पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांना जास्तीतजास्त मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार काल सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्य सरकारच्या आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्यामध्ये झालेल्या मॅरेथॉन बैठकीत करण्यात आला.
देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदाची लोकसभा निवडणुक महत्त्वाची आहे आणि या देशाचे भवितव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सुरक्षित आहे, याच भूमिकेतून लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. सावरा यांना पाठिंबा देत असल्याचे श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि विवेक पंडित यांच्यामध्ये काल सकाळी पालघरमध्ये पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचार व नियोजनासंदर्भात महत्वपूर्ण बैठक झाली. या मॅरेथॉन बैठकीला श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वरठा यांच्यासह श्रमजीवी संघटनेचे जिल्हा प्रमुख, सर्व तालुका प्रमुख आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पुढील प्रचाराच्यादृष्टीने मंत्री रविंद्र चव्हाण आणि विवेक पंडित यांच्यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या १० वर्षांच्या कारकिर्दीत देशातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योजना सुरु केल्या. त्यामुळे आज आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येऊ शकला. पंतप्रधान मोदी यांची ही विकासाची भूमिका आमच्या उद्दिष्ट्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. म्हणूनच श्रमजीवी संघटना महायुतीला पाठिंबा देत आहे. तसेच पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या विजयासाठी श्रमजीवी संघटना पूर्णपणे सक्रिय आहे. आमचे कार्यकर्ते व पदाधिकारी त्यादृष्टीने प्रचारात सहभागी झाले असून डॉ. सावरा यांना विजयी करण्यासाठी श्रमजीवी संघटना सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही पंडित यांनी या बैठकीत सांगितले.
पालघर लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार डॉ. सावरा यांच्या प्रचाराच्यादृष्टीने श्रमजीवी संघटनेची जिल्हा व तालुका पातळीवरील तसेच गाव पातळीवरील यंत्रणा सहभागी झाली आहे. त्यादृष्टीने महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यात येणार आहे तसेच गावफेरीचेही नियोजन करण्यात येईल. केंद्र सरकार तसेच राज्यातील महायुतीचे सरकार यांनी आदिवासींच्या विकासासाठी सुरु केलेल्या व अंमलात आणलेल्या योजनांची माहिती आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे प्राधान्य राहणार आहे.