Thursday, January 23, 2025
Homeन्यूज ॲट अ ग्लांसबीड सरपंचांच्या हत्त्येची...

बीड सरपंचांच्या हत्त्येची एसआयटी तसेच न्यायालयीन चौकशी

बीडमध्ये झालेल्या संतोषअण्णा देशमुख या सरपंचाच्या हत्त्येप्रकरणी पोलीस महानिरीक्षकांच्या एसआयटीद्वारे म्हणजेच विशेष चौकशी पथकाद्वारे चौकशी केली जाईल आणि या प्रकरणात गुन्हेगारीच्या इको-सिस्टिमसंदर्भात न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. या दोन्ही चौकश्या तीन ते सहा महिन्यांत पूर्ण करून या गुन्ह्यातील सर्व आरोपींवर संघटित गुन्हेगारीची मोक्कासह सर्व कलमे लावून चौकशी केली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. बीडच्या पोलीस अधीक्षकांची तातडीने बदली करत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. याप्रकरणी वाल्मिक कराड किंवा अन्य कोणाचाही सहभाग असेल आणि अशा लोकांचे अगदी कोणाबरोबरचेही फोटो उपलब्ध असले तरी गुन्ह्यात सहभाग असल्यास त्या व्यक्तीवर कडक कारवाई केली जाईल आणि कोणालाही सोडले जाणार नाही, असेही फडणवीस यांनी विधानसभेला आश्वस्त केले. मात्र, त्यांच्या उत्तरानंतर सरकार धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत विरोधी पक्षांनी विधानसभेतून सभात्याग केला.

बीड परभणीमधील गुन्हेगारीच्या घटनांच्या संदर्भात गेले दोन दिवस झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी उत्तर दिले. उच्च न्यायालयाने पदावरील न्यायमूर्ती चौकशीसाठी देण्यास असमर्थता दर्शवल्याचे काही वर्षांपूर्वीच सरकारला कळवलेले आहे. त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांमार्फतच या चौकश्या होऊ शकतील, हेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

बीड

बीडमध्ये आवाडा ग्रीन एनर्जी कंपनीने गुंतवणूक केली आहे. त्यांना आम्हाला कामे द्या, त्याच रेटने द्या नाही तर खंडणी द्या, या मानसिकतेत काही लोक वावरताना दिसत आहेत. बीडमध्ये ६ डिसेंबर २०२४ला दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास अशोक नारायण घुले, प्रतीक घुले आणि इतर आरोपी गेले. त्यांनी अमरदीप भगवान सोनावणे या रखवालदाराला शिवीगाळ, मारहाण केली. वरिष्ठ व्यवस्थापक शिवाजीराव थोपटे यांना मारहाण केली. संतोषअण्णा देशमुख सरपंच होते. त्यांना फोन केला की आम्हाला मारहाण करताहेत. बाजूच्या गावचे लोक, सरपंच तेथे आले. देशमुखांसोबतही अनेक लोक होते. दादागिरी करत असतील तर धडा शिकवायचा म्हणून त्यांना चोप दिला. घुलै वगैरेंना कसा मार खावा लागला याचा व्हिडियोही व्हायरल झाला.

मग ९ डिसेंबर २०२४ला संतोषअणा चारचाकीतून गावी परत जात होते. एकटे होते ते. त्यांचे आत्त्येभाऊ दिसले. त्यांना बरोबर घेतले बरोबर चल म्हणून. निघाल्यावर टोल नाक्यावर एक काळ्या रंगाची स्कॉर्पियो आणि आणखी एक गाडी त्यांची वाट बघत होत्या. त्या गाड्यांनी अडवले आणि ड्रायव्हर साईडची काच फोडली पण संतोषण्णा तेथे नव्हते. मग दुसऱ्या बाजूने जाऊन त्यांना बाहेर काढले. स्कॉर्पियोत मारहाण केली गेली. बराच वेळ संतोषअण्णा यांना तारा गुंडाळलेल्या, त्याचे व्रण दिसत आहेत पाठीवर, प्रचंड मारहाण करण्यात आली. मग पुढे उतरवून मारहाण करण्यात आली. लक्षात आले की हे आता जिवंत नाहीत तेव्हा त्यांना तेथे सोडून देण्यात आले. सरपंच यांचा भाऊ विष्णू महादेव चाटेच्या यांच्या संपर्कात होता. तो सारखा सांगत होता वीस मिनिटात सोडतोय, पंचवीस मिनिटात सोडतोय. निर्घृण हत्त्या झालेली आहे. त्यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले, असे फडणवीस म्हणाले.

