ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांनी कालच्या शुक्रवारी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. 2 हजार 755 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. यात नवीन घोषणा काही नाहीत. हाती घेतलेले जुने प्रकल्प मात्र मार्गी लावण्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे. पालिकेच्या खजिन्यात खडखडाट असतानाही नवीन प्रकल्पाची घोषणा आयुक्तांनी केली नाही म्हणून ते अभिनंदनास पात्र आहेत. नाहीतर आजकाल सरकार असो वा महापालिका, आपल्याला न झेपणाऱ्या लोकप्रिय घोषणा करायच्या. परंतु, अर्थसंकल्पात मात्र त्याबाबत आर्थिक तरतूद करायची नाही असा जवळजवळ नियमच झाला होता. खरेतर, जनसामान्यांना नवीन घोषणात काहीच रस नसतो. महापालिकेचे काम म्हणजे पाणी, गटार, रस्ते, घरे आदी जीवनाशी निगडित असलेल्या गोष्टींशी असतो. या यादीत भर घातली जाऊ शकते, जेणेकरून नागरिकांचे जीवन सुसह्य होईल अशाच योजना पालिकेने हाती घ्याव्या, अशी जनतेची धारणा असते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेची कामे जनतेची बऱ्यापैकी निराशा करत असतात, असाच सर्वत्र अनुभव आहे.
आपल्या शहरात आपण बऱ्यापैकी हालचाल करू शकतो. जीवघेणा प्रवास तसेच बसथांब्यावर जास्त ताटकळत उभे राहण्यापासून मुक्तता अशा साध्या गोष्टींची अपेक्षा जनता करत असते. परंतु, प्रचंड गर्दी असलेल्या शहरात आदर्श व्यवस्था निर्माण करता येत नाहीत असा प्रशासनाचा दावा आहे आणि तो खराही आहे. परंतु ही प्रचंड गर्दी, प्रशासनाने मनात आणले असते तर त्यावर नक्कीच नियंत्रण घालू शकले असते. सर्वसामान्य जनतेला आकाशातला चंद्र नकोच असतो. आधी त्यांना जमिनीवरील सुखसोयीची चिंता असते. त्या ठाणे या शहरात आहेत का? आणि असल्या तर त्यांची नेमकी स्थिती काय आहे याचा पालिकेत बसणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कधी शांतपणे बसून विचार केला आहे काय? याचे उत्तर दुर्दैवाने नाहीच असे द्यावे लागेल. शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय करण्यासाठी उड्डाणपूल बांधले गेले. परंतु त्या उड्डाणपुलांची सध्याची स्थिती काय? त्यात कोठे सुधारणा केली पाहिजे? उड्डाणपूल व प्रमुख रस्त्यांना समांतर असलेल्या सेवा रस्त्यांची काय हालत आहे ते एकातरी अधिकाऱ्याने पाहिले आहे का?

