Tuesday, February 4, 2025
Homeमाय व्हॉईसरजनीकांत.. दि 'थलाईवा’!

रजनीकांत.. दि ‘थलाईवा’!

खास भेदक आवाजासाठी प्रख्यात असणाऱ्या अमिताभ बच्चन यांना गेल्या वर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा व भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. त्यानंतर यंदा ६७व्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या अग्रस्थानी असणाऱ्या फाळके पुरस्कारासाठी रजनीकांत यांची निवड झाली आहे हे यथोचितच आहे.

रजनीकांत यांचा फार मोठा चाहता वर्ग जगभर पसरलेला आहे. अमिताभ यांची ओळख जशी शब्दांच्या फेकी साठी आहे तशीच निराळ्या पद्धतीने संवादफेक आणि काम करण्याची विशिष्ट लकब म्हणजे रजनीकांत. त्यांची पडद्यावरील एन्ट्री सिनेमागृह दणाणून सोडत असते. त्यांच्या सिनेमाच्या पहिल्या तिकिटांसाठी चाहते एकमेकांच्या अंगावर पडून गर्दीत खेचाखेच करून तिकिटे मिळवतातच. रजनीकांत यांचा सिनेमा येतोय ही हवाच सिने जगताचे अर्थकारण बदलवून सोडणारी ठरते. त्यांच्या प्रत्येक नव्या सिनेमाच्या रिळांचे पूजन होते.

सिनेमाचा धंदाच बेभरवशाचा आहे. इथली मंडळी तशीही देवभोळी आणि अंधश्रद्धाळू असतातच. म्हणून प्रत्येकच निर्माता, अभिनेता सिनेमाच्या रिळांचे पूजन वगैरे करत असतात ते वेगळे. पण रजनीकांत यांच्या चाहत्यांमध्ये पूजा वगैरे करण्याच्या स्पर्धा रंगतात. त्यांच्या प्रत्येक नव्या सिनेमाच्या पोस्टरला दक्षिणेत जसे पूजले जाते तसेच मुंबईच्या माटुंग्यातील अरोरा सिनेमाबाहेर. पोस्टरला दुधाचा अभिषेक घातल्याचीही दृष्ये आपण पाहिली आहेतच. ज्यादिवशी रजनीचा सिनेमा रिलीच दोणार त्या दिवशीचा माहोलच निराळा असतो.

माटुंगा परिसरात तमिळ व अन्य दाक्षिणात्य मंडळी मोठ्या प्रमाणात राहतात. सहाजिकच रजनीकांत यांचा प्रत्येक सिनेमा दक्षिणेबरोबरच तमिळ भाषेत मुंबईतील अरोरामध्ये रीलीज होत असतो. अलिकडे काही दशके रजनीकांत यांचे सिनेमे दक्षिणी भाषांबरोबरच हिंदीतही तयार होत असतात. त्यांचा हिंदी चाहता वर्गही प्रचंड आहे. सिनेसृष्टीत सुपरस्टार अनेक झाले असतील पण ज्यांच्या पोस्टरनाही दुधाचे अभिषेक घडतात असे सुपरस्टार एकमेव रजनीकांत आहेत. हा मान फक्त रजनीकांत यांचाच असू शकतो.

पडद्यावर वावरताना तोंडात सिगारेट ठेवण्याची त्यांची शैली, शर्टची कॉलरची एकच बाजू उचलून हातवारे करत संवाद फेकण्याची त्यांची शैली, हे लोकांना वेडे करणारी ठरली आहे. सिनेमाची सारी आर्थिक गणिते रजनीकांत यांनी बदलून टाकलेली आहेत. पण त्याचवेळी आपण एरवी जसे आहोत तसे वावरण्यातही त्यांना लाज वाटलेली नाही. त्यांचे पडद्यावरचे रूप हे डोक्यावर दाट झुलपे  मिरवणारे जरी असले तरी ते प्रत्यक्षात टक्कल पडलेले, थोडे वय झालेले सद्गृहस्थ आहेत, ही बाब त्यांनी कधीच लवपून ठेवलेली नाही. आपण जसे आहोत तसे वावरणे हेही फक्त रजनीकांतच करू जाणे!

सार्वजनिक ठिकाणी वावरताना ते स्वतःचे टक्कल मिरवतच पुढे येतात. रजनीकांत पडद्यावर वावरताना हा माणूस काहीही करू शकतो हे प्रेक्षकांना ठामपमाने पटलेले असते. तिथे असणारे त्यांचे सुपर व्यक्तिमत्वच समाजमनावर गारूड करून आहे. त्यामुळेच रजनीकांत यांच्या अफाट कार्यकर्तृत्त्वाची महती गाणारे अनेक जोक्स आणि मीम्स समाजमाध्यमांत धुमाकूळ माजवत असतात.

