सन्मित्र क्रीडा मंडळ, श्री साई क्रीडा मंडळ व गजानन इंटरप्राईजेस यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत पंतनगर, घाटकोपर पूर्व येधे १५ वर्षांखालील शालेय मुलांचे मोफत कबड्डी सराव शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात शंभरपेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला. शिबिराचे उद्घाटन कबड्डी फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी छत्रपती शिवाजी पुरस्कारप्राप्त जया शेट्टी यांनी केले. त्यांच्यासोबत राज्य शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक नाना पुंदे, आरएसटी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक कुलाल, सन्मित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दीपक कांदळकरदेखील उपस्थित होते.
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यवाह अनिल धुरी, भाऊ बागवे, मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुधाकर घाग, प्रमुख कार्यवाह राजेश पडेलकर, घाटकोपर प्रतिष्ठानचे अजय बागल, माजी राष्ट्रीय कबड्डीपटू राणा प्रताप तिवारी, महाराष्ट्र पोलीस कबड्डी संघाचे सदस्यांनी शिबिराला भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, गोरखनाथ महिला संघाचे प्रशिक्षक राष्ट्रीय पंच बंडू कांबळे, ज्येष्ठ पंच शशिकांत चव्हाण, राष्ट्रीय पंच विकास लाड यांनी शिबिरात खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. आयरे फाऊंडेशनचे अध्यक्ष राष्ट्रीय खेळाडू सचिन आयरे, ज्येष्ठ खेळाडू दत्ताराम पारकर, घाटकोपर ग्राहक संरक्षण कक्षाचे सरचिटणीस रमेश सावंत यांच्या हस्ते शिबिरातील उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून हर्ष वरटे, सर्वेश मोरे, पियुष गुप्ता, मोहित कनोजिया, आयुष परदेसी, स्वराज जाधव, सक्षम तिकांडे, सार्थक नानचे व विवेक प्रजापती यांना पदक देऊन गौरविण्यात आले. पोद्दार कॉलेजच्या क्रीडा शिक्षिका स्मिता शिगवण यांनी आभार प्रदर्शन केले.