घोडबंदर, बाळकुम, कापूरबावडी, खोपट, फार काय वागळे इस्टेट परिसरातील सेवा रस्ते किती बकवास स्थितीत आहेत हे त्या-त्या परिसरातील नागरिकच सांगू शकतील. घोडबंदर भागात अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत .पण तेथे जाणाऱ्या रस्त्यांचे काय? एकदा आयुक्तांनी लवाजमा न घेता टप्प्याटप्प्याने का होईना ठाणे शहराची प्रत्यक्ष फिरून पाहणी करणे आवश्यक नव्हे, गरजेचे आहे. दिवंगत सनदी अधिकारी सदाशिवराव तिनईकर नेहमीच सांगत असत की महापालिकेच्या अधिकाऱ्याने आपल्या विभागात दररोज किमान दीड-दोन किलोमीटर पायी चालले पाहिजे. त्यामुळे जनतेला सोसाव्या लागणाऱ्या अडचणींची थोडीफार तरी जाणीव अधिकाऱ्यांना होते. ही समजूत भाबडीही असू शकते हे जरी मान्य केले तरी डोळ्यांना अनेक गोष्टी दिसतात व त्यावर कनिष्ठ अधिकारी तसेच कर्मचाऱ्याशी बोलून काही मार्ग काढता येऊ शकतो. ठाणे महापालिकेत अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत फक्त अधिकारी बोलत असतो. विचारविनिमय होतच नाही. कनिष्ठ अधिकाऱ्यांना दमात घेणारा वरिष्ठ कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांसमोर मात्र येस सर करतो. सर बसवतो सर.. असे कमरेत वाकून बोलताना दिसतो. राजकीय नेत्याचा मान ठेवलाच पाहिजे. पण त्याच्या चुकीच्या सूचनांना धीटपणे नाही असेच सांगितले पाहिजे. परंतु असे काही होणार नाही. दीड-दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या उड्डाणपुलाखाली लाईन टाकण्यासाठी दोनदा, तीनदा रस्ता खोदून तो वाहतुकीसाठी बंद ठेवणे प्रशासनास शोभते का? अशी अनेक उदाहरणे देता येतील. माजीवडा चौकाचेच उदाहरण घेऊया. हा चौक जेथून सुरू होतो त्या जागेपासून तो चौक संपतो तेथपर्यंत सुमारे 80/100 हादरे (जर्क) बसतात. गेली पाच-सात वर्षे हे असेच चालू आहे. या चौकातील उड्डाणपुलावर नेहमीच ज्यांची भली मोठी होर्डिंगस लागतात ते नेतेही याच रस्त्यावरून जात असतात (अरे विसरलोच. त्यांच्या आलिशान गाड्यांना म्हणे जर्क बसत नाही). या नेत्यांना राजकीय धक्क्याशिवाय कोणताच धक्का बसत नाही असे माझ्या मित्राने सांगितले.
रस्त्यांची अनेक कामे चालू आहेत. पण जेथे काम चालू नाही तेथे रस्त्यांची दशा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहिलीच पाहिजे. तसेच कोर्ट नाका, जांभळी नाका, तलाव पाळी तसेच मार्केट परिसर एकदा या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत फिरवे अशी विनंती आहे. कोर्ट नाका सोडल्यावर मला कोण अधिकारी फूटपाथ दाखवून त्यावर चालून दाखवेल त्याला मी 500 रुपये नगद द्यायला तयार आहे. जेमतेम एक फुटाची दिसेल न दिसेल अशी फूटपाथ.. त्यावर दुकानदार किंवा फेरीवाल्यांचा कब्जा दोन-तीन दुकानांनी तर फुटपाथवरच दुकानाच्या पायऱ्या बांधल्या आहेत. ठाणे रेल्वेस्थानक परिसर म्हणजे जनतेच्या कसरतीचे प्रयोगच! सॅटिस पुलाखाली असलेल्या वाहतूक चौकीसमोरच रिक्षावाले कोंडी करून उभे असतात. गावदेवी चौकाकडून स्थानकाकडे जाताना एका कोपऱ्यात गेल्या दोन वर्षांपासून एक खड्डा आहे. त्यात कोणी पडून पाय जायबंदी होत नाही तोवर आपल्या मायबाप पालिकेचे लक्ष जाणार नाही. ठाणे महापालिकेची काळी बाजू दाखविण्यासाठी हे लेखन नाही. ठाणे महापालिकेची चांगली कामेही आहेत. परंतु जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचीच संख्या इतकी आहे की चांगली कामे कोठे दिसतच नाहीत. आयुक्तांनी ठाणेकरांचे जीवन सुसह्य करण्यासाठी काही ठोस पावले उचलण्याची गरज आहे आणि तेच माझे आवाहन आहे. दहा-पंधरा वर्षांनी पूर्ण होणारे प्रकल्प जरी गरजेचे असले तरी सध्याची परिस्थिती सुधारणे सर्वस्वी आयुक्तांच्या आणि प्रशासनाच्या हातातच आहे!