मध्यंतरी त्यांनी राजकारणात न येण्याची घोषणा केली, तेव्हा तर कहरच झाला होता. “प्रत्यक्षात राजकारणात न येताच त्यातून निवृत्ती घेण्याची कमाल फक्त रजनीकांतच करू शकतात!” असे कौतुकपूर्ण विनोद तेव्हा गाजले होते. रजनीकांत यांच्या नावाभोवती हे जे अद्भुततेचे, अविश्वसनीयतेचे आणि त्याचवेळी प्रचंड आकर्षणाचे चुंबकीय वलय तयार झाले आहे ते काही उगीच झालेले नाही. त्यासाठी त्यांनी अफाट कष्ट केले आहेत, मेहनत केली आहे. यत्न केले आहेत. गेल्या पन्नास वर्षांची सिनेसृष्टीतील त्यांची अफाट कारकीर्द त्याचीच साक्ष देते.

कर्नाटकातील मराठी घरात जन्मलेले शिवाजीराव गायकवाड हे तमिळ सिनेमातील पदार्पणावेळी रजनीकांत बनले आणि तेच नाव त्यांना कायमसाठी लाभले. ते फक्त नावानेच मराठी आहेत. बाकी ते संपूर्ण दाक्षिणात्यच आहेत. रजनीकांत यांना त्यांच्या ‘बिल्ला’ या सिनेमाने खरी ओळख दिली. त्यांचा हा सिनेमा प्रचंड गाजला. याच सिनेमावरुन नंतर बॉलिवूडमध्ये ‘डॉन’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली.

आजवर त्यांनी तामिळ, मल्याळी, हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमधून सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. रजनीकांत यांची प्रत्येक भूमिका ही वैशिष्ट्यपूर्ण असते. त्याच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळते. रजनीकांत यांनी आजवर वेगवेगळ्या पठडीतील भूमिका साकारल्या आहेत. बिनधास्त, धडाकेबाज तसेच कधी रोमॅण्टिक तर कधी विनोदी अशा सर्व प्रकारच्या अभिनयातून त्यांनी दाक्षिण्यात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येही ओळख निर्माण केली. बॉलिवूडमध्ये ‘अंधा कानून’ सिनेमातून त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत चाहत्यांची पसंती मिळवली. तर त्यानंतर ‘हम’, ‘रा-वन’, ‘अगाज’, ‘रोबोट’, ‘शिवाजी द बॉ़स’ अशा अनेक हिंदी सिनेमातून देशवासियांचे प्रेमच मिळवले आहे.

दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिला जाणारा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जन्माने मराठी सुपरस्टारला दिला जातो ही बाब महाराष्ट्राने अभिमान बाळगावा अशी नक्कीच आहे. कारण आपल्या नाशिक, खानदेशातील दादासाहेब फाळके हेच भारतीय सिनेमाचे जनक आहेत. पिताश्री आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कार 1967पासून दरवर्षी सिनेसृष्टीतील लक्षणीय योगदानासाठी एखाद्या मान्यवर दिग्दर्शक, अभिनेता, संगीतकार वा सिने गायकांना दिला जातो. राष्ट्रपतींच्या हस्ते तो यंदाही योग्य कार्यक्रमात दिला जाईलच.

रजनीकांत यांचा फाळके पुरस्कार हा हकनाक वादात सापडला आहे. खरेतर तसे होण्याचे काहीच कारण असू नये. पण अलिकडे सर्वच गोष्टी निवडणुकीच्या राजकारणाला ताडून आपण पाहतो. प्रत्येकाचा चष्मा यात निराळे दृष्य दखवतो! त्यामुळे वाद रंगत राहतात. “रजनीकांत यांना पुरस्कार नेमका 1 एप्रिल रोजी घोषित होतो आणि 6 एप्रिल रोजी तामिळनाडू व पुद्दुचेरीत मतदान होणार आहे, हे कसे?” बोलणाऱ्यांचा रोख असा आहे की भारतीय जनता पक्षाने तमिळ मतदारांवर प्रभाव टाकण्यासठीच हा पुरस्कार दिला आहे.

असे बोलणारे रजनीकांत यांचे महात्म्य तर कमी लेखतातच पण ही मंडळी तमिळ मतादारांच्या भावनांनाही ठोकरत असतात. खरेतर या पुरस्काराचा मतदारांवर प्रभाव पडून राजकीय लाभ जर कोणाला होणारच असेल तर तो डीएमकेला आणि एआयएडीएमकेला सारख्याच प्रमाणात होणार आहे. कारण तिकडे या दोन पक्षांपुढे काँग्रेसही नगण्य आहे आणि भाजपाही नगण्यच आहे! हे दन्ही राष्ट्रीय पक्ष तमिळनाडूत पंधरा-वीस जागाच फक्त लढवत आहेत. त्यांना रजनी प्रभावाचा काहीच लाभ होणार नाही, हे उघड आहे. रजनीकांत यांच्या न निघालेल्या राजकीय पक्षाने जर निवडणुकीत उडी घेतली असती वा अन्य कुणा राजकीय पक्षाबरोबर आघाडी, युती केली असती अथवा रजनीकांत यांनी स्वतः काही उमेदवारांचा प्रचार, प्रसार केला असता तर अशी टीका-टिप्पणी, आरोप कदाचित रास्त म्हणता आला असता. पण तसे काहीही झालेलेच नाही!

