महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ या स्पर्धा परीक्षेमध्ये लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची टंकलेखन कौशल्यचाचणी आयोगाकडून आयोजित करण्यात आल्या असून या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्यचाचणीस पात्र उमेदवारांना त्यांनी सादर केलेल्या विकल्पावरून टंकलेखन कौशल्यचाचणी होणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे.
आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकातील तरतुदी व मुख्य परीक्षेवेळी अर्ज सादर करताना उमेदवारांनी सादर केलेल्या विकल्पानुसार आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व उमेदवारांना कोणत्या भाषेची टंकलेखन कौशल्यचाचणी द्यावयाची आहे याबाबत दोन्ही संवर्गाच्या स्वतंत्र याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर Candidates Information > Results > Results of Examination/Recruitment येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. याद्यांमध्ये प्रसिद्ध केल्यानुसारच उमेदवारांची टंकलेखन कौशल्यचाचणी घेतली जाईल. टंकलेखन कौशल्यचाचणीची भाषा बदलून देण्याबाबतच्या कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नसल्याची नोंदही उमेदवारांनी घ्यावी, असेही आयोगाने कळविले आहे.
दोन्ही संवर्गाच्या टंकलेखन कौशल्यचाचणीमधून सूट असलेल्या उमेदवारांच्या संवर्गनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्यचाचणीस पात्र ठरलेल्या दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी प्रवर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना शासनाच्या धोरणानुसार टंकलेखन कौशल्यचाचणीत सूट असल्यामुळे या वर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन कौशल्यचाचणी देण्याची आवश्यकता नाही. तसेच त्यांना आयोगाकडून टंकलेखन चाचणीसाठी प्रवेश प्रमाणपत्रही निर्गमित केले जाणार नाही.
कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्यचाचणीस पात्र ठरलेल्या दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ प्रवर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना शासनाच्या धोरणानुसार टंकलेखन कौशल्यचाचणीत सूट असल्यामुळे या वर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन कौशल्यचाचणी देण्याची आवश्यकता नाही तसेच त्यांना आयोगाकडून टंकलेखन चाचणीसाठी प्रवेश प्रमाणपत्र निर्गमित केले जाणार नाही. मात्र प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी या प्रवर्गातील उमेदवारांना कर सहायक संवर्गासाठी मराठी व इंग्रजी भाषेतील टंकलेखन कौशल्यचाचणी अनिवार्य राहिल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
टंकलेखन कौशल्यचाचणीत सूट असलेल्या उमेदवारांची त्यांच्या मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. लिपिक टंकलेखक संवर्गाचे सेवाप्रवेश नियम व जाहिरातीतील तरतुदीनुसार या संवर्गासाठी मराठी ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे. परंतु काही उमेदवारांकडे इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्राऐवजी इंग्रजी ३० श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्र असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. यास्तव ज्या उमेदवारांकडे इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्राऐवजी इंग्रजी ३० श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्र आहे व त्यांनी इंग्रजी भाषेतून टंकलेखन कौशल्यचाचणी देण्याचा पर्याय निवडला आहे त्या उमेदवारांची मराठी टंकलेखन कौशल्यचाचणी घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
कर सहायक संवर्गाचे सेवाप्रवेश नियम व जाहिरातीतील तरतुदीनुसार या संवर्गासाठी मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे. कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्यचाचणीस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतील टंकलेखन कौशल्यचाचणी अनिवार्य असल्याचेही आयोगाने कळविले आहे.