महाराष्ट्रात येत्या २६ जूनला होणाऱ्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा (स्पेशल कॅज्युअल लिव्ह) घेता येणार आहे. या कर्मचाऱ्यांना नियमित मिळणाऱ्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त ही नैमित्तिक रजा असेल.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१च्या कलम १३५-बनुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देण्याची तरतूद आहे. विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने, त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या २३ जून २०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे. ही रजा त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या २४ मे २०२४ रोजी जारी झालेल्या प्रसिद्धीपत्रकान्वये विधान परिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर तसेच नाशिक व मुंबई या शिक्षक मतदारसंघांच्या व्दैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी येत्या बुधवारी २६ जूनला सकाळी ७.०० ते सायं ६.०० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सोमवारी, १ जुलै २०२४ रोजी याची मतमोजणी होणार आहे.