मध्यमवर्गीय म्हणजे काय? खूप श्रीमंत नसलेला, कमी आकांक्षा असलेला, स्वत:च्या परिघात आनंद निर्माण करणारा, निष्ठा बाळगणारा, प्रतिष्ठा जपणारा आणि बर्याच अंशी मूल्यांना मानणारा मराठी वर्ग म्हणजे मध्यमवर्ग असे म्हणता येईल. या सगळ्या चौकटीत त्याची आर्थिक सुबत्ता सुस्थिर असणे, हा भागदेखील महत्त्वाचा आहेच. मात्र, कोट्यवधींच्या चल-अचल संपत्तीचे मालक असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि त्यांची पत्नी किंवा त्यांचा परिवार यापैकी कुठल्या मूल्यात बसतो, हे आकलनापलीकडे आहे.
संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी संजय राऊतांच्या सांगण्यानुसार, सुमारे 10-12 वर्षांपूर्वी केलेल्या एका 55 लाख रुपयांच्या व्यवहारासंबंधी अंमलबजावणी संचालनालयाने साधी चौकशीची नोटीस बजावली. आता तशी ही तिसरी नोटीस असून, यापूर्वीच्या दोन नोटीसला सौ. राऊत यांनी तब्येतीचे कारण पुढे करत चौकशीला हुलकावणी दिल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात पीएमसी बँक घोटाळ्याच्या एका चौकशीदरम्यान गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक प्रवीण राऊत हे आरोपी असून, त्यांच्या चौकशीमध्ये प्रवीण राऊत यांच्या पत्नीने वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये हातउसने दिल्याचे समोर आले. संजय राऊतांच्या म्हणण्याप्रमाणे 55 लाख हे त्यांनी कर्ज दिले. प्रत्यक्षात आरोपीच्या चौकशीत जर एखाद्याचे नाव आले, तर त्याची चौकशी करून अधिकची काही माहिती आरोपीसंदर्भात मिळते का, हे तपासणे तपासयंत्रणांचे कामच आहे.
आता टीआरपी घोटाळाप्रकरणी दिलेल्या तक्रारीत रिपब्लिक भारत टी. व्ही.चे नाव नसताना, या टेलिव्हिजन नेटवर्कने टिश्यू पेपरपासून तर पेपरवेटपर्यंतच्या खरेदी केलेल्या पाच वर्षांच्या व्यवहाराची चौकशी मुंबई पोलिसांनी केलेली आपल्याला चालते. मग हा तर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक महाघोटाळा आहे आणि महत्त्वाचे म्हणजे आपण काहीही एक गैरव्यवहार केलेला नाही. त्यामुळे ज्यांनी गैरव्यवहार केला आहे त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे यासाठी आपली काही ईडीला मदत होत असेल, तर ती करणे हे आपले एक सुजाण नागरिक म्हणून कर्तव्य नाही का? मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी जसे तक्रारीत नाव नसताना बळजबरीने गोवण्याचा प्रयत्न केला होता. तशातला हा भाग नाहीच मुळात.. येथे एका आरोपीने दिलेल्या माहितीतून त्या आरोपीशी आपल्या पत्नीचा लाखो रुपयांचा व्यवहार झाला असल्याचे पुढे आल्यानंतर ही चौकशी केली जात आहे. मग या इतक्या साध्यासोप्या न्यायिक प्रक्रियेत सहकार्य करायचे सोडून, आगपाखड करण्याची गरज तरी काय? कर नाही त्याला डर कशाचा? चला, एकदाचं तुमचं मानलं, भाजपा सूडभावनेतून कारवाई करत आहे.. भाजपा महिलेच्या पदराआडून राजकारण करत असल्याचंही मानलं.. पण, तुम्ही चोरी केलीच नाही तर चौकशीपासून पळ का काढत आहात? जेथे तुमचे हातच काळे नाही तर कोण कसा सूड उगवू शकतो तुमच्यावर.. कसं आहे ना.. चोराच्या मनात चांदणं असे म्हणतात.. महाराष्ट्रात तपासयंत्रणांचा गैरवापर करून, आपण काय प्रताप करतो आहोत, हे माहिती असल्याने कदाचित हा असा समज होऊ शकतो..
या सर्व प्रकरणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, त्या महिलेचे पती.. सारेच्या सारे तोंडसुख घेताना दिसत आहेत. पण, ज्यांना नोटीस आली, ज्यांच्यावर सूड उगवला जात आहे, ते ब्रदेखील उच्चारताना दिसत नाहीत. काय ते त्यांनी सांगावे ना.. तुम्ही का पत्रकार परिषद घेऊन अकांडतांडव करत आहात? चौकशीची नोटीस मिळालेली महिला काही सर्वसाधारण महिला थोडीच आहे. ती एक सुशिक्षित नागरिक आहे. ती एक समाज घडविणारी शिक्षिका आहे. ती तीन-तीन कंपन्यांची संचालक, चित्रपट निर्माती, एक व्यवसायी असे एक ना अनेक पैलू त्यांचे आहेत. अशी एक कर्तृत्त्ववान महिला, त्यांच्यावर जर अन्याय केला जात असेल तर त्यांनी जगासमोर येऊन सूड उगवणार्यांची पोलखोल केली पाहिजे. मात्र, तसे काही होताना दिसत नाही. अन्यायग्रस्त महिला कुठेही दिसत नाही आणि भलतेच लोक आपलं तुणतुणं वाजवत फिरताना दिसत आहेत. याला मग महिलेच्या पदराआडून आपली राजकीय पोळी शेकणे नाही तर काय म्हणायचे?