“रजनीकांत यांना पुरस्कार दिला, पण आमच्या सुलोचनादीदींना पुरस्कार नाही”, असेही दुःखाचे कढ काहींनी प्रकट केले आहेत. यातील दुसरा भाग खरा मानावा लागेल. सुलोचना दीदींना पुरस्कार मिळणे रास्त ठरले असते. पण तरीही सुलोचनाचे काम आणि रजनीकांत यांचे सिनेमातील काम व स्थान यांत प्रचंड अंतर आहे, हे मान्यच करावे लागेल. मराठी मनाला सुलोचनांविषयी आदर आहे, प्रेम आहे. पण देशभरातील त्यांचा चाहता वर्ग हाही अशा पुरस्कारात विचारात घेतलाच जातो.

बरं, पुरस्कार देणाऱ्या निवड समितीत कोण कोण होते? तेही लक्षात घेतले पाहिजे. त्या निवड समितीत आशा भोसले होत्या. त्यांना तसेच त्यांच्या भगिनी व जगविख्यात गायिका लता मंगेशकर, दोघींनाही फाळके पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. आशाताईंबरोबर निवड समितीत शंकर महादेवन होते. दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल होते. सुभाष घई आणि विश्वजीत चॅटर्जी असे सिनेक्षेत्रातील वादातीत दिग्गज या निवड समितीत होते आणि त्यांनी एकमताने रजनीकांत यांन पुरस्कार दिला आहे.

फाळके पुरस्कार ज्यांना आजवर मिळालेला आहे, ती नामावली पाहिली तरी, या पुरस्काराचे महत्त्व स्पष्ट व्हावे. त्यात कुठे राजकारणाला व वशिलेबाजीला वाव असेल असे वाटत नाही. देविकाराणी यांना पहिला फाळके पुरस्कार मिळाला होता. राजकपूर यांनी दोन वेळा फाळके पुरस्कार स्वीकरला. एकदा वडील पृथ्वीराज कपूर यांना मरणोत्तर जाहीर झालेला पुरस्कार राज कपूर यांनी स्वीकारला तर दुसऱ्यांदा त्यांचे स्वतःचेच नाव या पुरस्कारावर कोरले गेले. राज यांचे बंधु शशी कपूर हेही फाळके पुरस्कार प्राप्त होते. विनोद खन्ना यांनाही मरणोत्तर फाळके पुरस्कार जाहीर झाला. भूपेन हजारिका, सत्यजीत रॉय असे कितीतरी नामवंत सिने महर्षी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आता रजनीकांत यांचा नंबर लागला तोही बऱ्याच उशिराने.. शेवटी सर्वोच्च फाळके पुरस्कारावर रजनीकांत नाव कोरले गेले आहे हेच महत्त्वाचे!

Continue reading

24×7 इलेक्शन मोडवर आहोत हे पुन्हा दाखवून दिले भाजपाने!

दिवसाचे चोवीस तास निवडणुकांचा विचार करणाऱ्या नेत्यांच्या हातात देश आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भाजपाप्रणित रालोआचे तिसरे सरकार सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्याच संपूर्ण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गाला प्रचंड सुखावणारी घोषणा केली. ती...

केवळ बाळासाहेबांच्या नामस्मरणाने नाही मिळणार मते!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर मेळावे झाले. दोन्ही सभांना साधारण तितकीच गर्दी जमली होती आणि दोघेही एकमेकांना दूषणे देत होते, हे मुंबईकरांनी पाहिले, अनुभवले. दिवंगत बाळासाहेब...

फडणवीसांच्या धक्कातंत्राच्या राजकारणात शिंदेंची भूमिका कोणती?

महाराष्ट्राच्या राजकारणत सध्या धक्कातंत्राचा वापर नव्याने सुरु झाला आहे. कोणती गोष्ट कधी जाहीर करायची याचे धक्कातंत्र इंदिरा गांधींनी सर्वाधिक कौशल्याने राबवले. त्यांचे सारे महत्त्वाचे निर्णय त्या दैनिक, वृत्तपत्रे छपाईला गेल्यानंतर रात्री उशिरा घेत असत आणि मग सकाळी रेडिओवरील बातम्यांतूनच...
Skip to content