Homeहेल्थ इज वेल्थमलेरिया, डेंगीसाठी मुंबई...

मलेरिया, डेंगीसाठी मुंबई महापालिकेची ‘रॅपिड’ शोधमोहीम!

पावसाळ्यात होणाऱ्या मलेरिया, डेंगी अशा पावसाळाजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी मुंबई महापालिकेने कोविड लक्ष्याच्या धर्तीवर सुधारित कार्यपद्धती अवलंबिली आहे. खासगी रुग्णालये, खासगी प्रयोगशाळा, दवाखाने, खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या सहकार्यासह पालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या पुढाकाराने याकरीता पालिका ‘रॅपिड’ शोधमोहीम राबविणार आहे.

पावसाळ्यात डेंगी, मलेरिया (हिवताप) यासारख्या आजारांशी मुकाबला करण्यासाठी व त्यांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिका सातत्याने सर्व स्तरावर प्रयत्न करीत असते. सर्वस्तरीय कार्यवाही करतानाच जनजागृतीपर मोहीमदेखील नियमितपणे राबविण्यात येत असते. मात्र, अनेकदा डेंगी-मलेरिया यासारख्या आजारांचे निदान लवकर न झाल्याने हे आजार बळावतात आणि प्रसंगी प्राणघातकही ठरू शकतात. हीच बाब लक्षात घेऊन अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनात सार्वजनिक आरोग्य व संबंधित यंत्रणांची एक विशेष बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान डॉ. शिंदे यांनी कोविड विरोधातील लढ्याच्या धर्तीवर डेंग्यू मलेरियाविरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची निर्देश दिले आहेत.

या अंतर्गत डेंगी, मलेरियाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा मोहीम स्वरूपात शोध घेण्याचे व लक्षणे आढळून आल्यास वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या चाचणीमध्ये डेंगी, मलेरियाचे निदान झालेल्या रुग्णांनी वेळेवर औषध घ्यावे व आवश्यक ती काळजी घ्यावी, यासाठी ‘टेलिफोनिक फॉलोअप’ घेता यावा, याकरिता सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षांमार्फत कार्यवाही करण्याचे निर्देशही डॉ. शिंदे यांनी दिले आहेत, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली आहे.

या बैठकीनंतर घेण्यात आलेले निर्णय-

1. सर्व खासगी प्रयोगशाळा व रुग्णालये यांनी त्यांच्याकडील सर्व डेंगी व मलेरिया रुग्णांची माहिती पालिकेला देणे बंधनकारक असेल.

2. कोविड काळात विभाग स्तरावर कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘कोविड वॉर रूम’ यांचा उपयोग डेंग्यू, मलेरिया व पावसाळी आजार यांच्या प्रतिबंधासाठी करवा. प्रत्येक विभागीय ‘वॉर रूम’मध्ये एक डॉक्टर, एक समन्वयक आणि एक डेटा एन्ट्री ऑपरेटर दोन सत्रांमध्ये काम करतील.

3. कोविडच्या धर्तीवर घरोघर जाऊन शोधमोहीम घेणार. आरोग्य केंद्रामार्फात केलेल्या शोधमोहिमेंतर्गत डेंगी किंवा मलेरियाचा रुग्ण आढळून आलेल्या कुटुंबासह जवळपासच्या परिसरातील सुमारे २५० घरांमधील नागरिकांचे ‘रॅपिंड’ सर्वेक्षण करून तापसदृश्य रुग्णांचे रक्तनमुने संकलित करून त्याचदिवशी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. तापसदृश्य रुग्णांना नजीकच्या मनापा रुग्णालयात संदर्भित केले जात आहे.

4. रॅपिड सर्वेक्षण करताना वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते, कीटक नियंत्रण अधिकारी, कीटक नियंत्रण विभाग आणि मलेरिया संनिरीक्षण विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबवावी, जेणेकरून एकाचवेळी रुग्ण शोधणे, रुग्णांवर उपचार करणे आणि डासांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे यासारखी कार्यवाही एकत्रितपणे करणे शक्य होईल.

