Saturday, March 29, 2025
Homeबॅक पेजब्लॅक अँड व्हाईट...

ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजनचा काळ गाजवणारे प्रा. अनंत भावे!

१९७७मध्ये भारतात ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आले. नवीन माध्यम असल्यामुळे आल्याआल्या लोकप्रिय झाले. तो दूरदर्शनचा जमाना होता. विक्रोळीत चित्रपटगृह नव्हतं. त्यामुळे घरातला छोटा रुपेरी पडदा म्हणजेच सर्वांचं मनोरंजनाचं विश्व बनलं. माहितीचा स्त्रोत असलेल्या रेडिओ आणि वर्तमानपत्रात आता टेलिव्हिजनची भर पडली. ऑडिओव्हिज्युअल माध्यम असल्यामुळे टेलिव्हिजनशी संपूर्ण जग लगेच कनेक्ट झालं. टेलिव्हिजनच्या प्रेमात पडलं. संध्याकाळी साडेसात वाजता तेव्हा टीव्हीवर मराठी बातम्या सांगितल्या जायच्या. एका ठराविक बॅकग्राऊंड म्युझिकमुळे सर्वांना मराठी बातम्या सुरू होत असल्याचं कळायचं. मराठी बातम्या हासुद्धा एक कार्यक्रम बनला. मोठी माणसं बातम्या बघायला टीव्हीसमोर बसायची. बातम्या सांगणाऱ्या वृत्तनिवेदकांची नावेसुद्धा सगळ्यांना तोंडपाठ होती. प्रदीप भिडे, चारुशीला पटवर्धन, अंजली मालणकर, कधीकधी भक्ती बर्वे.. ही मंडळी बातम्या सांगायची. काही दिवसांनी त्यात एका नावाची भर पडली, ती म्हणजे प्रा. अनंत भावे.

टेलिव्हिजनच्या रुपेरी पडद्यावर सर्वसाधारणपणे चिकन्याचुपड्या चेहऱ्यांना बघायची सवय असल्यामुळे भरघोस दाढीमिशा असलेला, जाड फ्रेमचा चष्मा घातलेल्या अनंत भावेंना गंभीर आवाजात बातम्या देताना पाहून आम्हाला थोडसं वेगळच वाटायचं. त्यात त्यांच्या नावामागे प्रा. असायचं. प्रा. म्हणजे प्राध्यापक आणि प्राध्यापक म्हणजे महाविद्यालयात शिकवणारे शिक्षक हे आम्हाला नंतर कळलं. चक्क एक शिक्षक टीव्हीच्या पडद्यावर येताना पाहून मोठी गंमत वाटायची. काही दिवसांनी “हवा अंधारा कवडसा” या नाटकाचं समालोचन टीव्हीवर पाहताना “सदाशिव अमरापुरकर” नावाचा अभिनेताही प्राध्यापक आहे हे कळलं.

दहावीनंतर कॉलेजला जाऊ लागल्यावर एकेदिवशी मित्रांसोबत कॉलेज कॅम्पसमध्ये उभा होतो. समोरून एक उंचापुरा आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा दाढीवाला माणूस येताना दिसला. मी सहज म्हटलं हा माणूस मराठी बातम्या देणाऱ्या अनंत भावेंसारखा दिसतो. एका मित्राने सांगितलं की “अरे! ते अनंत भावेच आहेत.” मी चमकून पुन्हा पाहिलं.अरेच्चा. खरंच की! दूरदर्शनवर बातम्या देणारे दस्तूरखुद्द अनंत भावेच होते ते. आधी माझा विश्वासच बसला नाही. कारण त्या काळात टेलिव्हिजनवर झळकणाऱ्या साध्या व्यक्तीसुद्धा आम्हाला स्टार वाटायच्या. टी.व्ही.वर दिसणारे कलाकार, गायक, नट, वृत्तनिवेदक, समालोचक सगळे सगळे आम्हाला व्ही.आय.पी. वाटायचे. आणि व्ही.आय.पी. किंवा स्टार असे सहजपणे रस्त्यावर चालताना पाहिले की आश्चर्य नक्कीच वाटायचं. जुन्या जमान्यातली लोकप्रिय अभिनेत्री सीमा देव ही एकदा भाजी घ्यायला गिरगावच्या बनाम लेनमधल्या भाजी बाजारात आली होती. हीसुद्धा तेव्हा मोठी बातमी झाली होती.

