Tuesday, December 3, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजपॅरालिम्पिक: भारतीय खेळाडूंच्या...

पॅरालिम्पिक: भारतीय खेळाडूंच्या कामगिरीला सलाम

पॅरिस येथे संपन्न झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करुन नवा इतिहास रचला. भारताने या स्पर्धेत प्रथमच ७ सुवर्ण, ९ रौप्य, १३ कांस्य अशी एकूण २९ पदके मिळवून पदकतालिकेत १८वा क्रमांक मिळवला. गेल्या टोकियो स्पर्धेत भारताने १९ पदके जिंकताना पदकतालिकेत २४वा क्रमांक पटकावला होता. त्याअगोदरच्या दोन स्पर्धेत भारताला अवधी ५ पदके जिंकता आली होती. त्या तुलनेत गेल्या दोन स्पर्धेतील भारतीय खेळाडूंची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. जिगर, चिकाटी, लढाऊबाणा या साऱ्यावर मात करुन भारतीय खेळाडूंनी मिळविलेल्या यशाला तोड नाही. म्हणूनच त्यांच्या या कामगिरीला “सलाम” करावाच लागेल. स्वित्झर्लंड, बेल्जियम, दक्षिण कोरिया, तुर्कस्थान, अर्जेंटिना या बलाढ्य देशांना मागे टाकून भारताने पदकतालिकेत मिळविलेले १८वे स्थान वाखाणण्याजोगे आहे.

अपेक्षेप्रमाणे बलवान चीन, अमेरिका, इटली, इंग्लंड या देशांचा यंदादेखील या स्पर्धेवर दबदबा राहिला. चीनने १४ सुवर्ण, ७६ रौप्य, ५० कांस्य अशी एकूण २२० पदके जिंकून पदकतालिकेत अव्वल क्रमांक पटकविला. शारीरिक व्यंग, अपंगत्व, आर्थिक अडचणी, प्रशिक्षणाच्या विशेष सुविधा उपलब्ध नसतानादेखील भारतीय खेळाडूंनी मिळविलेल्या या यशाला एक वेगळीच किनार आहे. १९४८ साली युद्धात जखमी झालेल्या सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी पॅरालिम्पिकचा जन्म झाला. १९६०च्या रोम स्पर्धेपासून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला प्रारंभ झाला असे म्हणावे लागेल. तेव्हा प्रथमच ४००पेक्षा जास्त खेळाडू रोम स्पर्धेत सहभागी झाले होते. यंदा पॅरिसमध्ये ७९ देशांचे ४ हजारपेक्षा जास्त खेळाडू सामिल झाले होते. यंदा ८४ खेळाडू भारतातर्फे सहभागी झाले होते. त्यामध्ये हरियाणाचे सर्वाधिक २३ खेळाडू होते. या अगोदर झालेल्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेतदेखील भारतीय चमूत हरियाणाचेच सर्वाधिक खेळाडू होते. हरियाणासारखे छोटे राज्य खेळाडूंना देत असलेल्या सुविधा आणि सवलतीला तोड नाही. त्यांचाच कित्ता भारतातील इतर राज्यांनी गिरवला तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारताची कामगिरी नक्कीच उंचावेल.

भारतीय चमूत यंदा प्रथमच विक्रमी ३२ महिला खेळाडूंचा समावेश होता. पदकविजेत्यांमध्ये १० भारतीय महिला खेळाडूंचा समावेश होता. भारतीय महिलांनी १ सुवर्ण, १ रौप्य, ८ कांस्य पदके मिळविली. विशेष म्हणजे मृगसेन, मनिषा, शितल, नित्या, प्रिती, दिप्ती, मोना या महिला खेळाडूंचे हे पहिलेच पॅरालिम्पिक होते. त्यात त्यांनी पदार्पणातच पदक जिंकण्याचा पराक्रम केला. प्रिती पालने १०० आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत २ कांस्यपदके जिंकली. या स्पर्धेत २ पदके जिंकणारी ती एकमेव भारतीय खेळाडू होती. ही विशेष बाब म्हणावी लागेल. यंदाच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नुसती पदकेच जिंकली नाही तर नवे विश्वविक्रमदेखील नोंदविले. तिरंदाजीत शितलदेवीने कंपाऊंड प्रकारात ७०३ गुणांची नोंद करून विश्वविक्रम नोंदविला.

अॅथलेट सुमित अंतिलने भालाफेक स्पर्धेत नव्या पॅरालिम्पिक विक्रमाची नोंद केली. तसेच शरद कुमारनेदेखील १.८८ मीटर झेप घेत उंच उडीत नवा पॅरालिम्पिक विक्रम केला. धरमवीरने पुरुषांच्या क्लब थ्रो प्रकारात ३४.९२ मीटरची फेक करून नवा आशियाई विक्रम नोंदविला. तर गोळाफेक स्पर्धेत सधीन खिल्लारेनेदेखील नव्या आशियाई विक्रमाची नोंद केली. महिला नेमबाज अवनी लेखराने १० मीटर एयर रायफल प्रकारात २४९.७ गुणांची नोंद करून नवा पॅरालिम्पिक विक्रम नोंदविला. १७ वर्षे, ७ महिने, २३ दिवसांच्या शितलने तिरंदाजीत कांस्यपदक मिळवून भारतातर्फे सर्वात लहान वयात या स्पर्धेत पदक जिंकण्याचा पराक्रम केला. तर ३५ वर्षे, ७ महिन्यांचा गोळाफेकपटू धरमवीर भारताचा या स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.

उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटचे पदक वजन वाढल्यामुळे हुकले होते. इथे मात्र भालाफेक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या नवदिप सिंगला एफ-४२ गटात नंतर मात्र नशिबाची साथ मिळाली. याच गटातील सुवर्णपदक विजेत्या इराकच्या बेइतला अपात्र ठरविण्यात आल्याने नवदिप सिंगच्या रौप्यपदकाचे रुपांतर सुवर्णपदकात झाले. बेइतला स्पर्धेच्या ठिकाणी अक्षेपार्ह कृत्य केल्यामुळे बाद करण्यात आले. त्याने फडकाविलेल्या झेंड्याबाबत अक्षेप घेण्यात आला. अवघ्या ४ फूट ४ इंच उंची असलेल्या नवदिपला सातत्याने कमी उंचीमुळे अवहेलना सहन करावी लागत होती. किमान ७ फूट लांब अशी भाल्याची उंची असते. त्यामुळे नवदिपसमोर खडतर आव्हान होते. परंतु या आव्हानाला सामोरा जाऊन नवदिपने नवा आदर्श आजच्या तरुण खेळाडूंसमोर ठेवला आहे. तो लवकर जन्माला आल्यामुळे त्याची वाढ फारशी झाली नाही. परंतु वडिलांनी खेळण्यासाठी सतत प्रोत्साहन दिल्यामुळे नवदिपने ही मोठी झेप घेतली.

तिरंदाज हरविंदर सिंग या स्पर्धेतील भारताचा पहिला सुवर्णपदक विजेता ठरला. नेमबाज अवनी लेखरा आणि भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी यंदादेखील आपले सुवर्णपदक राखण्यात यश मिळविले. लेखराने तर नवा विश्वविक्रमदेखील नोंदविला. ज्युदोत कपिल परमारने कांस्यपदक जिंकून या स्पर्धेतील या खेळाचे पदकाचे खाते उघडले. क्लब थ्रोमध्ये सुवर्ण आणि रौप्यपदके भारताच्याच धरमवीर, प्रणवने जिंकली. भारताची या स्पर्धेतील आणखी किमान ७ पदके हुकली. भारताच्या ७ खेळाडूंना चौथ्या क्रमांकावर समाधान मानवे लागले. तिरंदाज राकेश कुमार, अॅथलेट संदिप, शिवराजन-नित्या, सुकांत कदम (बॅडमिंटन), शैलेश कुमार, उंच उडी, हरविंदर-पूजा (तिरंदाजी), सिमरन (१०० मीटर धावणे) या खेळाडूंची पदके थोडक्यात हुकली. अन्यथा भारतीय पदकांची संख्या ३५च्या पुढे गेली असती.

भारतीय यशात केंद्र सरकारचादेखील वाटा आहे. खेळाडूंच्या तयारीसाठी केंद्र सरकारने खेळाडूंना ७६ कोटींची मदत केली होती. भारतीय क्रीडा प्राधिकरणानेदेखील खेळाडूंना सर्वोतोपरी सहाय्य केले होते. भारतीय खेल प्राधिकरणाने आता रिसर्च ऑफिसर नियुक्त करून या खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष देण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविली आहे. “टारगेट ऑलिम्पिक पोडियम’ याप्रमाणे भारतीय पॅरालिम्पिक संघटनांदेखील काही चांगले उपक्रम राबवत आहेत. त्या उपक्रमांचादेखील फायदा खेळाडूंना झाला आहे. आता या पदकविजेत्यांवरदेखील त्या-त्या राज्याने पारितोषिकांचा वर्षाव करुन त्यांनादेखील चांगली रक्कम देणे आवश्यक आहे जेणेकरुन पुढील स्पर्धांमध्ये त्यांच्या कामगिरीत अधिक सुधारणा होईल. आजवर आम्हाला दुर्बलतेमुळे अवहेलना सहन करावी लागत होती. आता मात्र आम्हाला सन्मान द्या, ही तिरंदाज हरविंदर सिंगची प्रतिकिया खूपच बोलकी आहे. तेव्हा या सर्व पदकविजेत्या खेळाडूंचा उचित सन्मान होणे आवश्यक आहे. त्याची दखल राज्य आणि केंद्र सरकार घेईल अशी आशा करुया.

Continue reading

बिलियर्ड-स्नूकरमधला भारतीय जादूगार पंकज अडवाणी!

भारताच्या ३९ वर्षीय पंकज अडवाणीने नुकत्याच झालेल्या दोहा, कतार येथील जागतिक बिलियर्ड स्पर्धेत २०वे जेतेपद पटकावून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा ४-२ असा आरामात पराभव करुन आणखी एक जागतिक विजेतेपद मिळवण्याचा...

पर्थ कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय!

ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघासाठी हा दौरा खडतरच असणार आहे. १९९१-९२नंतर पुन्हा एकदा भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. नुकत्याच मायदेशी झालेल्या न्युझिलंडविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला ३-० असे "व्हाइट वॉश"ला प्रथमच सामोरे जावे...

श्री गणेश आखाड्यात तयार होत आहेत उद्याचे पहेलवान!

भाईंदर (पश्चिम) येथील सुभाष मैदानात असलेल्या श्री गणेश आखाड्यात उद्याचे युवा पहेलवान तयार करण्याचे मोठे कार्य गेली २४ वर्षे वस्ताद वसंतराव पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत. मीरा-भाईंदर परिसर आता खूपच गजबजलेला आहे. तेथे आता इतर भाषिकांची मोठी संख्या...
Skip to content