शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ‘सावरकर: विस्मृतीचे पडसाद’ (लेखक: विक्रम संपत, अनुवादक: रणजित सावरकर, मंजिरी मराठे) या पुस्तकाचे प्रकाशन अलीकडेच पुण्यात बाबासाहेबांच्या निवासस्थानी करण्यात आले. मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यावेळी उपस्थित होते.
वयाच्या १००व्या वर्षातही बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीच्या आठवणी ताज्या आहेत. त्यातल्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. त्यांची आणि सावरकर यांची भेट १९३८ ते अगदी सावरकर यांच्या मृत्यूपर्यंत होत होती. सावरकर यांच्याविषयीच्या आठवणी सांगताना ते म्हणाले की, काजव्याने सूर्याची काय आठवण सांगायची? इतकेच नव्हे तर तर त्यांनी सावरकर यांचा आवाज हुबेहूब काढला.
सावरकरांसमोरच त्यांनी त्यावेळी त्यांच्याच भाषणाची नक्कल सादर केली होती. तेव्हा सावरकरांनी बळवंत मोरेश्वर पुरंदेर अर्थात बाबासाहेब पुरंदरे या मुलाचे गुण हेरले आणि केवळ नकला करीत राहणार का, असे विचारीत कलेचा स्वतःसाठी काही उपयोग कर, असे सांगितले. तोच मुलगा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या नावाने पुढे ख्याती पावला.
यावेळी पुस्तकाच्या नावातील ‘विस्मृती’ या शब्दाकडे बोट दाखवत बाबासाहेब म्हणाले की, एखादं फुल ताजं असतं ना तशा तात्यांच्या आठवणी माझ्या मनात मात्र अगदी ताज्या आहेत. सनातनी लोकांचं आणि सावरकरांचं फार वाकडं. पुण्यातले जोशी नावाचे गृहस्थ अतिशय कडक सनातनी होते. आमचं राज्य आलं तर या सावरकरांना आम्ही भर रस्त्यावर फाशी देऊ, असं ते एकदा म्हणाले. सावरकरांना हे कळल्यावर ते म्हणाले की, ‘अरे, मुकट्यापायी (सोवळ्यापायी) मुकूट गमावलात रे आणि आज स्वप्न पाहता आहात एका सावरकर नावाच्या माणसाला फाशी देण्याची. करायचंच असेल तर काबूल, कंदाहारच्या पलीकडे जाऊन ज्याने भारताचा नाश केला त्या अब्दालीच्या घराण्याचा नाश करा!’
तुम्हा तरुण पिढीला हे सावरकर झेपायचे नाहीत. सावरकर म्हणजे तेज, तेज आणि तेज.., असेही बाबासाहेब पुरंदरे म्हणाले. यावेळी त्यांनी ‘सावरकर : विस्मृतीचे पडसाद’ हे पुस्तक अगदी मनापासून निरखलं. त्यातली छायाचित्रं पाहिली. त्यातील त्यांना आवडणारं तरुणपणीचं छायाचित्र दाखवलं गेलं. पुस्तकाची किंमत ते शोधत होते. त्यांना ती दिसली नाही. त्यांनी मग मंजिरी मराठे यांच्या हाती एक हजार रुपये ठेवले. यावर मंजिरी मराठे यांनी सांगितले की, आमच्यासाठी ती धनराशी नाही तर शंभरी गाठलेल्या, छत्रपती शिवरायमय झालेल्या बाबासाहेब पुरंदरे नावाच्या एका तपस्व्याचे अनमोल आशीर्वाद आहेत..