर्वाधिक मोठी पडझड आहे. जपानमधील शेअर बाजार घसरणीचे हे प्रमाण आठ टक्के आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडीमुळे ही स्थिती उभी ठाकली आहे.
अर्थतज्ज्ञांच्या मते शेअर बाजारातील ही पडझड युद्धामुळे झाली असे म्हणता येणार नाही. कारण युद्धामुळे शेअर बाजार गडगडला म्हणायचं झालं तर तेलाचा भाव मोठ्या प्रमाणात वाढला असता. तेलाचे भावदेखील गडगडले आहेत. तेलाचे भाव गडगडणे हे मंदीच्या भीतीचे द्योतक आहे. त्यामुळेच गेल्या आठवड्यात अमेरिकेत पडझड झाली. त्याचे आता आशियाई बाजार पडत आहेत. भारतातही शुक्रवारी पडझड पाहायला मिळाली, असे विश्लेषण अर्थतज्ज्ञ अजित फडणीस यांनी केले आहे.
भारतीय शेअर बाजारातील पडझड इतर देशांच्या तुलनेत कमी झाली आहे. एका उच्चाकांवरून काहीशी करेक्शन्स येणं हे बाजाराच्या पुढच्या वाटचालीसाठी चांगली बाब असते. बाजाराला निमित्त हवे असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भयभीत होण्याचं काही कारण नाही. त्यांनी बाजारात आपली गुंतवणूक व्यवस्थित राखावी. दबावात येऊन भीतीने शेअर्सची विक्री करू नये. पाऊस पडल्यानंतर जसा लख्ख प्रकाश पडतो, तसा हा प्रकार आहे. त्यामुळे धीर धरावा. बाजारात खरेदीला पुन्हा एकदा संधी लाभली तर त्याचा लाभ घ्यावा असे मला वाटते, असेही फडणीस यांनी सांगितले.