अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून “श्री विजयपुरम” ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी या निर्णयाची घोषणा केली. ‘X’वर एका पोस्टमध्ये गृहमंत्री म्हणाले की, देशाला वसाहतवादी प्रतीकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाने प्रेरित होऊन आज आम्ही पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून “श्री विजयपुरम” ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पूर्वीच्या नावाला वसाहतवादी वारसा होता. श्री विजयपुरम हे आपल्या स्वातंत्र्यलढ्यात मिळालेल्या विजयाचे आणि त्यात अंदमान आणि निकोबार बेटांनी बजावलेल्या अद्वितीय भूमिकेचे प्रतीक आहे. अंदमान आणि निकोबार बेटांना आपल्या स्वातंत्र्यलढ्यात आणि इतिहासात अतुलनीय स्थान आहे. एकेकाळी चोल साम्राज्याचे नौदल तळ म्हणून भूमिका बजावलेला हा प्रदेश आज आपल्या धोरणात्मक आणि विकास आकांक्षांसाठी महत्त्वाचा आधार बनण्यासाठी सज्ज आहे, असे ते म्हणाले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याच ठिकाणी सर्वप्रथम आपला तिरंगा फडकावला आणि सेल्युलर जेलमध्ये वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला ते हेच ठिकाण आहे, असेही अमित शाह म्हणाले.
गृहमंत्री अमित शाह यांच्या Xवरील ट्विटवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे की, “श्री विजयपुरम” हे नाव अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या वीर लोकांप्रति आदरांजली आहे आणि वसाहतवादी वारशांपासून मुक्त होण्याचे प्रतीक आहे. श्री विजयपुरम, हे नाव अंदमान आणि निकोबार बेटांच्या समृद्ध इतिहास आणि वीर लोकांचा सन्मान आहे. वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त होण्यासाठी आणि आपला वारसा साजरा करण्याप्रति आपली वचनबद्धता ते प्रतिबिंबित करते.