महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते दिल्याने महाविकास आघाडीत ठिणगी पडली. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (उबाठा) याबाबत नाराजी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री आणि कै. महादजी शिंदे यांचे वारसदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता. ते या पुरस्काराचे यजमानच होते. महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून उबाठाने राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार यांच्यावर कधीच टीका केली नव्हती. महाविकास आघाडी सरकार राज्यात येण्यास खरे म्हणजे शरद पवार हेच कारणीभूत होते. शरद पवार यांनी पुढाकार घेतल्यानंतर संजय राऊत मुख्यमंत्री होतील अशी त्यावेळी अपेक्षा होती. कारण असे सरकार स्थापन करताना शरद पवार यांना आपल्या मर्जीतील मुख्यमंत्री लागतो. त्यामुळे संजय राऊत यांचे नाव आघाडीवर होते. परंतु ऐनवेळी आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी तयार केल्यानंतर संजय राऊत पिछाडीवर गेले. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची जवळीक वाढवण्यात संजय राऊत यांचाच पुढाकार होता. राऊत यांचे जुने मित्र राज ठाकरे यांनी तर जाहीरपणे संजय राऊत यांच्यावर टीका केली होती की मुंबईत बाळासाहेबांच्या मांडीवर आणि दिल्लीत पवारांच्या मांडीवर संजय राऊत बसलेले असतात. (त्यावेळी बाळासाहेब आणि पवार यांचे टोकाचे मतभेद होते.)
खरे म्हणजे संजय राऊत यांची उपयुक्तता पाहून पवार यांनी त्यांना त्यावेळी जवळ घेतले होते. संजय राऊत यांनी लिहिलेले अग्रलेख हे बाळासाहेबांचे वक्तव्य म्हणून देशभर माध्यमे चालवत असत. त्यामुळे संजय राऊत यांना पवारांनी अगोदरच ताब्यात घेतले होते. शिवसेनाप्रमुखांनी मुंबईत आयपीएल सामने खेळवण्यास विरोध केला होता त्यावेळी मध्यस्थी संजय राऊत यांनी केली होती. शिवसेनाप्रमुखांचे मन वळवण्यासाठी शरद पवार यांना संजय राऊत मातोश्रीवर घेऊन गेले होते. याच संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर गेल्या आठवड्यात टीका केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्याचे निश्चित झाले. पुरस्कार देताना शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे शरद पवार हे पुरोगामी विचारांची पाठराखण करताना आपल्या विरोधकांशी शत्रुत्व ठेवत नाहीत. ज्या पंतप्रधान मोदी यांना शरद पवार यांनी विरोध केला तेच मोदी बारामतीचा पाहुणचार घेऊन गेले आहेत. त्यानंतरही पवार मोदी आणि त्यांच्या पक्षाला विरोध करत राहिले. परंतु आपल्या विरोधकाशी आपण शत्रुत्वानेच वागले पाहिजे, असा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हेका आहे.

आजच्या तारखेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सर्वात मोठे शत्रू एकनाथ शिंदे आहेत. यापूर्वी अनेकांनी शिवसेना फोडली. परंतु एकनाथ शिंदे यांनी एक मोठा विक्रम केला. शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी ४० आमदारच फोडले. त्यामुळे मोठी नामुष्की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेसमोर ओढवली. त्याबरोबर शिवसेना हे नाव आणि शिवसेनेची परंपरागत निशाणीही त्यांनी आपल्यासोबत नेली. या दुःखातून अजून उद्धव ठाकरे यांची शिवसेना सावरलेली नाही. त्यामुळेच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणाऱ्या शरद पवार यांच्यावर आगपाखड केली. शरद पवार यांना आपल्या विरोधातील कोणताही पक्ष हा अस्पृश्य नसतो. त्यामुळे सर्वच पक्ष त्यांचा सन्मान करतात. उद्या काम असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनाही भेटतील.
या पुरस्कारानंतर वेगवेगळे राजकीय अन्वयार्थ काढले गेले. सध्या राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे हे काही लपून राहिलेले नाही. त्यामुळे पवार भाजपविरुद्ध शिंदे यांना फितवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र केंद्रात भाजपचे सरकार असताना सीबीआय, आदि यंत्रणा केंद्राच्या ताब्यात असताना तसे कोणतेही धैर्य करण्याची हिम्मत सध्यातरी एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाही. त्याचबरोबर पुरस्काराचे यजमान हे भाजपचे ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यामुळे या पुरस्कारास आक्षेप घेण्यास कोणतेही कारण नाही. विशेष म्हणजे या पुरस्कारानंतर संजय राऊत यांच्याकडे पवारांनी फारसे लक्षही दिले नाही. त्यामुळे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कितपत किंमत देतात हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आले आहे.
संपर्क- 9820355612