‘महाशिवरात्री’निमित्त येत्या बुधवारी, २६ फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे नित्यनेमाने दर बुधवारी बंद राहणारे मुंबईच्या भायखळ्यातले वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (पूर्वाश्रमीची राणीची बाग) जनतेकरिता खुले राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी, २७ फेब्रुवारीला हे उद्यान बंद असेल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कळविण्यात आले आहे.
भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुटीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, पालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुटी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी ते बंद ठेवण्यात येते. या ठरावानुसार बुधवारी ‘महाशिवरात्री’निमित्त वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे.