सुरक्षित असतील तर कोणतेही खेळ प्रकार आणि त्यांच्या अगदी जागतिक स्तरावरील स्पर्धासुद्धा नावाजल्या जातील. पण दिव्यांग ऑलिम्पिकमधील सुरक्षितता ही काही वेगळ्या अंगाने बघावी लागेल. कारण येथे शरीर अगोदरच एका भयानक संकटातून पार झाले असते आणि जीवन पुन्हा सुरु करीत असताना आपल्या जिद्दीच्या बळावर हे स्पर्धक आपली कामगिरी करीत असतात. शरीर धडधाकट असताना माणसाला खेळातील एखाद्या दुखापतीच काही काळ त्रास होऊ शकतो. पण, शरीराने आणि मनाने आपले मानलेल्या दिव्यांगामुळे आणि त्यासाठी वापराव्या लागणाऱ्या साधनांमुळे अशा स्पर्धकांची दुखापत सहन करणे हे एक दिव्यच असते.
दिव्यांग ऑलिम्पिकमधील सर्वच खेळ जोखमीचे असतात असे मानले जाते. त्यातल्या त्यात बर्फावरील खेळांमध्ये खांदे आणि मेंदूला धक्का पोहोचवू शकतील अशा दुखापतींना सर्वाधिक जोखमीचे मानले जाते. अनेक दिव्यांग खेळाडूंनी दिव्यांग झाल्यानंतर खेळात तर अनेक जागतिक पदके जिंकली आहेतच, त्याशिवाय त्यातील बरेचसे आज वैद्यकीय उपचार क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर काम करीत आहेत. चेरी बॉवेट दीर्घ अंतराच्या जागतिक व्हीलचेअर स्पर्धेत सन्मान्य मानल्या जातात आणि आज त्या हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये शारीरिक औषधशास्त्र आणि पुनर्वसन या विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांचे संशोधन दिव्यांग ऑलिम्पिकमधील खेळाडूंना होणाऱ्या दुखापती यावरच आहे.
तसे बघायला गेलो तर खास करून दिव्यांग व्यक्तींसाठी खेळ हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायी असतात असे मानले जाते. परंतु असे दिसते की दिव्यांग ऑलिम्पिकपर्यंत पोहोचणाऱ्या स्पर्धकांना आजार आणि दुखापत यांची
शक्यता अधिक असते. २०१६च्या दिव्यांग ऑलिम्पिकमधील आकडेवारी असे दाखवते की नियमित ऑलिम्पिकमध्ये ८ टक्के स्पर्धकांना दुखापती झाल्या होत्या तर दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये ही टक्केवारी १२ टक्के होती. आणि काहीवेळी तर हे प्रमाण दुप्पट झालेलेही दिसले आहे.
प्रत्यक्ष खेळ पाहिले तर फुटबॉल; ज्युडो आणि बर्फावरील खेळ स्पर्धा अधिक जोखमीच्या असतात. दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांची दुखापत जोखीम अधिक असते. याचे एक कारण असे दिले जाते की या स्पर्धकांच्या शरीरातील एकाच भागावर प्रचंड भार येऊ शकतो आणि त्यामुळे दुखापतीची शक्यता अधिक असते. आपल्या एक बोटाला जरी जखम असेल तर तो हात आपल्याला पूर्णपणे उपयोगात आणता येत नाही तसेच हे आहे. येथे तर चक्क एक अवयव निकामी झालेला असतो आणि त्याची भरपाई केली गेली असते. यामुळेच स्पर्धकांना सदा सर्वकाळ तंदुरुस्त राहणे गरजेचे असते आणि ते खर्चिक असतेच हा नाईलाजाचा भाग असतो.
गेल्या दशकात झालेल्या दुखापतींच्या संदर्भात जे संशोधन झाले आहे त्यात असे दिसते की, व्हीलचेअरचा उपयोग करणारांना शरीराच्या वरील भागात आणि विशेषतः खांद्याला दुखापत होण्याची शक्यता अधिक असते. हे स्पर्धक त्यांच्या सामान्य जीवनातदेखील आपल्या खांद्यावर अधिक भार देत असतात हे याचे कारण असल्याचे मानले जाते. याचे उदाहरण देताना चेरी बॉवेट म्हणतात की, अगदी व्हीलचेअरवर बसण्यापासून ते उतरण्यापर्यंत, इतकेच नव्हे तर झोपायला जाताना आणि तयार होताना त्यांना अनेक दिव्यातून जावे लागते ते वेगळेच. दुखापतीची जोखीम आणि स्पर्धकांची शारीरिक आणि आरोग्य सुरक्षितता यांचा विचार करायचा तर २०१२पासूनच्या दिव्यांग ऑलिम्पिकपासून आजवर ४००/५०० खेळाडू मुख्य स्पर्धांमध्ये आणि ५०० खेळाडू हिवाळ्यातील स्पर्धांमध्ये सामील झाले आहेत आणि या प्रत्येक स्पर्धकावर लक्ष ठेवले जाते आहे ही समाधानाची बाब म्हणायला हवी…