5. नागरिकांना डासांची उत्पत्तीस्थळे कशी शोधावी व ती कशी नष्ट करावी याबाबत संयुक्त मोहिमेदरम्यान व्यापक जनजागृती व प्रचार करणे. खासगी इमारती, गृहनिर्माण संस्था याठिकाणी एएलएमबरोबर बैठका आयोजित करणे. बांधकामाच्या ठिकाणी बैठका आयोजित करणे व जनजागृती करणे. तसेच कार्यालयीन ठिकाणी बैठका आयोजित करणे.

नागरिकांना आवाहन

1. नागरिकांनी आपल्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला व सोसायटीच्या परिसरात कुठेही साचलेले पाणी असणार नाही याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यातच डासांची मादी अंडी घालते व डासांची उत्पत्तीस्थळे तयार होतात ही बाब लक्षात घेऊन साचलेले पाणी आढळून आले असल्यास ते तत्काळ नष्ट करावेत.

2. टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकच्या बाटल्या व बाटल्यांची झाकणे, झाडांच्या कुंड्या व त्या कुंड्यांखालील ताटल्या, फ्रीजच्या खालील डिफ्रॉस्ट ट्रे यात साचलेले पाणी असणार नाही याची दररोज पाहणी करावी.

3. फेंगशुई, मनी प्लांट यासारख्या शोभेच्या रोपट्यांचे पाणी नियमितपणे बदलण्याचे आवाहन.

4. कोविड विरोधातील लढ्याचे अनुभव लक्षात घेऊन करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणामुळे रुग्णांची संख्या वाढू शकेल. मात्र ही वाढलेली संख्या बघून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. वस्तूतः या मोहिमेमुळे डेंगी, मलेरियाविषयक लवकर निदान झाल्याने आणि लवकर औषधोपचार सुरू झाल्याने रुग्णांचे प्राण वाचविणे आणि ते लवकर बरे होण्यास निश्चितच बळ मिळणार आहे.

कीटकजन्य आजार (मलेरिया आणि डेंगी) प्रतिबंधासाठी हे करावे

दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिकारक (Mosquito Repellent ) औषधांचा वापर करावा.

कुलर आणि लहान कंटेनरमधून नियमितपणे पाणी काढा, सर्व जलस्त्रोत पूर्णपणे झाकलेले आहेत याची खात्री करा.

डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे काढून टाका, बाल्कनीत प्लॅट, एसी ट्रे, मातीची भांडी, फ्रीज ट्रे, धुतलेली भांडी ठेवणारे स्वयंपाकघरातील रॅक, खचाखच भरलेले स्वयंपाकघर आणि बाथरूमचे नाले, कूलर, बाथरूम आणि टाक्यांमध्ये गळती, उघड्या बादल्या किंवा पाण्याचे डबे जे नियमितपणे वापरले जात नाहीत. शोभिवंत फुलांच्या फुलदाण्या किंवा पाण्यासह शो पीस. बोन्साई वनस्पती आणि इनडोअर वनस्पती इत्यादी.

डासांपासून बचाव करण्यासाठी पूर्ण बाजूचे कपडे घाला.

हे करू नये

जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यासारख्या वस्तू जमा करणे टाळा, कारण त्यातून डासांची उत्पत्ती होते.

डासांची पैदास होऊ नये म्हणून पाण्याचे डबे बंद ठेवा.

जलजन्य आजारांसाठी (गॅस्ट्रो, हिपॅटायटीस, टायफॉइड) खबरदारीचे उपाय

गॅस्ट्रोपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरच्या उघड्या पदार्थाचे सेवन करणे टाळा.

खाण्यापूर्वी स्वच्छ हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापरा करा.

पाणी उकळून प्यावे.

एच 1 एन 1 च्या प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना

गर्दीची ठिकाणे टाळा.

शिंकताना किंवा खोकताना रुमालाचा योग्य वापर करावा.

वारंवार साबणाने हात धुणे.

डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा.

तीव्र ताप, श्वास घेण्यास त्रास किंवा त्वचा / ओठ निळे पडणे अशी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ मनपाच्या आरोग्य सुविधा केंद्रामध्ये जाऊन डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.

उपचारांना उशीर केल्याने गुंतागुंत होऊ शकते आणि मृत्यूचा धोका वाढू शकतो.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content