Homeकल्चर +डॉ. आंबेडकरांवरील दुर्मिळ...

डॉ. आंबेडकरांवरील दुर्मिळ चित्रपट संग्रहालयात!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर 1968 साली तयार झालेल्या दुर्मिळ लघुपटाची प्रत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने (NFAI) मिळवली आहे.

‘महापुरुष डॉक्टर आंबेडकर’ या नावाचा हा लघुपट मराठीत असून तो महाराष्ट्र सरकारच्या माहिती संचालनालयाची निर्मिती आहे. व्हटकर प्रॉडक्शन्स या बॅनरखाली नामदेव व्हटकर यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. या अठरा मिनिटांच्या लघुपटाचे संगीत ख्यातनाम संगीतकार दत्ता डावजेकर यांनी केले होते, तर ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम यांनी या लघुपटात निवेदन केले आहे.

नामदेव व्हटकर मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार आणि दिग्दर्शक होते. सुलोचना अभिनित ‘आहेर’ हा 1957मधील चित्रपट, हंसा वाडकर अभिनित ‘मुलगा’ हा 1956मधील चित्रपट, अशा चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केले होते. राम गबाले यांच्या ‘घरधनी’ या पु. ल. देशपांडें यांच्यासोबतच्या 1952 मधल्या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली होती.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती 14 एप्रिल रोजी आपण साजरी करत असतानाच ही फिल्म म्हणजे अगदी योग्य वेळी मिळालेला ठेवा आहे, असे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले.

डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यावेळची काही दृश्ये या लघुपटात आहेत. तसेच त्यांनी नेपाळला दिलेली भेट व  मुंबईतल्या दादर चौपाटी येथे त्यांच्या अंतिम क्षणांची जवळून टिपलेली दृश्ये या लघुपटात आहेत. चित्रपटाची सिनेमोटोग्राफी मधुकर खामकर यांची असून, जी. जी. पाटील यांनी या लघुपटाचे संकलन केले आहे.

मूळ चित्रपट हा 35 एमएम प्रकारात तयार झाला होता. पण आम्हाला सोळा एमएमची प्रत मिळाली आहे. कदाचित ग्रामीण भागात वितरणासाठी काढलेली ही प्रत असावी. या चित्रपटाची स्थिती व्यवस्थित आहे आणि आम्ही लवकरच याचे डिजिटायझेशन करण्याचे ठरवत आहोत, जेणेकरून ती लोकांना उपलब्ध होईल, अशी माहिती प्रकाश मगदूम यांनी दिली.

वैयक्तिक संग्राहक आणि वितरक तसेच इतर संबंधितांनी पुढे येऊन अशा प्रकारची फिल्म किंवा फुटेज असल्यास राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द करावेत. जेणेकरून त्या संरक्षित केल्या जाऊ शकतील, असे आवाहनही मगदूम यांनी केले आहे.

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content