टी.व्ही.वर साधेसुधे दिसणारे दाढीदीक्षित अनंत भावे प्रत्यक्षात एकदम तेजस्वी आणि ग्लॅमरस दिसत होते. पावणेसहा फुटाच्या आतबाहेरची उंची, रुंद खांदे, गोरापान तांबूस वर्ण, थोडीशी चॉकलेटी झाक असलेली भरघोस दाढी, तुरळक पांढरे झालेले दाढीतले केस, रुंद कपाळ, मागे सारलेले डोक्यावरचे काळेभोर केस आणि ओठावर एक मिस्किल हास्य. असं व्यक्तिमत्व होतं अनंत भावेंचं. पहिल्याच दर्शनाने त्यांची माझ्या मनावर छाप पडली. नंतर बरेचवेळा अनंत भावे कॉलेज कॅम्पसवर दिसू लागले. तेव्हा मी गमतीने मित्रांना विचारलं हे वृत्तनिवेदक इथे कॉलेजमध्ये रोज कशाकरता येतात? टी.व्ही.वरच्या मराठी बातम्या सांगण्याचा आणि कॉलेजचा काही संबंध आहे का? तर एकाने सांगितलं “अरे नाही रे!अनंत भावे कॉलेजमध्ये मराठीचे प्रोफेसर आहेत. कला शाखेच्या सीनियर विद्यार्थ्यांना मराठी शिकवतात.”

प्रा. अनंत भावे हे मूळचे मराठीचे प्राध्यापक होते. कॉलेजमध्ये नोकरी करत होते. आणि कधीकधी टी.व्ही.वर बातम्या सांगण्यासाठी दूरदर्शन केंद्रावर जायचे. त्यांनी मी “पॅन्ट-शर्ट या सर्वसामान्य पेहरावत कधीच पाहिलं नाही. त्यांचा सर्वात कॉमन ड्रेस म्हणजे जांभळ्या, चॉकलेटी किंवा हिरव्या रंगाचा, पूर्ण बाह्यांचा, गुडघ्यापर्यंत असलेला खादीचा झब्बा, कॉड्रॉयची मखमली पॅन्ट आणि खांद्यावर शबनम बॅग. आम्ही शबनम बॅगला झोळी म्हणायचो. त्या काळी कवी, लेखक, पत्रकार असे काही ठराविक लोक अशाप्रकारची शबनम बॅग खांद्यावर अडकवून फिरायचे. त्यात बहुतेक पुस्तकं ठेवलेली असायची. (हेसुद्धा मला काही सीनियर मित्रांकडून कळलं.)

टी.व्ही.वर वृत्तनिवेदक असल्यामुळे अनंत भावेंभोवती एक वलय होतं. ते येताजाताना दिसले की मुलं थोडी थबकायची. थोडी ओशाळायची. सरांचे ओळखीचे विद्यार्थी त्यांना “गुड मॉर्निंग” म्हणायचे. त्यांची नजर एखाद्या अनोळखी विद्यार्थ्यावर पडली की ते मंद स्मित करायचे. त्यावेळी एखाद्या फिल्मस्टारने आपल्याकडे कटाक्ष टाकल्याचा भास विद्यार्थ्यांना व्हायचा.
प्रा. अनंत भावे ओठातल्या ओठात हसायचे. क्वचित ते खळखळून हसायचे. ते स्मितहास्य करताना त्यांच्या वरच्या ओठाची उजवीकडची बाजू थोडी जास्त वर व्हायची. त्यामुळे त्यांचं हसणं थोडसं तिरकस किंवा छद्मी वाटायचं. पण ती त्यांची स्टाईल होती. त्यांच्या ह्या हसण्याची लोकांना एवढी सवय झाली, की काहीवेळा लोक मुद्दामून त्यांच्यासारखं तिरकस हसून दाखवायचे.
प्रा. अनंत भावे कधीकधी एखाद्या नाक्यावर कला शाखेतल्या आपल्या सीनियरच्या विद्यार्थ्यांबरोबर गप्पा मारताना दिसायचे. ते तिथून जाईपर्यंत ज्युनिअरची मुलं लांबूनच त्यांच्याकडे पाहत राहायची.

