दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मंगळवारी खराब हवामानामुळे गुजरातमध्ये सूरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानात १५०पेक्षा जास्त प्रवासी होते. शिर्डी विमानतळावर जोरदार वारे आणि अत्यंत कमी दृश्यमानता असल्याने लँडिंग अशक्य झाल्यावर पायलटने विमान सुमारे एक तास आकाशात फिरवले. या काळात प्रवाशांमध्ये, विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांमध्ये तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पायलटने हवामान सुधारण्याची वाट पाहत विमानाला चक्री मार्गाने फिरवले, पण शेवटी जोखीम न घेता सूरत एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि लँडिंगची परवानगी घेतली. विमान अचानक सूरतच्या दिशेने वळल्यावर प्रवाशांचा गोंधळ अधिक वाढला, मात्र विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने शांतता राखली आणि आवश्यक ती माहिती प्रवाशांना दिली.

सुरत विमानतळावर विमानाने सुरक्षितपणे लँडिंग केल्यावर प्रवाशांनी टाळ्यांच्या गजरात पायलटचे मनापासून आभार मानले. विमानतळ प्रशासनाने आधीच सुरक्षा आणि वैद्यकीय पथके तयार ठेवली होती. हवामान सुधारेपर्यंत सर्व प्रवाशांना विमानतळावरच थांबवण्यात आले. नंतर हवामान सामान्य झाल्यावर विमान पुन्हा सूरतहून शिर्डीकडे रवाना झाले. या संपूर्ण प्रक्रियेमुळे प्रवासी आपल्या नियोजित वेळेपेक्षा तीन तास उशिरा शिर्डीला पोहोचले. शिर्डी विमानतळावर लँडिंग झाल्यावर प्रवाशांनी ‘साई राम’चा जयघोष करत आनंद व्यक्त केला.
विमान दिल्लीतून वेळेवर उडाले होते. शिर्डीजवळ पोहोचताच हवामानाने साथ दिली नाही. या घटनेत कोणतीही जखम किंवा नुकसान झाले नाही. विमान कंपनीने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सर्व व्यवस्था केली होती आणि पर्यायी नियोजनही तयार ठेवले होते. हवामान खात्याच्या माहितीनुसार, शिर्डी परिसरातही लँडिंगबाबत काहीशी अनिश्चितता निर्माण झाली होती.

