पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या ८०व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन तसेच उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी शिरसाठ यांनी संस्थेच्या महाराष्ट्रातील विविध शाळा, महाविद्यालये व वसतिगृहाच्या नूतनीकरण, पुनर्बांधणी व विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सेवा मिळाव्यात या हेतूने शासनाकडून ५०० कोटी मिळवून देण्याचे जाहीर केले होते. त्याचा पाठपूरावा करून त्यांनी अलिकडेच मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये ५०० कोटी सोसायटीच्या १२ महाविद्यालये व वससतीगृहासाठी मंजूर करून घेतले. यामध्ये सिद्धार्थ महाविद्यालयासाठी ४२ कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
लवकरच प्रत्येक महाविद्यालयाचे प्राचार्य व वरिष्ठ प्राध्यापकांनी समाजकल्याण सचिव व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंतासोबत बैठक करून कशाप्रकारे नूतनीकरण करावे व कोणकोणत्या मुलभूत शैक्षणिक सुविधा असाव्यात त्याचा आराखडा तयार करून देण्यासाठी शिरसाठ यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. शिरसाठ यांच्या स्वागतासाठी व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कॉलेजच्या सभागृहात छोटेखानी कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. प्रभारी प्राचार्य डॉ. विष्णू भंडारे यांनी सिद्धार्थ महाविद्यालयाची थोडक्यात माहिती दिली.

तळागाळातील गोरगरीब बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी सहज मिळावी या उदात्त हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५३ साली या महाविद्यालयासह इतरही महाविद्यालयांची स्थापना केली होती. या ठिकाणी ३५००-४००० विद्यार्थी प्रत्येक वर्षी शिक्षण घेत असतात. यामध्ये कनिष्ठ तथा वरिष्ठ महाविद्यालयात अनुदानित व विनाअनुदानित ६ प्रकारच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शासनाच्या नविन शैक्षणिक धोरणानुसार या विद्यार्थ्यांना कौशल्यविकास आधारीत शिक्षण देण्यासाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा व त्यासाठीचे पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्मार्ट क्लासरूम, संगणक व कम्युनिकेशन प्रयोगशाळा, सेमिनार हॉल यामुळे विद्यार्थ्यांना पदवीसोबत कमी फीमध्ये अल्प कालावधीचे जॉब ओरिएंटेड कौशल्यविकास आधारीत कोर्सेस देता येतील, परिणामी आमचे विद्यार्थी भविष्यात सुशिक्षित बेरोजगार राहणार नाहीत. प्राप्त परिस्थितीत अशा शैक्षणिक आव्हानांना आम्ही सामोरे जात असताना शासनाकडून मिळत असलेली मदत आमच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फार मोलाची ठरणार आहे, असे ते म्हणाले.
शिरसाठ यांनी त्यांच्या भाषणातून ते पिईएसच्या मिलिंद महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचा आवर्जून उल्लेख केला व त्यामुळे त्यांनी कर्तव्यभावनेने ५०० कोटी शासनाकडून देण्याची केलेली घोषणा प्रत्यक्षात कृतीत उतरवली. सदर रक्कम मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये सर्व सहमतीने मंजूर होऊन शासनाकडून तसा जीआरदेखील निघालेला आहे, त्यामुळे त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले. आजच्या स्पर्धेच्या युगात पिईएसच्या महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आधुनिक तंत्रज्ञान व सेवासुविधांनी अद्ययावत व्हावीत यासाठी शासनाकडून नियमितपणे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे आटोपशीर व सुंदर सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्रा. संजयकुमार बोरसे यांनी केले. वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. समीर ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