एकदा तर गंमतच झाली. मी मित्रांबरोबर कॅन्टीनमध्ये मिसळपाव खात बसलो होतो. एवढ्यात दारातून प्रा. अनंत भावे येताना दिसले. नुसते दिसलेच नाही तर ते चक्क आमच्या बाजूच्या टेबलवर येऊन बसले. आमच्यावर एकप्रकारचं दडपण आलं. कॅन्टीनमधल्या त्या स्वादिष्ट मिसळीवर मनसोक्त ताव मारावा की त्यांच्याकडे पाहावं? अशी द्विधा मनःस्थिती निर्माण झाली. समजा, आपण एखाद्या उडपी हॉटेलमध्ये इडलीसांबार खात बसलेलो असलो आणि एकदम माधुरी दीक्षित बाजूच्या टेबलवर येऊन बसली तर कसं वाटेल? तसंच काहीसं त्यावेळी आम्हाला वाटलं. अनंत भावेंना माधुरी दीक्षितइतकं स्टारडम नसलं तरीही कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांकरीता ते तारांकित व्यक्तिमत्व होतं. ते येऊन बसताच कॅन्टीनचा मॅनेजर स्वतः येऊन त्यांच्यासमोर ऑर्डर घेण्यासाठी उभा राहिला. आम्हाला लहानपणी वाटायचं, की ज्यांना स्टारडम असतं, ती मंडळी भजी, मिसळ, वडा असे पदार्थ खात नसावेत. ही मंडळी काहीतरी वेगळंच खात असावीत. आणि काही खात असलेतरी छोट्या-मोठ्या कॅन्टीनमध्ये जात नसतील. एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जात असतील. पण अनंत भावेंनी चक्क कांदे भजीची ऑर्डर दिली आणि आम्हाला एकदम धक्काच बसला. मोठी माणसंसुद्धा सर्वसामान्यांसारखीच असतात आणि त्यांच्या आवडीनिवडी या सर्वसामान्यांसारख्याच असू शकतात, याची झलक पहिल्यांदाच मला पाहायला मिळत होती. हळूहळू आम्ही प्रा. अनंत भावे, या व्यक्तिमत्वाच्या वलयाशी एकरूप होऊ लागलो.

