मुंबईतल्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (म्हणजेच पूर्वीची राणीची बाग) येत्या बुधवारी, १८ सप्टेंबरला जनतेकरिता खुले राहणार आहे. त्याऐवजी हे उद्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आधार घेत मुंबई महापालिकेने ईद-ए-मिलाद सणानिमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांत सोमवार, १६ सप्टेंबरला पूर्वी घोषित केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून त्याऐवजी बुधवार, १८ सप्टेंबरला सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार, बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी ते बंद ठेवण्यात येते.
या ठरावानुसार भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय बुधवार, १८ सप्टेंबर रोजी खुले राहणार आहे. तर गुरुवार, १९ सप्टेंबरला बंद ठेवण्यात येणार, असे पालिकेकडून कळविण्यात आले आहे.