पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सुमारे 7.30 वाजता सुंदर नर्सरी, नवी दिल्ली येथे जहान-ए-खुसरो 2025 या भव्य सूफी संगीत महोत्सवात सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि कलाकार मुजफ्फर अली यांनी 2001 साली सुरू केलेला, रूमी फाऊंडेशनतर्फे आयोजित हा महोत्सव, यंदा आपले 25वे वर्ष साजरे करत असून, 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत हा महोत्सव रंगणार आहे.
पंतप्रधान हे देशातील वैविध्यपूर्ण कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणारे मोठे पुरस्कर्ते आहेत. याच अनुषंगाने ते जहान-ए-खुसरो या सुफी संगीत, कविता आणि नृत्यासाठी समर्पित असलेल्या या आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होणार आहेत. हा महोत्सव आमीर खुसरो यांचा वारसा साजरा करण्यासाठी जगभरातील कलाकारांना एकत्र आणत आहे. यावेळी पंतप्रधान महोत्सवातील टीईएच बझार (टीईएच – द एक्सप्लोरेशन ऑफ द हँडमेड) येथेदेखील भेट देतील, जेथे एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमातील उत्पादने आणि देशभरातील विविध उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. या महोत्सवात हस्तकला आणि हातमागावरील लघुपटही प्रदर्शित केले जातील.