एव्हाना अनंत भावे आमच्यादृष्टीने नुसते वृत्तनिवेदक राहिले नव्हते. ते आता “भावे सर” झाले होते. कुठेही टी.व्ही.वर बातम्या पाहत असताना “अनंत भावे आपल्याला बातम्या देत आहेत” असं वाक्य ऐकलं, की आम्ही जोरात ओरडायचो “हे आमचे भावे सर”, “हे आम्हाला रोज कॉलेजमध्ये दिसतात.” हे असं ओरडताना प्रा. अनंत भावे यांचं वलय किंवा “स्टारडम” थोडसं आपल्याला चिकटवून घेण्याचा आमचा प्रयत्न असायचा. घरात आमच्याबरोबर बातम्या ऐकणाऱ्यांना एका क्षणाकरता आम्ही आणि प्रा.अनंत भावे हे एकच असल्याचा भास व्हायचा. एवढे ग्लॅमरस दिसणारे, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे मराठी प्राध्यापक बघून आम्ही हरखून जायचो. भावे सर नुसते प्राध्यापक नव्हते तर ते एक साहित्यिकही होते अशी माहिती आम्हाला समजली. बालसाहित्य हा भावे सरांचा प्रांत होता. त्यांनी लहान मुलांसाठी बरीच पुस्तकं लिहिली आहेत हेही कळलं. साहित्य, ललित, बालसाहित्य, वांग्मय अशा अवजड शब्दांचा अर्थ त्यावेळी आम्हाला कळत नसला तरी “न अडखळता, एकही उच्चार न चुकता, शुद्ध मराठीत बातम्या सांगणारे वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे विद्यार्थीप्रिय होते. ते वृत्तपत्रात आणि साप्ताहिकांमध्ये स्तंभलेखन करायचे असं सांगितलं जायचं. लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. टी.व्ही.वर नेहमी दिसणारे असल्यामुळे भावे सर अगोदरच सर्वांसाठी स्टार होते. त्यात ते भरपूर लेखन करणारे साहित्यिक असल्याचे समजल्यावर आमच्यासाठी ते एक “मोठा माणूस” झाले.

आज सकाळी पेपर वाचत असताना फ्रंट पेजवर एक छोटासा फोटो पाहिला. मी लगेच तो ओळखला. वृद्धावस्थेत पोहोचलेल्या प्रा. अनंत भावे सरांचा तो फोटो होता. पांढरी शुभ्र झालेली दाढी, ओठांवर ओघळणारी पांढरी शुभ्र मिशी, ते बातम्या वाचताना वापरायचे तोच चष्मा आणि तेच भव्य कपाळ…

खाली बातमी लिहिलेली होती…

“प्रा. अनंत भावे यांचे ८८व्या वर्षी निधन”…

भावे सरांच्या जुन्या आठवणींनी फेर धरला. आठवणींचे पक्षी उडू लागले…

“नमस्कार! अनंत भावे आपल्याला बातम्या देत आहेत..” हे वाक्य आता पुन्हा कधीच ऐकायला मिळणार नाही याची जाणीव झाली. अनंतात विलीन झालेल्या अनंत भावे सरांना भावांजली वाहण्यासाठी माझे हात नकळत जोडले गेले…

Continue reading

गुड बाय मिस्टर जिम्मी विक्रोळीकर..

तीन महिन्यांपूर्वी पेपरात बातमी वाचली 'अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिम्मी कार्टर यांचं निधन झालं..' आणि मन भूतकाळात गेलं. १९७७मध्ये आमचं कुटूंब गिरगावातून विक्रोळीत इमारत क्रमांक १७६मध्ये राहायला गेलं. जूनमध्ये आम्ही मुलं विकास हायस्कूलचे विद्यार्थी झालो. मी पाचवीत प्रवेश घेतला.आमचे सख्खे...

दिल में होली जल रही है…

शेवटचा मराठी महिना फाल्गुन. आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी (होली). होळीच्या आठ दिवस अगोदर होलाष्टक सुरू होतं. ते सुरू होताना बाजारात पिचकाऱ्या, फुगे, गुलाल, रंग, बत्ताशांच्या, साखरेच्या गाठ्यांच्या, कुरमुऱ्यांच्या माळांचे स्टॉल्स दिसू लागले की होळीची चाहूल...

नैराश्याच्या गर्तेतही सुखाची स्वप्ने बघा.. ‘मरीपुडीयुम’!

लहानपणी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना असताना, फक्त सरकारी दूरदर्शन बघायला मिळायचं. रविवारी सकाळी "साप्ताहिकी"मध्ये आठवड्याचे सगळे कार्यक्रम सांगितले जायचे.(साप्ताहिकी सांगणारी अंजली मालणकर ही माझ्या कॉलेजमधल्या मित्राची म्हणजे सुमुख मालणकरची आई होती.) संपूर्ण आठवड्याचे कार्यक्रम जवळपास तोंडपाठ असायचे. युवदर्शन...
Skip to content