देशाच्या राष्ट्रपतींपासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत आणि राज्यपालांपासून तर उच्च न्यायालयापर्यंत सर्वांना संविधान आणि कायद्याची शिकवण देणारे, न्यायालयाने काय करावे आणि करू नये याचे ज्ञान पाजळणार्या या महानुभावाला न्यायालयीन प्रक्रिया काय असते, एवढे साधे गणित कळत नसावे? की कळूनही कायद्याचे राज्य ही संकल्पनाच मुळात मान्य नाही यांना? हम बोले सो कायदा.. असेच काहीसे मागील वर्षभरात या राज्यातील जनतेने अनुभवले आहे. म्हणे एका मराठी मध्यमवर्गीय शिक्षिकेने आपल्या मैत्रिणीकडून पैसे कर्ज घेतले तर यात एवढं काय? अहो, क्राईम रिपार्टर म्हणून काम केले आहे ना.. मग तपासाची पद्धतसुद्धा माहिती नसेल तर गोट्या खेळल्या की काय? अंडरवर्ल्ड डॉन दाऊदकडून पैसे घेतले तर काय? एवढे सोपे उत्तर आहे. तुमच्या पत्नीने मैत्रिणीकडून घेतलेल्या पैशाच्या व्यवहारासाठी.. जिच्याकडून पैसे घेतले ती आरोपीची पत्नी आहे, जरा अभ्यास करा.. यांना कोणी नेता आणि संपादक केले, असा प्रश्न उपस्थित झाला तर त्या वंदनीय व्यक्तीचा अवमान होईल.. स्वतःची काहीच पत नाही, पण किमान त्या वंदनीय व्यक्तीची तरी लाज जाईल, असे वागू नये..
प्रत्यक्षात 10-12 वर्षे तर सोडा, आजघडीलादेखील कोण असं आहे हो, जो एका मध्यमवर्गीय मैत्रिणीला हातउसने म्हणून 55 लाख रुपये देईल? 10-12 वर्षांपूर्वी 55 लाख रुपयांची काय किंमत होती! एवढ्या सहजतेने समोरच्या महिलेने दिलेले ते कर्ज होते, तर त्यातील किती कर्जाची परतफेड मागील 10 वर्षांत झाली? 2016पर्यंत तर यातली एक फुटी कवडीही परत केलेली नव्हती. मग एवढे दिवस कुणी कुणाला एवढी मोठी रक्कम खरेच हातउसनी देईल का? आता संजय राऊतांच्या मते एक मध्यमवर्गीय महिला आहे त्यांची पत्नी. एका खासदारांची, शिवसेनेसारख्या पक्षाच्या नेत्याची पत्नी मध्यमवर्गीय? कंपन्यांची संचालक.. 23 लाख रुपयांचे दागिने.. 1 कोटींची कृषक जमीन.. 6 कोटी 76 लाखांच्या 8 अकृषक जमिनी.. दादरसारख्या ठिकाणी 807 चौरस फुटाची सदनिका, ज्याची किंमत 1 करोड 77 लाख.. सुमारे 3 कोटींच्या सुमारास कर्ज तेही 9 लोकांकडून हातउसनेच.. 51 लाखांच्यावरची चल आणि 7 कोटींच्या वर अचल संपत्तीच्या मालक संजय राऊतांच्या पत्नी आहेत आणि यात संजय राऊतांची जर संपत्ती मिळविली तर दोघांच्याही संपत्तीची बेरीज केल्यानंतर मात्र, राऊत कुटुंबाचा दारिद्र्यरेषेखालील यादीतच समावेश करावा लागेल. राऊत कुटुंबाची आर्थिक स्थिती इतकी बिकट आणि हलाखीची असताना ते स्वतः मध्यमवर्गीय म्हणताहेत, ही बाब मराठी मध्यमवर्गीयांसाठी अभिमानाचीच म्हणावी लागेल. आजही लाख रुपये उभे करायला मध्यमवर्गीयांच्या तोंडाला फेस येतो. हातउसने तर सोडा, बँकसुद्धा उभे करत नाही. मिळालेच कर्ज तर भरताना तारांबळ उडते. भरले नाही तर दरवाजात वसुली करणारा उभा राहून इभ्रत वेशीला टांगतो.. मध्यमवर्गीयांचा कोणी वाली नाही.. अगदी सचोटीने सारे व्यवहार मध्यमवर्गीयांना करावे लागतात. असे असताना संजय राऊत मध्यमवर्गीयांच्या प्रतिष्ठेची कुचेष्टा करत आहेत की काय? राऊतांच्या असल्या हुच्चपणाचा प्रतिवाद करण्यात आपली शक्ती व्यर्थ घालविण्यात काहीही तथ्य नाही. आता किमान मध्यमवर्गीय महाराष्ट्राने याची कठोर निर्भर्त्सना केली पाहिजे.