बीड

६ तारखेची घटना मग एट्रॉसिटी उशिरा का दाखल झाली हा प्रश्न काही सदस्य उपस्थित करत आहेत, याकडे लक्ष वेधून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आधी प्रकल्प अभियंता थोपटे यांनी फिर्याद दिली आणि नंतर सोनवणे यांनी फिर्याद दिली. तेव्हा सोनवणे यांच्या फिर्यादीनंतर एट्रॉसिटी दाखल झाली. या प्रकरणात मास्टरमाइंड कोणीही असला तरीही कारवाई केलीच जाईल. या गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराडबद्दलचे पुरावे असले आणि कराडचे फोटो सर्वांबरोबर असले तरीही कारवाई केली जाईल.

बीड जिल्ह्यामध्ये अराजकाचे राज्य तयार करण्याचा प्रयत्न होत आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले की, पोलीस प्रशासनावर जबाबदारीच आहे आणि कालही महासंचालकांना सांगितलं आहे की एखादी फिर्याद नोंदवताना वस्तुस्थिती काय आहे, हे बघायला हवे. फिर्याद घ्यायची आणि नंतर डी समरी करायची, हे चालणार नाही. पाळंमुळं खणून काढू आणि ३०२ वगैरे तर लागेलच. पण सर्व गुन्हे लक्षात घेऊन एकत्रितपणे संघटित गुन्हेगारीविरुद्धचा मकोकादेखील लावला जाईल. दूरान्वयानेही जे जे लोक या गुन्ह्यांमध्ये प्रत्यक्षपणे किंवा मदत करत आहेत असे निष्पन्न झाले तर संघटित गुन्हेगारीचा भाग म्हणून मकोकामध्ये टाकले जाईल. बीडमध्ये वाळूमाफिया तसेच उद्योगांना त्रास देणारे लोक आहेत. विशेष मोहीम हातामध्ये घेऊन या सर्वांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

या प्रकरणात दोन प्रकारची चौकशी केली जाईल, असे सांगून फडणवीस म्हणाले की, एक आयजी म्हणजेच महानिरीक्षक लेव्हलच्या अधिकाऱ्याच्या अंडर एसआयटी केली आहे. ती गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करेल तर दुसरी न्यायालयीन चौकशी इको सिस्टिमच्या अनुषंगाने तीन ते सहा महिन्यांत केली जाईल. देशमुख यांच्या परिवाराला दहा लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून करण्यात येईल. या प्रकरणाची गंभीरता आणि जी प्रकरणे बाहेर येत आहेत त्या सर्वामध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराई असल्याने बीड एसपींना बदली तातडीने करण्याचा निर्णय मी घेतला आहे, असेही फडणवीस यांनी जाहीर केले. या प्रकरणात टी ए महाजन यांनी त्वरेने कारवाई केलेली सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, कारण केवळ लोकभावना आहे म्हणून पोलिसांवर कारवाई केल्यास पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Continue reading

हिवाळी अधिवेशनाच्या सहलीतून जनतेला नेमके काय मिळाले?

नागपूर कराराचे पालन करण्याची संविधानिक जबाबदारी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेऊन राज्य सरकारने पूर्ण केली पण विदर्भाच्या सर्वसामान्य नागरिकांना या सहा दिवसांच्या कामकाजातून नेमके काय मिळाले, हा प्रश्न नेहमीप्रमाणे अनुत्तरितच राहिला. कापूस, सोयाबीनला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळतो का, विदर्भातील किंवा...

बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो..

बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो.. महाराष्ट्रात सध्या राजकारणात काय चाललंय समजत नाही, कोण कुणाबरोबर जाईल आणि कोण नेमके कोणत्या पक्षात आहे, हे समजत नाही, अशी स्थिती आहे, ही तक्रार बरेचजण करतात. पण, मुळात गुंतागुंतीचे...

विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हच्या मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवल्या चिंधड्या…

नव्या सरकारमधील विधानसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी ९७ मिनिटे तडाखेबंद फटकेबाजी केली आणि विरोधकांचे फेक नॅरेटिव्ह उद्धवस्त करण्यासाठी मी उभा आहे, असे सांगत ईव्हीएमवरील आक्षेपांचा समाचार त्यांनी सोदाहरण घेतला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानात माजी...
Skip to content